हृता
हृता आज मला तोच दिवस आठवतोयं ज्यादिवशी तुला , तुझी आई व मी पहिल्यांदा 'देवी अहिल्याबाई होळकर' अनाथाश्रमात पहायला आलो होतो. तीन साडे तीन वर्षांची असशील, भेदरलेल्या डोळ्यांनी इकडेतिकडे बघत लाईनमधे एका ताईचा हात धरून टुकूटुकू बघत होतीस. तुझ्या आईला एक मिनिटही लागला नाही ओळखायला. तिने सरळ मिठीच मारली तुला. तुला बघताक्षणी तुझ्या प्रतिक्षेत काढलेली प्रदीर्घ वर्षे कुठे गळून पडली काय माहिती , काही आठवेनासं झालं. आईने व मी मिळून केलेले सगळे पेपरवर्क देऊन उरलेल्या औपचारिकता पूर्ण केल्या. आता दोन आठवडे ट्रान्झिशन मधे तुला घेऊन सगळे शहर फिरत तुझे तीन वर्षातले सगळे कौतुक करत फिरत होतो. नाही म्हणायला धाकधूकही होतच होती, तुला फक्त गुजराती यायचं तेही भीत भीत काहीसं अस्पष्ट बोलायचीस. छोटा शब्दकोश ताबडतोब घेऊन टाकला. पण तिथल्या संचालिका मालतीताईंच्या मते दत्तक मुलांपेक्षा आईवडील जास्त घाबरतात. त्यांच्यामते सगळ्यात अशक्त आणि किरकिरे मूल तू होतीस. आता तू थोडीच विश्वास ठेवणारेस, फार फोटोही नाहीत दाखवायला. तिथे तुला सगळे मिनी म्हणायचे , आईला ते नावच वाटल...