ऑडिसी
नोलनचा बहुचर्चित ऑडिसी थिएटर मधे पाहिला. मॅट डेमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, झेंडेया, लुपिटा आहेत. ऑडिसी येथे शाळेत वाचून झालेलं असतं बरेचदा. बऱ्याचशा ग्रीक कथा माहिती असणारे सुद्धा भरपूर आहेत. माझ्या सारखे कोरी पाटी असणारे प्रेक्षक ज्यांना ट्रोजन हॉर्स शिवाय फार काही माहिती नाही असे फार कमी असतील. पण मी पूर्वाभ्यासाशिवाय विहिरीत उडी घेऊ शकते, पिक्चरचे काय एवढं! असा विचार करून तसेच तोंड वर करून गेले. काहीही अडलं नाही, चित्रपट अगदी सहज समजण्यासारखा आहे. तुम्हाला कुतूहल वाटून वाचून जावं वाटत असेल तर जा पण चित्रपट समजणार नाही असे नाही इतका सरळ मांडला आहे. होमर नावाचा ग्रीक व्यास मुनी ( माझा भाऊ म्हंटला कालिदास म्हण , व्यास जास्त झाले) यांनी जी दोन महाकाव्ये लिहिली, त्यापैकी ओडिसीयस राजाची गोष्ट ही ओडिसी. हे मूळचे ग्रीक महाभारत समजून मधेच अर्जुनाच्या बारा वर्षे वनवास फक्त वेगळा काढून त्याचीच एक स्वतंत्र गोष्ट केली आणि अर्जुनाला समुद्रात ढकलून त्याचा नेहमी एक फळी मिळून वाचणारा सिंदबाद केला तर जे तयार होईल तसेच वाटले. मूळ ग्रीक देवता व त्यांची संतती, शाप- वरदान वगैरे फार खोलवर न जाता केलेला ...