मोगरा फुलला
रूक्मिणीचे अंगण , काय नव्हते तिथे... वेगवेगळी झाडं, वेलींच्या महिरपी, फुलांची गर्द राई. सतत निरनिराळे प्रयोग करायची रूक्मिणी, गावभरच्या लेकीबाळी हक्कानं फुलं, पानं न्यायच्या. श्रावणातल्या मंगळागौरीला तर स्वतःच्या हाताने वेण्या माळून कौतुकाने द्यायची. अंगण आणि तिच हसू कायम फुललेले असायचं. पण घरामागच्या मोगऱ्यात तिचा विशेष जीव,किती पसरलाय... घरभर सुवास दरवळत असतो. रूक्मिणी काळीसावळी जरा बुटकी म्हणावी अशी, तेल लावून एक वेणी व चापूनचोपून बसवलेली साधीशी फिक्कट रंगाची सुती साडी नेसलेली. पण कधीही गावातल्या कोणी तिला निराश व दूर्मुखलेलं बघितलं नाही. सतत हसतमुख, मदतीला तत्पर व पानाफुलांत, मळ्याच्या कामात गुंतलेली.... तिचं लहानपण हालाखीच्या म्हणता येईल इतक्या गरीबीत गेलं.. ती झाली तेव्हा आईबाबाला कोण आनंद झालेला. साध्याशा भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात हे तिघं आनंदाने रहायचे, पण रूक्मिणी आठ वर्षांची असताना, आई जिथं कामाला जायची तिथल्या गच्चीवरून पाय घसरून पडली आणि..... जिथे दोन वेळंच्या पोटाच्या भर...