मुक्काम शांतिनिकेतन: पु.ल.देशपांडे
मी पुलंच्या पुस्तकांची पारायणं केलेली आहेत, तुम्हीही केलेली असतील. जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ , हे तर पाठ होते. नंतर एक शून्य मी , रेडिओवरील भाषणे व श्रुतिका, एका कोळियाने हेही दोनदोनदा तरी वाचलेले होते, पण साधारण दहा वर्षांपूर्वी मी त्यांच्या लेखनातून बाहेर पडले , आऊटग्रो झाले, माहिती नाही काय पण काही तरी झाले खरे !!! मग हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं , का घेतलं , रवींद्रनाथांच्या आकर्षणातून घेतलं की पुलच्या की दोहोंच्या.... असो. हे पुस्तक मला खूप आवडलं. आता लक्षात आलंय की पुलच्या विनोदी लेखनापेक्षा मला पुलंचे असे वैचारीक लेखन अधिक भावते, जवळचे वाटते कारण ते intrigue करते. विशेष म्हणजे हे लेखन कालातीत का काय म्हणावे तसे वाटले. तसं म्हणावं तर हे पुस्तकं ही एक दैनंदिनी आहे. पुलंनी रवींद्रनाथांच्या जबर ओढीने, संगीताविषयीच्या ध्यासाने, बंगाली भाषेबद्दलच्या आत्मियतेने व एकुणच Bengali Renaissance बद्दल थोडे फार जाणून घेण्याच्या आस्थेने, एक महिना शांतिनिकेतन येथे वास्तव्य केले होते. ...