निरंजन
निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं. 'निरंजन' या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.
आसपास छोटी मोठी मंदिर असणाऱ्या छोट्या गावाच्या जुन्या भागात सगळे बालपण गेले. त्यामुळे ती मंदिरे त्यातले अर्चाविग्रह हे माझ्या आयुष्याचा भाग होते. आपण जसे आपल्या आईवर आपली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे याचा विचार करत नाही. सहवासाने परमेश्वरा बाबतीत तसेच झाले होते. आयुष्याचा भाग असल्याने आणि सतत द्रुष्टी समोर असल्याने त्याच्या बद्दल प्रेमच वाटायला लागले.तो सहवास म्हणजे सहज उपलब्ध असलेल्या मोठ्या आनंदापैकी एक होता.
हक्काचे आनंदाचे एक ठिकाण म्हणजे कृष्ण मंदिर. माझी सखी तिथे रहात असे. तासनतास या कृष्ण मंदिरात खेळण्यात जायचे. तिच्या आजोबांनी आयुष्यभर निस्वार्थपणे त्या मंदिराच्या पूजा अर्चेचा भार सांभाळला.हे एक दोन तीनशे वर्ष जुने मंदिर होते. आमच्या वाड्या जवळ असणारा हा एक वाडा होता. एक मोठा गेरू रंगाचा दिंडी दरवाजा असलेला . ह्यात एक पोटदरवाजाही होता. हा दरवाजा आणि त्याची आगळ दोन्ही अवजड होते. बंद करायला नक्की दोन माणसे लागत असणार म्हणून की काय हा कायम उघडाच असायचा. मी पंधरा वर्षांत हा फक्त दोनदाच बंद होता हे ऐकून होते. एकदा गोदावरीला आलेल्या पुरामुळे आणि दुसर्यांदा अयोध्या राम मंदिर प्रकरणात झालेल्या धर्मिय दंगलींमुळे. मला अर्थातच दोन्ही गोष्टींचे गांभीर्य नव्हते. शाळा नसूनही जाता आले नाही यानेच उदास वाटले.
आत गेल्यावर दगडी अंगण, उजव्या कोपर्यात न्हाणीघर, त्याच्या बाजूला बुजवून टाकलेली विहीर आणि त्याच्या वर असलेले प्राजक्ताचे नाजूक झाड. त्या विहिरीत तळ्यात मळ्यात करताना भारीच गंमत वाटायची. नेहमीच त्या केशरी दांड्यांच्या पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. दोन बोटांमध्ये हलकेच दाबले तर अष्टगंधा सारख्या रंगाची मेंदी उमटायची. आजही चित्रात ते फूल पाहिले तर मन काही क्षण त्या आठवणीतल्या सुगंधात रेंगाळते.आणखी दोन पावले पुढे गेले की सखीच्या खोल्या. बाहेरच्या खोलीला दारही नव्हते. पण तिथे कुणी नाही असे देखील कधीच झाले नाही.
चार पाच कुटुंबे त्या वाड्यात समाधानाने रहायची. पुढे दोन तीन दगडी पसरट पायर्या.. आणि आत दोन ऊंच ओसऱ्या मधले अरुंद दगडी अंगण. त्या पैकी एका ओसरी वर भाजी वाले भाज्यांची टोपली ठेवायची.. प्रखर ऊन्हापासून वाचवायला. दुसऱ्या ओसरीवर आम्ही पत्ते कुटायचो.अजून काही पावले चालत गेले की मुख्य अंगण.ओट्याच्या बाजूला वडाचे झाड आणि त्याचा ऊंच पार. आणि समोर ओटा मागे गाभारा.अपूर्व शांती असलेला सुंदर गाभारा. तिथे जाताच मन निरंजन व्हायचे. राधाकृष्णाचे साधारण दोन तीन फुटाचे काळ्या पाषाणात बनवलेले रेखीव अर्चा विग्रह आणि समोर नित्य तेवत असणाऱ्या प्रसन्न समया. अजून काय लागते मन नमन व्हायला..!
. .तो कृष्ण मला आमच्यापैकीच एक वाटायला लागला. एकही खेळ नसेल जो तिथे खेळला नाही. कधीही हाकलून दिल्या शिवाय किंवा बोलावणे आल्याशिवाय घरी आलेले आठवत नाही. प्रदक्षिणेसाठी मोकळ्या सोडलेल्या अंधाऱ्या बोळात डोकेही फोडून घेतले होते आम्ही दोघींनी . दुसऱ्या दिवशी टेंगळांंसहीत पुन्हा तिथेच खेळत होतो. तो गारवा, एकांत आणि मुग्ध शैशव. कृष्णा समोर आजोबा चंदन उगाळायचे तशी मी एकटक बघत बसायचे. त्यांनी साधेपणाने केलेली या अप्रसिद्ध अशा जुन्या मंदिरातली पूजा माझ्यासाठी रोजचा सोहळा होती. ते दिवस निरंजन झाले.
समोरच्या झाडावर एक मुंजा रहातो. तो कुणाला तरी रात्री शुक् शुक् करुन सरसर झाडावर चढत गेला अशी वदंता होती. ते ऐकल्यापासून आमच्या तिथल्या गप्पांमध्ये भुतांच्या गोष्टींची पण भर पडली. कृष्णाच्या समोर बसून आम्ही भुतांवर गप्पा मारल्या. किती हसला असेल तो....रोज संध्याकाळी घरी आल्यावर आई विचारायची आज तरी पाया पडलीस का..मी शांतपणे हौदातले पाणी पायावर घेत नाही म्हणायचे. मग तिचे सुरु व्हायचे अग शेकडो वर्षापासूचे जागृत मंदिर आहे ते रोज कस विसरू शकतेस तू..? मी काय सांगणार आणि कसे. कधीच आठवायचे नाही. समोरच्या नळावर उगाच पाय धूताना, ओट्यावर बसून पत्ते खेळताना. फूले वेचताना. गप्पा मारताना .तिथे तासनतास असून कधीच लक्षातच यायचे नाही की कृष्णाला नमस्कारही करायला हवा. काही तरी मोहिनीच जणू. आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार..!
सगळ्या गप्पांचा, खेळांचा, छोट्या छोट्या भांडणांचा अगदी सगळ्याचा तो सगुण साकार रुपाने साक्षी होता.कृष्णा सोबत त्याची सखी माझ्यासोबत माझी. आमच्या चौघांची ताटातूट होईल कधीच वाटले नव्हते बालमनाला . आज वीस वर्षे झाली त्या मंदिरात जाऊन. पुन्हा जावे तर भीती वाटते तिथली पडझड बघून मनातील हळवी आठवण दुखावेल.सगुण साकार रुपात त्याचे नेहमीच समोर असणे मी फार गृहित धरले होते. कारण तो बालपणाच्या अस्तित्वाचा भाग होता. नंतर भौतिक अंतर वाढल्यावर लक्षात आले की तो सर्वव्यापी आहे असे नुसते माहिती असून उपयोग नाही. त्याचे तसे असणे हे जाणीवेचा भाग झाले पाहिजे. बाहेरच्या मंदिरात तो फक्त दिसतो अंतरात तो जाणवतो. त्या जाणीवेला शब्दबद्ध करणारी अवस्था हीच निरंजन. परमानंदा शिवाय काहीच न उरणे हेच निरंजन. हीच चिरंतन निरंजन अवस्था सर्वांना मिळावी अशी त्या कृष्णाकडे प्रार्थना..!!
आभार.
©अस्मिता.
चित्र आंतरजालावरून /विकीहून साभार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा