कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण.
कथा क्रमशः आहे.
( मुखबंधन : ही एक काल्पनिक कथा आहे. राधाकृष्ण यांच्या कित्येक कथा प्रचलित आहेत. पण गोपींच्या कथा फारशा ऐकिवात नाहीत. शरद पौर्णिमेच्या रासाच्या खेळापुरतेच त्यांचे जनमानसातले स्वरूप सिमीत आहे. सर्वच गोपगोपी कान्हावर जवळजवळ तितकेच प्रेम करायचे असे मला वाटते म्हणून ह्या काल्पनिक गोपीला नायिका करून मी कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य गोष्टींचा आदर रहावा तरीही काल्पनिक गोपीला सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचे आपसातले कमीत कमी संवाद कथेत येऊ दिले आहेत. ही खूप साधी सहज कथा आहे. मी स्वानंदासाठी लिहिली आहे आणि वाचून तुम्हालाही आनंद मिळावा एवढा सरळ हेतू आहे. काही संस्कृत शब्द पर्यायी म्हणून वापरले आहेत. गरज लागल्यास शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत. धन्यवाद !! )
**************
"आपल्याला उद्या पहाटे पहिल्या प्रहरी वृन्दावनी निघायला हवे पुत्री ! "
"नाही तात मला , मला इथेच रहायचे आहे , आपल्या या वाड्यात मातेच्या कित्येक स्मृती आहेत , त्याचा वियोग मला सहन नाही होणार ".
"बाळ नारायणी, मी समजू शकतो गं. तू एकुलती एक पुत्री आहेस मला, तुला दुखावण्याचे माझ्या स्वप्नीही होऊ शकत नाही , पण मथुराधीपती कंस महाराजांचा तसा आदेशच आहे बघं, त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे तर आपणही प्रजा म्हणून कृतज्ञता दाखवू. तुझ्या मातेला जाऊन
एक संवत्सर उलटले आता. तरीही तू वियोगाच्या दुःखाला कवटाळून बसली आहेस. बाळ, आयुष्यात आता पुढे जायचा योग्य काळ आला आहे. मलाही वाटतं तू काही मास आपल्या आप्तांकडे रहावे. गुणवंती आणि देवदत्त तुला पुत्रीसमान स्नेह देतील. त्यांना स्वतःचे अपत्य नाही तर तूही त्यांना मातपित्यासम प्रेम दे. कंस महाराजांनी मला देशाटनासाठी व अश्वक्रयणासाठी दूरदेशी पूर्वेस श्रावष्टी नगरीस जाण्याची आज्ञा दिली आहे. शिवाय त्यांनी माझ्या चोखंदळ अश्वपरिक्षेसाठी गौरवाचे उद्गार काढले आहेत. राजाज्ञा म्हणजे साक्षात श्रीविष्णुंचीच आज्ञा. मला जावे लागेल पण हे सहा मास मला पळभरासारखेच वाटतील जर तू गुणवंती व देवदत्त यांच्याकडे गेलीस तर , नाहीतर वियोगाचा हरेक पळ मला षण्मासासारखा भासेल. वृन्दावनी गेल्यावर तिथल्या रीतीभाती शिकून घे. मोठ्यांचा आदर व लहानांचे कोडकौतुक कर. तुझ्या मातेचे उत्तम संस्कार तुझ्यात आहेतच. पण तू जरा हट्टी आहेस. आपला हा वियोग तुला तडजोड व विनाअट प्रेम करायला शिकवेल. हे समृद्ध वैचारिक आयुष्यासाठी खूप आवश्यक आहे पुत्री. तू इतकी गुणी, निष्ठावान आणि रूपवान आहेस की तुला सुयोग्य वरांची काहीच ददात नाही, आल्यावर तुला अनुरूप वाटणाऱ्या युवकाशी तुझा विवाह निश्चित करू. आता तू षोडशी आहेस पण मला मात्र बाळंच वाटतेस बघं म्हणून मी तुला इतके समजावतोय. तशी बांधाबांध झाली आहेच, उर्वरित प्रस्थानाची तयारी कर आता."
" किंतु पिताश्री ", क्षुब्ध झाली की नारायणी तातांना पिताश्री म्हणायची. हे तातांनाही माहिती होते. " माझ्या सख्या, माझ्या आवडीनिवडी, आपले परिचयाचे लोक सगळे आयुष्य इथेच रत्नपुरीत आहे. मला खात्री आहे की मला वृन्दावन आवडणारच नाही. ते तर रत्नपुरीएवढे विशाल नगर देखील नाही. केवळ एक छोटेसे ग्राम आहे. शिवाय मी तिथे कधी गेलेच नाही, गुणवंती मावशीच आपल्याकडे यायची नेहमी. तिच्याशिवाय मी कुणाकुण्णाला ओळखत नाही तिथे ! एवढा मोठा दिवस आणि एवढ्यामोठ्या रात्री तेही षण्मास. अशक्य.........!"
हे अशक्य वाटत असेल तर एक साहस म्हणून याकडे बघं किंवा हे मी देशाटनासाठी जातोय असे म्हणून नाही तर परमेश्वराची इच्छा आहे तू वृन्दावनी जावेस अशा दृष्टीने बघं.!"
" परंतु तिथली लोकं तिथले शिष्टाचार मला जमेल का ? "
" अगं बाळा, तिथली लोकं अत्यंत सरळ, भाबडी आणि प्रेमळ आहेत. ते तुला इतका जीव लावतील की तू मलाही विसरून जाशील. गुणवंती मावशी शिकवेल तुला , आणि माझाही विश्वास आहे की तू शीघ्र सर्व आत्मसातही करशील. "
हे आणि अशा आशयाचे संभाषण या पितापुत्रीत गेल्या दोन सप्ताहांपासून होत होते.
" मी जाण्यास तयार आहे पिताश्री, तरीही वाटते की दिवसाचा प्रत्येक पळ तर मी कामात नाही घालवू शकत नं. मगं मुक्त समयात मला तुमचे, आपल्या घराचे, रत्नपुरीचे, इथल्या परिचयाच्या स्थानांचे स्मरण होऊन मी व्याकूळ झाले तर मी काय करु ?"
"हो हो , अगदी सत्य आहे ते अगदी , पण ही तुझ्या आराध्य श्रीहरीविष्णुंची मनिषा आहे ना की तू वृन्दावनी गमन करावे, त्यामुळे जेव्हा जेव्हा तुझे मन स्मृतींनी व्याकूळ होईल तू त्यांचा जप कर. आता तरी झाले का समाधान माझ्या विदुषी पुत्रीचे."
"उचित आहे तात, तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. मी तुमची प्रतिक्षा करीन आणि वृन्दावनी तुमचा मान वाढवीन." असे म्हणून नारायणी निद्राधीन होण्यास स्वतःच्या कक्षात गेली.
लक्ष लक्ष विचारांनी मन अशांत झाले होते. कसे असेल वृन्दावन, रत्नपुरीइतके समृद्ध असेल का. गुणवंती मावशी तिला मातेसमान प्रेम देईल याबाबत ती निःशंक होती पण तिथे इथल्या सारखे भव्य वाडे, रम्य जलाशये व संगीत नृत्याचे कार्यक्रम होत असतील का ? सरिता यमुना कशी असेल, मेघवर्णी डोह आहे म्हणे तिचा. तात सहा मासात परतून येतील ना, का कंसमहाराज म्हणाले अजून करा देशाटन तर संवत्सरही लागायचे. नको श्रीहरी काय हे सगळे , आधी तू माझ्यामातेला माझ्यापासून हिरावून घेतले, आणि आता माझे तात व मत्प्रिय रत्नपुरीपासून मला तू दूर वृन्दावन ग्रामी पाठवत आहेस. कसली शिक्षा आहे ही. माझे तात अश्वपरिक्षेत व देशाटनात एवढे निपुण नसते तर ही आपत्ती माझ्या वर कोसळली नसती. का तू त्यांना निपुण केलेस श्रीहरी! का माघ महिन्यात माझे सगळे लक्ष माझ्या गायनाकडे होते व पौष महिन्यात सूर्य पुजनाला मला विलंब झाला होता. या सगळ्यामुळे मी ध्यानात चिंतनात कुठे कमी पडले, म्हणून तू मला शासन करत आहेस.वसंतोत्सवात रामायणावर सख्यांसोबत एक नृत्यनाटिका बसवायची होती. आता कशाचा वसंतोत्सव नारायणी देवी झोपा आता.....असे लाखो किंतु परंतुचे उसासे घेत नारायणी निद्राधीन झाली.
राजशेखर पंत त्यांच्या देशाटनाच्या तयारीत बाहेरील कक्षात अर्धा प्रहर शेवटची बांधाबांध करत होते. लेकीची काळजी होतीच. ती निद्रिस्त झाली आहे का पहायला ते तिच्या कक्षात येऊनही गेले. डोक्यावरून हात फिरवला, उगाच तिची शाल एकसारखी केली आणि मनोमन श्रीहरीला सोपवून तेही आपल्या कक्षात गेले.
राजशेखर पंत त्यांच्या पत्नी सुमतीदेवी व कन्या नारायणी असे त्यांचे सुखी कुटुंब होते. एक संवत्सरापुर्वी साध्याशा आजाराचे निमित्त होऊन सुमतीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला. तेव्हा पासून पंत आपल्या कन्येस पुष्पासम जपायचे. मथुराधीपती कंस महाराजांच्या विश्वासातल्या श्रेष्ठ व्यक्तींपैकी ते एक होते. हा विश्वास राजशेखर पंतांनी उग्रसेन महाराजांकडे अनेक वर्ष प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवला होता. काही गोष्टी कंसमहाराजांच्या त्यांना पटायच्या नाहीत पण ही सुद्धा श्रीहरीची इच्छा असे मानुण ते आज्ञापालन करायचे. ते अश्वपरिक्षेत प्रविण तर होतेच शिवाय त्यांना देशाटन करून वेगवेगळी राज्योपयोगी माहिती गोळा करण्याची हातोटी देखिल होती. सुमतीदेवी निवर्तल्यानंतर प्रथमच ते देशाटनास निघाले होते. रत्नपुरीत अगदी जवळचे नात्यातले व नारायणीला कन्येवत स्नेह देईल असे विश्वासाचे कुणी नव्हते. शिवाय एकिकडे पुत्रीबद्दलची ममता व दुसरीकडे कर्तव्यनिष्ठा यात ते अडकले होते. पण विवेकशील वृत्तीमुळे त्यांनी कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले. ही देखील श्रीहरीची इच्छा मानून ते शांतचित्त राहिले. पुत्री नारायणीसुद्धा बुद्धीमती आहे हे ते जाणून होते व या पिता-पुत्री वाक्सभेची त्यांनी तयारी ही केली होतीच. ती कामी आली याचा सुद्धा त्यांना पुत्रीप्रेमापोटी अभिमानच वाटला. त्यांना तिला तिच्या गुणवंती मावशी व देवदत्त काकाश्रींकडे वृन्दावन ग्रामी सोडून लगोलग मथुरेला निघायचे होते , तेथील काही मंडळी सुद्धा त्यांच्यासोबत येणार होती. त्यांना घेऊन द्वितीय दिनी प्रातःकाळी त्यांच्या यात्रेला आरंभ होणार होता. सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
********************************************************************************************************************
शब्दसुचीः
संवत्सर...वर्ष
मास...महिना
आप्त.....नातलग
क्रयण...खरेदी
अश्व....घोडा
षोडशी... सोळा वर्षांची
प्रहर...साधारण तीन तासाचा एक प्रहर
------------------------------------------------------------------
धन्यवाद.
©अस्मिता.
चित्र आंतरजालावरून साभार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा