विश्वरूपदर्शन स्फुट

 




उपोद्घातः

मी कृष्णडोहाच्या पैलतीरी कथा लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा मनात एक ढोबळ कथांत होता पण तो सुयोग्य पद्धतीने शब्दबद्ध करणे आव्हानात्मक वाटत होते. पण त्या कथेने मला पुढे नेले व कृष्णकृपेने हवा तसा अंत सुचला , तो इतका सुचत राहिला की या स्फुटाचा जन्म झाला. मला जे थोडे फार विश्वरूपदर्शनाचे आकलन झाले आहे ते मी या स्फुटात ओवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या दृष्टीने
हे फक्त विराटरूप नसून चराचरात , सर्व अवस्थेत ,सर्व सजीवनिर्जीवात असलेले परब्रह्मतत्व आहे.

या दर्शनाच्या वर्णनाला अंत असूच शकत नाही. तरीही मी चिरंतर सच्चिदानंद रूपाला शब्दबद्ध करण्याची धडपड केली आहे.

************************************

हा कथांत आहे.......

तू नर आहेस आणि नारायणीही ! तुझी माझी यात्रा नित्य आहे , अनंत आहे. सहज आहे, निर्धारितही आहे. तू यात्रेला आरंभ कर."

मार्ग मी गंतव्य मी !
स्वत्व मी ईश्वरत्व मी !
चिरंतन मी आणि काळ मी !
आरंभ मी आणि अंत मी !

व्यक्त मी तरी गुप्त मी !
आदी मी अनादी मी !
सृजन मी भेदन ही मी !
निमित्त मी प्राक्तन ही मी !

सुक्ष्म मी आणि स्थूल मी !
नित्य मी अनित्य मी !
अ-क्षरही मी आकार मी !
ओंकार मी हुंकार मी !

नाद मी आणि गर्भ मी !
संगीत मी आणि नीरव मी !
उत्सवही मी एकांत मी !
गृहीही मी मंदीरीही मी !

अचिंत्य मी आणि नाम मी !
राघवही मी शबरीही मी !
नरही मी नारीही मी !
मुक्त मी अव्यक्त मी !





पिपलिकाही मी ब्रह्मांड मी !
तेज मी अंधार मी !
सार्थ मी अनर्थ मी !
आर्त मी अहंही मी !

शौर्य मी कारुण्य मी !
स्मित मी आणि रूदन मी !
स्थीर मी आवर्त मी !
स्वर्ग मी भूमीही मी !

अवकाश मी आकाश मी !
नित्य मी अनित्य मी !
अभंग मी आणि धूलिकणही मी !
सत्त्व मी आणि तमस मी !

चंद्र मी आणि क्षयही मी !
मार्तंड मी आणि ग्रहण मी !
जलही मी तृष्णाही मी !
समुद्र मी सरिताही मी !

भोज्य मी भोक्ताही मी !
आहार मी क्षुधाही मी !
आसक्त मी योगीही मी !
निर्माण मी आणि प्रलय मी !

संत मी आणि दैत्य मी !
गतही मी आगतही मी !
खही मी आणि खगही मी !
पर्जन्य मी दुर्भिक्ष्य मी !

शून्य मी विराट मी !
वृक्ष मी आणि पुष्प मी !
भृंग मी आणि कमल मी !
मधुही मी माधवही मी !

हन्त मी आणि वीर मी !
जीत मी आणि जयही मी !
शस्त्र मी आणि रक्त मी !
अस्त्र मी निःशस्त्र मी !

दर्शनही मी अदृश्य मी !
रमणीय मी आणि कुरूप मी !
गुणही मी निर्गुणही मी !
ममताही मी माताही मी !






स्वप्न मी जागृतीही मी !
रजनीही मी उषाही मी !
भूत मी भविष्य मी !
शुभ्र मी आणि कृष्ण मी !

निर्भीडही मी आरक्त मी !
सुखही मी आणि क्लेश मी !
विद्वान मी व्यासंग मी !
शाप मी उःशाप मी !

वेग मी अवरोध मी !
व्याध मी मृगयाही मी !
मृगही मी कस्तुरीही मी !
साध्वीही मी राज्ञीही मी !

मयूर मी आणि नृत्य मी !
तोयमी आणि मत्स्य मी !
प्रपात मी प्रतिबिंब मी !
अग्नीही मी आणि भस्म मी !

ब्रह्म मी ब्रह्मांड मी !
अतर्क्य मी आणि सुलभ मी !
संग मी निःसंग मी !
अवध मी वनवास मी !

दीन मी सम्राट मी !
हिरण्य मी मृण्मयही मी !
पावित्र्य मी कलंकितही मी !
अणूही मी आणि स्फोट मी !

आक्रोश मी उन्माद मी !
भोगी मी उन्मनीही मी !
उत्कटही मी विरक्त मी !
त्रिलोक मी आणि नाथ मी !

अमोघ मी अवशेष मी !
अहिल्याही मी प्रतिक्षाही मी !
गौतमही मी ग्लानीही मी !
सीताही मी परित्याग मी !

राममी आणि श्याम मी !
नरही मी नारीही मी !
जीव मी निर्जीवही मी !
तूही मी आणि मीही मी!


तूही मी आणि मीही मी!
तूही मी आणि मीही मी!
तूही मी आणि मीही मी!
तूही मी ........................

************************************
।।शुभं भवतु।।

शब्दसूचीः

पिपलिका.. मुंगी
अ-क्षर.. अविनाशी
प्राक्तन..प्रारब्ध
सृजन..निर्मिती
अचिंत्य..ज्याचे चिंतन करणे अवघड
नीरव..शांतता
अभंग.. न भंग करता येणारे
मार्तंड..सूर्य
ख..आकाश
खग..आकाशात गमन करणारे ते (पक्षी)
गत..गेलेला (अभिप्राय मरण पावलेला)
आगत..आलेला (अभिप्राय जन्माला आलेला)
भृंग..भुंगा
मधु..मध
व्याध..शिकारी
मृगया..शिकार (करणे)
राज्ञी..राणी
तोय..पाणी
प्रपात..धबधबा
अवध..अयोध्या
हिरण्य..सोने
मृण्मय..मातीचे बनलेले
उन्मनी..अध्यात्मिक शांतीची अवस्था
ग्लानी..आत्मग्लानी
अमोघ..भग्न न होऊ शकणारे

**************************************

धन्यवाद Happy !





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऑपनहायमर

हृता

बंदिवान मी ह्या संसारी