करदे मुझे मुझसेही रिहा , मारा आणि कोहंसोहं



करदे मुझे मुझसेही रिहा , मारा आणि कोहंसोहं



 


       कुन फाया कुन हे सूफी गाणे मला आवडते. ह्या तथाकथित बंड लोकांबद्दल त्यांच्या झपाटलेपणामुळे एक गूढ आकर्षण वाटते. खासकरुन या गाण्यातील त्या ओळी ज्यात "अब मुझकोभी हो दिदार मेरा , कर दे मुझे मुझसेही रिहा" अशी आर्त आळवणी आहे.माझ्यापासून मला रिहा /मुक्त / स्वतंत्र कर म्हणजे नक्की काय असेल ? नेमक्या कोणत्याअदृश्य तुरुंगात आहोत आपण जो दिसत नाही, जाणवत नाही. मग त्यातून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न तरी का करणार आणि कसा करणार !
    
    मला नेहमीच वाटते की मी या ग्रहावरची नाही, या जगातलीच नाही . कुठल्यातरी अधिक चांगल्या ग्रहावरून झालेल्या चुकांमुळे पतन होऊन मी इथे आले आहे. प्रत्येकाला असा अनुभव आयुष्यात कधी न कधी आलाच असेल. या चाकोरीचा या साचेबद्धतेचा कंटाळा येऊन एक प्रकारची बधीरता येते. मगं आपण अस काही तरी ऐकतो, बघतो, वाचतो किंवा अनुभवतो की एक क्षण स्वतःच्या स्व-स्वरूपाशी जोडल्या जातो. तो आनंदाचा क्षण जो खरे तर क्षणीक वैराग्यामुळे अनुभवला आहे तो आपल्या मनाला पुन्हा त्या संसारचक्राला जुंपतो. आणि आपण नात्यांच्या आभासी बंधनांशी पुन्हा एकदा आवळल्या जातो. मगं घरची सात-आठ आणि बाहेरची सात-आठ नाती सांभाळण्यात आयुष्य निघून जाते. पण साचेबद्धता तीच !! प्रत्येक नात आपल्याला एका साच्यात टाकत. सोप्या शब्दांत सांगायचे तर 'कस्टमाईज' करतं . हा साचा परिस्थिती प्रमाणे व अपेक्षांप्रमाणे बदलत रहातो. त्यामुळे स्थैर्य कधीच मिळत नाही. बहुतांश नात्यांत निखळ आनंद रहात नाही कारण ते प्रेम निस्वार्थ व विनाअट केलेले नसते. कुठल्यानाकुठल्या अपेक्षांचे आणि अपेक्षाभंगांचे ओझे ते वहात असते. हा ' नाच गं घुमा, कशी मी नाचू ' प्रकार इतका अंगवळणी पडतो की या कस्टमाईज नाचालाच आपण नात्यातील एकनिष्ठता समजायला लागतो.



आपल्याकडे काही संतमंडळी आणि भगवद्गीता सुद्धा सांगून गेली आहे की, मुक्तीची संधी हे सुद्धा आत्मा वारंवार जन्माला येण्याचे एक कारण आहे.
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्न्यस्य मत्पर: |अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते || 6||तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् |भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् || 7||ण बहुतांश लोक प्रयत्नच करत नाही. रोज ध्यान केल्यावर हे खरतरं अगदी अशक्य रहात नाही. मुक्तीच्या मार्गावर रोज एकतरी पाऊल टाकावे. जे काळातीत आहे त्याला दिवसातला थोडा तरी काळ द्यावा. परमात्मा इतका उदार आणि क्षमाशील आहे की आपण एक पाऊल उचलले तर पुढची दहा तो आपल्याला कडेवर नेईल !!
हा गुणत्रयरहितु । व्यक्तिसि अतीतु ।
अनादि अविकृतु । सर्वरूपु ॥ ४९ ॥
अर्जुना हा नित्यु । अचलु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥ १५० ॥
( ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा )


मला प्रामाणिकपणे वाटते की हे तिन्ही गुणांनी रहीत, अनादी, अनंत, अविकृत आणि अचल असणारे परमानंदाचे शाश्वत स्वरूप, जे सर्वव्यापी आणि परिपूर्ण आहे ते सर्वांना मिळावे. सर्वांचा त्यावर अधिकार आहे . एक आत्मा म्हणून मुक्तीच्या प्रयत्नासाठी आणि एक सजीव म्हणून सच्चिदानंदाच्या एकात्मतेसाठी.

पण आपण हे विसरून गेलो आहोत की आपण या संसाराच्या अदृश्य तुरुंगात आहोत. हॅमस्टरव्हीलवर अविरतपणे पणे धावणाऱ्या हॅमस्टर सारखी आपली अवस्था आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याने आपण हळूहळू हेही विसरून गेलोय की आपण नक्की काय विसरलो. म्हणूनच की काय खुद्द परमात्म्याला 'संभवामि युगे युगे' करावे लागले. कधी ईश्वरी अवतारात तर कधी अवतारी स्त्री-पुरुषांत ! पण आपण त्यांचे गोडवे गाण्यात धन्यता मानतो. कदाचित त्यांना ईश्वरी अवताराचे लेबल लावले की आपल्याला आत्मा म्हणून येणाऱ्या जबाबदारीतून स्वतःला अलगद मोकळे करता येते.

हे जे आपण आपली सुटका बघत असतो. त्याला कारण असू शकतो हा
मारा
. हा मारा म्हणजे तोच दानव राक्षस ज्याने सिद्धार्थाला निर्वाणाच्या प्रयत्नांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आत्मबोधात बाधा उत्पन्न केल्या. हा मारा बौद्ध धर्मात राक्षसरूपात पाहिल्या जातो. पण मला तो आपल्याच वासना-विकार याने आलेल्या अज्ञानाचे प्रतिक वाटतो. असा बाह्य राक्षस कुणी नाहीच मुळी. हा इंद्रियजन्य सुखाच्या लालसेने आलेल्या षड्रिपूंचे आपल्या अंतरातलेच रूप आहे. सिद्धार्थ त्याला बधला नाही म्हणून बुद्ध अवतरला. आपण त्याचे पालनपोषण करून त्याची गुलामगिरी पत्करली. आपल्यातही बुद्ध अवतरु शकतो, निदान आत्मा म्हणून परमात्म्याने ही क्षमता देऊनच अवनीतलावर पाठवले आहे. आपणमात्र दुर्दैवाने ह्याच एका बाबतीत स्वार्थी न होता, कूटस्थ चैतन्याचा खजिना सोडून या "मारा"ची चाकरी करतो.








याकरिता मन निर्विचार करून स्वतःला कोहंसोहं हा प्रश्न विचारला पाहिजे. मी तर म्हणेन तो पडला पाहिजे नाहीतर चिकीत्सक वृत्तीने त्याचा ध्यास घेतला पाहिजे. धर्मातला ईश्वर सापडणे महाकठीण पण अध्यात्मात तो कोहंसोहं विचारले की आलाच समजा! तुम्ही धार्मिक असलात तर तुम्हाला तात्पुरती प्रसन्नता आणि समाधान मिळेल पण अध्यात्मिक असलात तर तुम्हाला कूटस्थ चैतन्याची अंतरात जाणीव होईल. आणि ही जाणीव मुक्तीचे एक पाऊल उचलेल. कदाचित ह्या कारणासाठी सुद्धा तुम्हाला हे जीवन मिळालेले असेल.
मला जाणीव आहे की सद्ध्याचा काळ माहितीच्या , ज्ञानाच्या, वेगवेगळ्या भयाच्या भडीमाराचा काळ आहे. त्यामुळे आपल्याला विचारांचा अक्षरशः ' मेन्टल डायरीया' होतो. तिथे निर्विचार होणे अशक्य होऊन बसते. पण आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. स्वतःच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे पहात रहायचे व हळूहळू मनाला निर्विचार अवस्था प्राप्त करून द्य्यायची. निर्विचार अवस्थेत रहाणे म्हणजेच निर्गुणाचे ध्यान करणे. चला तर मगं ध्यानाला लागू या !!
( हा लेख मी माऊलींच्या कृपेने लाभलेल्या अंतःप्रेरणेने व ऊर्मी ने लिहिला आहे. यात फक्त पुस्तकी माहिती नसून स्वानुभवाचा आविष्कार सुद्धा आहे. )
चित्रे आंतरजालावरून साभार. Happy









©अस्मिता.













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता