कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण

 कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण



त्या विचारांनी तिच्या हस्तांनाही वेग दिला. सकाळची कामं भराभर आटोपली पण मध्यान्ह काही होईना ! मगं गुणवंती मावशीला अजून कार्य सांगण्यासाठी टुमणे लावले, व लोणी काढायचे काम कमळेकडून आग्रहाने स्वतःकडे घेतले. मावशीला ही चलबिचल लक्षात येऊन त्या म्हणाल्याही "अगं तुझी आजची कार्यसंपन्न करण्याची गती बघता तू तर पहाता पहाता भांडभर नवनीत काढशील किंवा तेच भयाने तरंगायला लागेल क्षणभरात !"

या मावशीच्या बोलण्यावर कमळेला फिसकन् हसू आले . तशी मावशी कमळेला कृतककोपाने म्हणाली " तू बरं हसतेस गं , तुला तर कल्पांत लागला असता तरी आम्हाला लोणी काही मिळाले नसते. "

तशी कमळा नारायणीला म्हणाली, " तुम्ही आलात हे बरेच झाले ताई , घराला घरपण आले, कडुनिंबाच्या रसासारखे तुमच्या मावशीचे बोलणे मला कमी ऐकावे लागते आताशी. तुम्ही गेल्यावर तुमच्या मावशीचा नाही तर माझाच हात मोडल्यासारखं वाटणारे मला ."

ह्या सगळ्या संभाषणात नारायणी होतीच कुठे , तिचे मन पुनःपुन्हा कालच्या स्मृतींमध्ये रमत होते.

शेवटी एकदाची मध्यान्ह झाली . मावशीला सांगून नारायणी भराभरा पावलं यमुनेकाठीच्या पायदंड्यांवर पोहोचली सुद्धा. अर्थातच सख्यापैकी कुणीही आलेले नव्हते. तिने स्वतःचे मनातले अव्यक्त यमुनेपाशी मुक्त केले.

" कालिंदी , तू पण माझ्यासारखीच आहेस गं !
जिकडे आयुष्याने नेले तिकडे जायचे. केवळ तूच सरिता नाहीस. आपण दोघीही आहोत. तुला समुद्राकडे जायची ओढ व मला , मला कशाची ओढ, कशाची तरी निश्चितच आहे. पण नेमके कळत नाही. तुझ्या वाटेत पण वळणं, पाषाण, शिळा, अश्म. माझ्या मार्गात अनिश्चितता, किंतु, परंतु, संकटे. अचल व अभेद्य अशा अवरोध करणाऱ्या पाषाणालाही तू हळूहळू भेदून जातेस. तुझ्या वाटेतल्या छोट्या छोट्या उपलकांना तू मुदुल व गरगरीत करून टाकतेस. तुझ्या पदरासम शीतल तरीही ऊबदार प्रवाहाखाली ते निश्चिंतपणे सुखावलेले दिसतात. तुझ्या लहान लहान परिबाधांना तू तुझ्या मार्गाचा भाग बनवून अग्रकमण करत रहातेस. तेच कारण आहे का तुझ्या विशुद्धशील असण्याचे.............."

सख्यांच्या मधुर कोलाहलाने तिची विचारशृंखला तुटली. तिला तसे विचारात गढलेले बघून दीपगौरिका म्हणाली सुद्धा " आज शांत शांत का भासते आहे स्वरूप तुझे.

तसे नारायणीने खळाळणाऱ्या झऱ्याच्या वेगात कालचा प्रसंग सांगितला. कुठल्याही सखीला फार आश्चर्य वाटलेले दिसले नाही.

नित्यप्रभा उत्तरली , " नारायणी तू आमची प्रिय सखी आहेसच गं परंतु तू आता व्रजातील गोपी सुद्धा आहेस. तू वृन्दावनी यावे व आम्हा गोपींपैकी एक व्हावे. अशी त्या श्रीपद्मनाभाची सुद्धा इच्छा होती. जेव्हा तू या प्रसंगाचा स्विकार करण्यास तयार झालीस. तेव्हाच तो प्रसंग तुझ्या आयुष्यात आला. या आधी तुला वेणूवादन का नाही ऐकू आले याचे यापेक्षा अधिक स्पष्टीकरण नाही माझ्याकडे."

सुचरिता म्हणाली "दोन मासापूर्वी अंबिकेच्या मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम झाला होता. गर्गाचार्यांचे शिष्य आहेत कुणी राघवेंद्र स्वामी म्हणून त्यांचा. तेव्हा त्यांनी सांगितले की प्रत्येक नारी ही नारायणीचाच अंश आहे. जी श्रीहरीची रमा आहे, श्रीशंकराची उमा आहे. श्रीहरी रमेविना आणि श्रीशंकर उमेविना अपूर्ण आहेत. सत्य तर हे आहे की ते एकत्र आले की केवळ पूर्णत्व नाही तर ईश्वरत्व प्राप्त करतात."

तिचे उरलेले कथन नित्यप्रभेने पूर्ण केले " हो अगदी , आणि प्रत्येक स्त्री पुरुष त्या ईश्वराचे अंश आहेत. सद्भावनेने केलेले कुठलेही कृत्य तुमच्यातल्या "त्या" अंशाला आनंद देते व पूर्णत्वाकडे नेण्यास सहाय्य करते. आम्हा गोपींची अशी श्रद्धा आहे की आमचा लाडका कान्हाच साकार रूपातला ईश्वर आहे. त्याने बालवयात केलेले अचाट पराक्रम व त्याचे अवीट संभाषण ऐकल्यावर तुलाही हे पटेल,आणि कालचे वेणूवादन ही त्याने तुला चिरंतन आनंदाकडे नेण्यासाठी घातलेली साद आहे ."

हे सख्यांचे बोलणे नारायणीला पटलेही व पटले नाहीही. कारण स्वतःचा पूर्ण विचार झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टी सुलभ वाटतात म्हणून स्विकाराव्यात या विचारांची नव्हती. या सर्व गोष्टींना वेळ देऊन पहावा असे तिला वाटले. तिने तर अजून त्याला पाहिले सुद्धा नव्हते.



वैशाखही असाच सरला. नित्याप्रमाणे तातांचा खुशालीचा निरोपही येऊन गेला. रोज संध्याकाळी श्रीहरीची पूजा आटोपून ती मनातल्या मनात श्रीहरीला विचारायची . "खरंच तूच आला आहेस का मनुष्यरूपात. हा कृष्ण तूच आहेस का श्रीहरी . तुझ्याशिवाय कुठल्याही दैवताच्या उपासनेत मन रमले नाही. तुझ्याशिवाय कुणालाही आराध्य मानता आले नाही, कुणासमोरही सुखदुःख उघडे करता आले नाही. तुझ्याशिवाय कुणीही ह्रदयाला जवळचे वाटले नाही. त्यावेळी तो पावा ऐकून प्रथमच तुझ्या पुजनविधीतून लक्ष कर्पूरासारखे उडून गेले."

"विशेष म्हणजे कसलीही खंत वाटत नाही. उलट या कर्पुराचा सुगंध हवाहवासा वाटतोय. जसे चंदन सहानेवर उगाळताना त्याचे झिजने ध्यानातही येत नाही. पण परिमळाने त्याचे मुग्ध अस्तित्व जाणवत रहाते तसेच काहीसे."

नित्याप्रमाणे आजही बासरीचा ध्वनी आला व तिची पावले सज्जाकडे वळली , तिथेच बांधल्या गेली. नेत्र मिटले आणि ती तिचीच उरली नाही. रोजचेच झाले होते हे.

तिला वाटलेही की जावे का दर्शनाला कृष्णाच्या आणि विचारावे त्यालाच. कोण आहेस तू, मी कोण आहे, मला असे का होते, कुठली माया आहे ही. याची उत्तरं दे नाही तर मान्य कर मी नाही तुझा श्रीहरी !! का त्याच्या दर्शनाने त्याचीच ह्रदयातील प्रतिमा विद्ध होईल.
यावर स्वतःच्या मनाचे निश्चित उत्तर मिळेपर्यंत जे होत आहे ते होऊ द्यावे व अजून थोडी वाट पहावी असे तिने ठरवले.

आषाढ व श्रावण या प्रमाणे प्रसन्नतेने व आर्त उत्कटतेने जात होते. पर्जन्यवृष्टीमुळे सख्यांशी घरातच गप्पा व्हायच्या. बहुतेक वेळा त्या कान्हाबद्दलच असायच्या. त्यातच एकदा आभाळ सरून सुरेख ऊन पडले असता त्यांनी दुसऱ्या दिवशीचा वनभोजनाचा बेत आखला. ताजा खरवस व मिठाया सोबत दशम्या , लोणी व नारळ तीळाच्या कोरड्या चटण्या नेण्याचे ठरवले.

दीपगौरिकेचा आग्रह होता की यमुनेच्या काठाकाठाने दूरवर जायचे व चरण दुखेपर्यंत थांबायचे नाही. ती म्हणाली , " छोटे मोठे सर्व गोपाळ गाईबैलांना चरण्यास याहीपेक्षा दूर जातात. मग आपण कन्या का नाही जाऊ शकत. "

त्याप्रमाणे सख्यांनी घरच्यांची अनुमती घेऊन मध्यान्हेनंतर अर्धा प्रहर निघायचे ठरवले.

।। शुभं भवतु ।।

**************************************
क्रमशः

शब्दसूची .
नवनीत . लोणी
कृतककोप . वरवरचा राग
कल्पांत. युगांत
शिळा, अश्म. मोठे व छोटे दगड धोंडे
उपलक. छोटे दगड, (नदीतले गोल )
कर्पुर. कापूर

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता