काऱ्हळाची चटणी

 काऱ्हळाची चटणी

तुम्ही कदाचित याला काऱ्हळे म्हणत असाल , मग ही काऱ्हळ्याची चटणी होईल.



साहित्य

दोन मध्यम वाटी काऱ्हळं, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, चार चमचे तिखट, दोन चमचे जिरे, एक चमचा मीठ, थोडे तेल.

भाजण्यासाठी टिप...

सगळ्यात आधी काऱ्हळं भाजून घ्या. "मंद आचेवर " हे फारच महत्त्वाचे आहे कारण हे काळे असल्याने कळत नाही रंग बदललेला , मग आपण जास्त भाजतो आणि चटणी कडू होते. स्वानुभव Sad . चक्क फेकून द्यावे लागले एकदा मला मगं कानाला खडा लावला.
काऱ्हळाची चव अगदी nutty/earthy का काय असते तर तिची तीव्रता थोडी कमी करून तरीही ती appreciate करण्यासाठी थोडे भाजणे आवश्यक आहे. एकदा दोन वाटी काऱ्हळं वाया घालवल्यानंतर माझा आत्मविश्वास गेला मगं तर मी microwave मध्येच ताटात पसरवून भाजले तरी चांगली चटणी झाली. यामुळे गेलेला आत्मविश्वास परत आला तर आता मी पुन्हा gas वर कढईत भाजते आहे . Happy

पाककृती

१. काऱ्हळ भाजून घेणे. पटकन भाजतात आणि मूळचा काळा रंग चमकदार दिसायला लागतो. चुट् चुट् आवाजही येतो लगेचच आच बंद करा. व कढई उचलून थंड ठिकाणी ठेवा.

(यात आताच जिरे ही टाकू शकता मी विसरते नेहमीच !)

२. थंड झाल्यावर सगळे साहित्य टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या , मगं पुन्हा थोडे तेल टाकून एकदा फिरवून घ्या. व्यवस्थित भुकटा दिसतो काळा -गडद तपकिरी.

*****खाण्यासाठी टिप...*******

चटणी तयार. तेल टाकल्याने ..पोळीसोबत कोरडी खात असाल तर कमी "ठोठरा" (कित्ती दिवसांत हा शब्द बोलला वा लिहिला नव्हता.) बसतो , थोडी जास्त टिकते व चवही चांगली लागते. दहा पंधरा दिवस टिकते. हवेत आर्द्रता कमी असेल तर जास्तही टिकेल.

वरून तेल किंवा फोडणी घेऊन खाऊ शकता. छान लागते. मुलांना वाढताना तेलाची विहीर -तेलाची विहीर खेळता येते Happy !

******************************











वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खावेत म्हणून अस मी काही नेहमीच करत रहाते. अशीच जवसाची चटणीही करता येते, मी करते सध्या भारतातंन आणलेले काऱ्हळं आहेत तर त्यावर तुटून पडलेय. जवस अमेरिकेत मिळतं पण काऱ्हळं कधी दिसलं नाही. त्यामुळे याचे जरा अप्रुप आहे.
माझे आजोळ लातूर जिल्ह्यातील असल्याने आमच्याकडे आजन्म कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी ही लोकप्रियतेत नंबर एक !. शिवाय तीळ, खोबरे, तीळ-खोबरे, जवस, काऱ्हळं, पूडचटणी ही तिच्या खालोखाल. बहुतेक घरात एकावेळी शेंगदाण्याच्या चटणी सोबत ह्यापैकी एक कोरडी चटणी असतेच असते. याचा फायदा म्हणजे कधी भाजी किंवा वरण यापैकी काही विशेष झाले नाही तर चटणी saves the day.....!

रूची वाढविण्यासाठी वरणभातासोबत , खिचडी सोबत किंवा सकाळी शिळ्या चटणीपोळीचा रोल करून मगभर coffee / चहा पिऊन कामाला लागण्यासाठी !! आम्ही घरात लोणच्याच्या आधीचा अधिक चांगला पर्याय म्हणून कायम चटण्या तयार ठेवतो. मी तर नको उगीच जास्तीचे मीठ म्हणून लोणचं खाणं जवळपास बंदच केलय. अशात वेगवेगळ्या बीयांचा वापर करण्याबाबत चांगले-चांगले वाचण्यात आले आहे. त्यामुळे आवर्जून करते. खरं तर आहाराचा भाग नेहेमीच होता पण आता approval मिळाल्याने महत्त्व कळलेय.
माझा रोजचा स्वयंपाक हा अगदी मराठवाडी पद्धतीने बनवलेला शाकाहारी आणि साधा असतो. त्यामुळे रोजच्या खाण्यात तीळ, जवस , खोबरं (सुकं) , शेंगदाणे, खसखस यापैकी काहीतरी असलेल्या भाज्या आणि काळा मसाला चिंच गूळ घातलेले वरण वगैरे असते. कधीतरी वेळ खाऊ पंजाबी भाज्या किंवा दाळी करते पण त्याचा लवकरच कंटाळा येतो हे निरिक्षण आहे.
मुलगी मागे लागली आहे पूडचटणी कर म्हणून पण खूप पसारा होतो म्हणून पुढे ढकललेय. त्याचीही रेसिपी नक्कीच टाकीन. Happy

*************************************
धन्यवाद Happy !
अस्मिता.

मायबोलीवर पूर्वप्रकाशित.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता