किन्वाची खिचडी (साबुदाण्यासारखी)
किन्वाची खिचडी (साबुदाण्यासारखी)
पूर्वतयारीचा वेळ: ३० मिनिटे
*आलं व हिरव्या मिरच्या भरपूर कारण किन्वाला स्वतःची अशी चव नाही.
**वि. सू. बऱ्याच माबोकर मैत्रिणींनी (तीन) ही पाककृती मागितली त्यापैकी दोघींना विपु सुद्धा केला. आता एकीसाठीच हा धागा काढतेयं असं होऊ देऊ नका.
सकाळी भाज्यांचे सूप व रात्री फ्राइज खाणाऱ्या कधीकधी 'हेल्थ कॉन्शस' मित्रांनो घ्या.
१. मी एका मोठ्या बोलमध्ये किन्वा घेतला.
२. त्याला दोन तीनदा पाणी बदलून व्यवस्थित धुतले.
३. वर थोडं पाणी घातलं.
४. मायक्रोवेव्हमध्ये झाकण न ठेवता दोन दोन मिनिटे असं करतं तीन चार वेळा मधून मधून 'आइस एज' बघत बघत मधून थोडं थोडं पाणी घालत शेवटी किंचित तूप टाकून फिरवले. सगळं लक्ष टिव्हीकडे होतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मायक्रो काय ते बघा. (कुकरमध्ये मी कधी केलं नाही.)
५.मगं अर्धा तास झाकून ठेवले. त्याने किन्वा फुलतो व मऊ आणि मोकळा होतो. ही पायरी आली की अर्धी लढाई जिंकलीच !
६. काट्याने मोकळा करून घ्या. थोडा थंड होऊद्या. हे पुष्कळ आधीही करता येईल.
७. सढळ हाताने तूप टाकून (थोडे तेल सुद्धा म्हणजे तूप करपत नाही) , तापल्यावर जिरे मगं तडतडं वगैरे झाले की आलं , हिरवी मिरची पेस्ट फार बारीक नको.
८. हे बहुतेक एखाद्या मिनिटात होईल , मगं उकडलेल्या बटाट्यांंच्या फोडी , हे सगळं तूप तेल गट्ट करतात. वाटलं तर इथे फोडणीत पुन्हा तेल &/तूप टाका .मगं शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतून घ्या. (आच मध्यमपेक्षा कमी, नाही तर आलं करपतं. )
९. यात शिजवलेला किन्वा , दाण्याचा अर्धबोबडा कूट, मीठ , किंचीत साखर घालून व्यवस्थित मिसळून घेत , परतत रहा.
(आच वाढवून)
१०. परतत/हलवत रहा, परतत/हलवत रहा, परतत/हलवत रहा.
११. झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा काढा. (आच मध्यम)
१२. लिंबू पिळून &/ दह्याशी खायला घ्या.
बऱ्यापैकी 'हाय फायबर हाय प्रोटिन' पाककृती आहे. ही अगदी साबुदाण्यासारखी काही लागत नाही पण छानच लागते , त्यामुळे महागडा 'किन्वा' आणून निराशा झाली तर माझा राग राग करू नका. ही मला आधीच लिहायची होती पण कोरोनाकाळात महाग घटक पदार्थ असलेली पाककृती देणे प्रशस्त वाटत नव्हते. आता दिली , झालं. चुभुद्याघ्या.
'किन्वा' कसा दिसतो , त्यातील पोषणमूल्यं कुठली याची ढोबळ माहिती देणारा हा एक फोटो
हा मी केलेल्या किन्वा खिचडीचा फोटो
कुणी मागेल असे न वाटल्याने स्टेप बाय स्टेप फोटो नाहीत.
धन्यवाद.
* महाग वाटत असेल तर आवर्जून आणून खावं असं किन्व्यामध्ये काहीही नाही. हे एक हेल्दी सबस्टिट्यूट आहे.
१.गरमगरम खावा.
२.साबुदाणा, साबुदाणा करत हळहळत राहू नये.
३. ही खिचडी आणि कोशिंबीर किंवा एखादे Salad बऱ्यापैकी समतोल आहार होईल असं वाटतं. मी तरी तसंच करते.
४.'आइस एज-1' धमाल आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा