निखळ आनंदास-गोविंदासही

 


निखळ आनंदास-गोविंदासही

कोणे एकेकाळी.....
अभिनेता गोविंदा मला कधीही क्लासी वाटायचा नाही. एवढंच काय ज्यांना तो आवडतो तेही क्लासी नाहीत हेही मी ठरवले होते. स्वतंत्रविचारसरणीमुळे सगळ्यांचा क्लास मीच ठरवायचे. बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. अजूनही जुन्या अस्मिताचा रेसेड्यू माझ्यात आहे व तो अधूनमधून फणा काढतोच.

गोविंदाचे डोळे हे चंचल नेत्र होते, असे लोक मला आजही विश्वासू वाटत नाहीत ,जणू काही मला गोविंदासोबत इस्टेटीचे व्यवहारच करायचे होते. माझ्या भावाला गोविंदा आवडायचा. तो व्यापार खेळताना जेव्हां वडिलोपार्जित धन रूपये दोन हजार पाचशे पन्नास जिंकायचा तेव्हा त्याला हर्षवायू व्हायचा. इथे मी बँकेशेजारी मांडी ठोकून बँकेतला अर्धा माल हडप करायचे त्याला कळायचं सुद्धा नाही.

शिवाय तो इतका भोळा होता की त्याला फसवणं फार सोपं होतं , आळशी असल्याने मला अवघड कामापेक्षा सोपे काम आवडते म्हणून मी त्याला जन्मभर फसवलेलं आहे. नीतिपाठ दिले नसते तर मी कुठल्या कुठे गेले असते आणि आज नेटफ्लिक्सने माझा माहितीपट लावला असता. असो. (बायदवे, हे 'असो' किती सत्तरीतले वाटते नं ,असो !)

या दोन हजार पाचशे पन्नासात होणाऱ्या हर्षवायूमुळे तो अल्पसंतुष्ट आहे , गोविंदा न आवडला तर नवलच हा विचार मी मनात करायचे. माझ्या सगळ्याच भावांना गोविंदा फार आवडायचा , त्यामुळे मला आमच्या घरी व आजोळी सुटका नसायची, त्यांनी माझा मेंदू धुवायचा पुष्कळ प्रयत्न केला पण मी नर्मदेतल्या गोट्यासारखी अभेद्य राहिले. मी एखाद्या माणसाबद्दल एकदा मत बनवले की नंतर माझे मत बदलले असले तरी मी ते कबूल करायचे नाही. त्याने मला कमीपणा येईल असे वाटायचे ,कमीपणापेक्षा खोटारडेपणा अहं पोषणासाठी पूरक व बुद्धीसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे मी वाका-वाका करेल पण मोडणार नाही या तत्वावर जगायचे !!

आजोळी गेल्यावर मात्र त्याला सोबत म्हणून चार भावंडं मिळायची ,सगळी मुलं. बहिणी खूप लहान किंवा खूप मोठ्या होत्या. मगं मला एकटीने खिंड लढवावी लागायची. सारखं गोविंदाची गाणी आणि सिनेमे ,आनंदाने एकमेकांना ओरडून ओरडून हाका मारून त्या वाड्यात असतील तर या वाड्यात रंगीत टिव्हीवर बघू अशा गोविंद-योजना व्हायचा.

क्वचितच लाइट असायची, म्हणजे असल्यावर आवर्जून सांगावे अशी परिस्थिती. आमच्या घरी परतल्यावर रात्री जेवताना ताटातलं अन्न दिसायचं ह्याचंच काही दिवस अप्रुप वाटायचं. पण मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात केलेल्या अंगतीपंगतीच्या आनंदामुळे प्रेमळ सोबतीची किंमत कुठल्याही भौतिक गोष्टींपेक्षा जास्त असते हे आता कळतयं !!

भर उन्हात बाहेर खेळायला जाता आले नाही की दुपारी घरी टिव्ही बघणे व्हायचेच. पत्ते, व्यापार लपाछपी यात तास दीड तासातल्या क्वॉलिटी टाइम मधली क्वॉलिटी संपून भांडणे सुरू व्हायचेच. तुझा पत्ता जळाला , तू पैसे चोरले , बुडवले , चार पडले होते तरी जेल नको म्हणून खोटंच सहा म्हटले , तू मला धप्पा जोरात देऊन स्कोअर सेटल केलास, माझ्यावरंच का राज्यं सारखं अशा ना ना तर्‍हा असायच्या. असे राडे सुरू झाले की मामा टिव्ही बघण्याचा आग्रह करायचा. बाकी बायाबापड्या ज्यानं टिव्हीचा शोध लावलायं त्याचं भलं चिंतायच्या. कुणीतरी 'काय माय कडंकडं करतात लेकरं आम्ही नव्हतो अशे' हे सुविचार रिपीट करायचे. सगळ्याच मुलांना ऐकावे लागणारे त्रिकालाबाधित सत्य...!!

तर लाइट असणे म्हणजे या छोट्या खेड्यात कपिलाषष्ठीचा योग , त्यात टीव्हीवर गोविंदाचा सिनेमा लागणे म्हणजे आधीच 'मर्कटा त्यात मद्य प्याला' गत व्हायची. कोणीच खेळायला नसल्याने मी पहायचे अगदीच आनंदाने पहायचे पण पाहिल्यासारखं करतेयं असं दाखवायचे.

'राजाबाबु' सारखा आचरट सिनेमा किती वेळा पाहिलायं गणतीच नाही. तोच कशाला सगळेच नंबर वन माळेतले सिनेमे अनेक वेळा बघत हसून धमाल केलेली आहे. तो सुट्ट्यांचा एकत्र वेळ बरेचदा अशा हलक्याफुलक्या सिनेमांमुळे व त्या मुग्ध /बावळट सहवासाने मजेदार गेलायं. आताही पुन्हा पहाते तेव्हा मनाने त्या आश्वस्त काळात जाऊन येते. उगाच !!

कधीतरी 'उगाच' वाटणाऱ्या गोष्टीही कराव्यात, मन रमतं. बरेचदा त्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट कुणासोबत केली हेच महत्त्वाचे ठरते , म्हणजे ते फक्त निमित्तं असते. प्रत्येकाला असं निमित्तं हवं असतं , ज्यात पुन्हा लहान व्हावं, पुन्हा वेडं व्हावं.
गोविंदा मला आवडतो का याचे उत्तर अजूनही मला माहिती नाही , आणि मला जाणूनही घ्यायचे नाही. जाणून घ्यायला वापरावी लागणारी बुद्धीही खर्चायची नाही , निर्मळ आनंद घ्यायचा. खरंतर हा लेख त्या गोविंदाबद्दल ही नाही फक्त निर्भेळ आनंदाचा कुठलाही क्षण 'गोविंद' होऊ शकतो. कधीतरी मोठमोठ्या तात्विक गोष्टींचा कंटाळा येतो, कशाचा ताळमेळ कशाला रहात नाही, आपण माणूस आहोत की घाण्याला लावलेला बैल वाटत रहाते. तेव्हा असे एकदोन क्षणही मनाला रम्य अशा आश्वस्त काळाची सहल करून आणतात.

कधी उठताबसता पायाला कळ लागली किंवा चालताचालता ठेच लागली की आई 'गोविंद, गोविंद' म्हणायची तेव्हा मी तिला नेहमी गोविंदाच का कधीतरी 'शाहरूख खान-शाहरूख खान किंवा अक्षयकुमार-अक्षयकुमार' म्हण की म्हणायचे, तसं ती 'परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला' नजरेने बघायची व "पाप लागेल गं मला" म्हणायची. पापपुण्य वगैरे आहे की नाही माहिती नाही पण हा लक्ष विचलित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे आता कळतयं. शेवटी कधीतरी एक उगाच वाटणारा निर्भेळ आनंदाचा क्षण सुद्धा माणसाला असंच तवानं करून जातो. तो कसा शोधावा हे आपण आपलेच ठरवावे.

Because, sometimes greatest moments in life are the simplest..!! आहे त्या वेडेपणाला/बालपणाला सांभाळून घेऊ ,आणि पुरवून पुरवून वापरू , मुग्ध आहे पण अमर्याद नाहीये ते !!

--

अटी त.टी. हे लेखन विनोदी आहे का हलकेफुलके ललित ते कळत नाहीये. विनोदी म्हणजे अर्चना पुरण सिंह आणि हलकेफुलके म्हणजे मंद हसणारे नारदमुनी , किंवा दोन्हीच्या मधले... तुम्हीच ठरवा. Wink

आभार
©अस्मिता

  प्रताधिकारमुक्त चित्र आंंतरजालाहून साभार #कूलअँडस्मार्ट.कॉम.

मायबोलीवर पूर्वप्रकाशित


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12th Fail (Hindi movie)

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

हृता