मोगरा फुलला

 








रूक्मिणीचे अंगण , काय नव्हते तिथे... वेगवेगळी झाडं, वेलींच्या महिरपी, फुलांची गर्द राई. सतत निरनिराळे प्रयोग करायची रूक्मिणी, गावभरच्या लेकीबाळी हक्कानं फुलं, पानं न्यायच्या. श्रावणातल्या मंगळागौरीला तर स्वतःच्या हाताने वेण्या माळून कौतुकाने द्यायची. अंगण आणि तिच हसू कायम फुललेले असायचं. पण घरामागच्या मोगऱ्यात तिचा विशेष जीव,किती पसरलाय... घरभर सुवास दरवळत असतो.
   
   रूक्मिणी काळीसावळी जरा बुटकी म्हणावी अशी, तेल लावून एक वेणी व चापूनचोपून बसवलेली साधीशी फिक्कट रंगाची सुती साडी नेसलेली. पण कधीही गावातल्या कोणी तिला निराश व दूर्मुखलेलं बघितलं नाही. सतत हसतमुख, मदतीला तत्पर व पानाफुलांत, मळ्याच्या कामात गुंतलेली....
      

    तिचं लहानपण हालाखीच्या म्हणता येईल इतक्या गरीबीत गेलं.. ती झाली तेव्हा आईबाबाला कोण आनंद झालेला. साध्याशा भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात हे तिघं आनंदाने रहायचे, पण रूक्मिणी आठ वर्षांची असताना, आई जिथं कामाला जायची तिथल्या गच्चीवरून पाय घसरून पडली आणि..... जिथे दोन वेळंच्या पोटाच्या भरतीची मारामार तिथे महागड्या उपचारासाठी पैसे कुठून आणणार.
  
     रूकू सावरली, ती लहान व बाबाची माया अपार होती...... दुःख मागे टाकायला शिकली. बाबासोबत मोठ्याघरांच्या बागांची कामं करायला लागली. बाबा एका मोठ्या घरी जायचे, तेथील काका कित्येक वर्ष शेतकी कॉलेजात प्राचार्य होते, रूकू त्यांना 'झाडांचे काका' म्हणायची , ते रूकूला नवीननवीन रोपांबद्दल, ऋतूबद्दल, खतांबद्दल, मातीबद्दल गप्पा मारत बरीच माहिती द्यायचे. रुकूही काकांकडून अधाशी शिष्येसारखं सगळं शिकत गेली. कृतज्ञता म्हणून रुकू रोज वेगवेगळे पुष्पगुच्छं त्यांच्या खोलीत ठेवायची. काकांनाही तिचं कौतुक होतं, शेतकी कॉलेजच्या इतक्या वर्षांच्या सेवेतही कधी असा होतकरु विद्यार्थी मिळाला नाही असे ते म्हणायचे.
    
   रुकू मोठी होत गेली, कॉलेज जरा दूरवरच्या शहरात असल्याने व बाबांची तब्येत खालावण्याने तिचं शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहीलं. एके दिवशी साध्याशा तापाचं निमित्तं होऊन तिचा बाबा तिला सोडून गेला. यावेळी तर दैवाने सावरायलाही वेळ मिळू दिला नाही. काकाकाकूंना त्यांचे भाड्याचे खोपट हवे होते व रुकू नको होती. भावाचे भाड्याचे घर कूळ करून बळकवावे असा काकाचा विचार होता. रुकूच्या सुखदुःखाशी कुणाला देणंघेणं नव्हतं. त्यात काकूच्या बहिणीने तिच्या गावातील एका सधन, वयस्क बिजवराचे... महेशरावांचे स्थळ सुचवले. रुकूला न सांगता सवरता तिचे लग्न ठरवून काकूने गावात मिरवून घतले. गरीबाला असते ती फक्त निकड, ती इतकी मोठी असते की नीतिमत्ता व प्रेम यांना जागाच रहात नाही. रुकूने ह्यालाही नियतीची इच्छा समजून स्विकारले.
   
 
   लग्नं अगदी साधेपणाने पार पडलं, तिकडे हौस नव्हती इकडे पैसा!
त्यात महेशरावांचे हे दुसरे लग्न म्हणून त्यांच्यासाठी ही फक्त एक औपचारिकता होती. घराला घरपण आणण्यासाठी त्यांच्या एका आत्याने हा खटाटोप घातला होता. महेशरावांना जवळचे कोणी नव्हते व जवळीक करण्यात रूचीही नव्हती. त्यांची पहिली पत्नी हेच त्यांचं खरं प्रेम होती, ती गेल्यानंतर त्यांनी माणसं तोडून दारूशी मैत्री केली. अर्थात हे सगळे तपशील रूकू सोडून बाकीच्यांना माहितीही असतील पण तिला सांगण्याची तसदी कोणी घेतली नाही, एवढंच काय तिला माणूस समजण्याची देखील कुणी तसदी घेतली नाही. तिचे नवीन घरात, नवीन आयुष्यात अगदी यांत्रिकपणे स्वागत झाले. थंडपणे तिही नियतीला सामोरं गेली.
     
    दुसऱ्या दिवशी घरच्या मोलकरणीने तिला घर दाखवले. नव्या सुनबाई आल्यामुळे आज तिचा शेवटचा दिवस होता. घरामागे पुष्कळ जागा होती, वेडीवाकडी वाढलेली काटेरी झाडं, सुकलेले गवत, मुंग्यांची वारुळं, फरश्यांचे तुकडे व अर्धवट टाकलेल्या बांधकामाचे सामान होते. रूकूने नवीन आयुष्याची सुरुवात बागकामापासून करण्याचे योजिले. साफसफाई करण्यात तिचा बराच वेळ जायचा , पण घरी ती आणि महेशराव दोघंच असायची, महेशराव कामानिमित्ताने दिवसभर बाहेर असायचे, कधीकधी परगावीही जावे लागायचे. आल्यावरही दोन घास खाऊन, झोपी जायचे, बरेचदा ते नशेत असायचे. अशा अवस्थेत तिच्या कमी उंचीवरून, काळ्या रंगावरून ते तिचा पानउतारा करायचे, पहिल्या बायकोच्या आठवणीने मोठमोठ्याने रडायचे. हा तमाशा बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून रुकूची तारेवरची कसरत व्हायची. सकाळी महेशराव तयार होऊन तडक बाहेर निघून जायचे, जणू रात्री काही झालंच नाही. हळूहळू हे रोजचेच झाले, रुकू शांत शांत होत गेली.

      पावसाळा आला तसा तिच्या बागेला बहार आली, तिचे कष्ट फळाला आले. 'झाडांच्या काकां'कडून तिने पुष्कळ फुलांची रोपटी आणून लावलेली होती. सुरेख फुलांनी तिच्या गडद आयुष्यात काही रंग शिंपडले. काही फळंही होती, काही रंगीत पानांची छोटी झुडपं होती.  रुकूच्या बऱ्याच ओळखीही होत गेल्या, सगळ्या गावातली लोक फुलंपानं वेचायला , रोपांची चौकशी करायला रुकूकडे यायला लागली. बघताबघता पाच वर्षे उलटली, तिच्या बागेत कित्येक बहर येऊन गेले पण आयुष्यातला एकटेपणा गेला नाहीच. महेशरावांच्या रोजरोजच्या अपमानास्पद वागणूकीने तिचे काय चुकतेय हेच तिला कळायचे नाही.



      आता त्यांचे पिणे व दिवसदिवस बेपत्ता रहाणे गावातल्या लोकांपर्यंत पोचले होतेच. लोकांना चर्चेला विषय मिळाला होता, काही बरी लोकही होती पण ती रुकूच्या दुर्दैवापुढे हतबल होती, चार अश्रू ढाळायची, तिची विचारपूस करायची पण तिची मदत कशी करावी हे कुणालाही कळायचे नाही. एके सकाळी बागेतली काही फुलं गोळा करून तिने महेशरावांच्या खोलीत छोट्या परडीत ठेवली. ती परडी बघून महेशरावांचा संतापसंताप झाला, त्यांनी परडी उचलून बाहेर फेकून दिली व अद्वातद्वा बोलायला सुरुवात केली. आज ते पूर्ण शुद्धीवर होते, तिच्यासारख्या गरीब व रंगरूपाने ओबडधोबड मुलीने स्वतःची लायकी विसरून असे वागणे शोभत नाही. . त्यांच्यामुळे एका गरीब अनाथ मुलीला एक आसरा मिळाला आहे. त्यांनी हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध केले आहे व ते तिला मनात कधीही पत्नीचे स्थान व मान देणार नाहीत, हेही त्यांनी बोलताबोलता स्पष्ट केले. आता मात्र रुकूची सुखी भविष्याची आशा संपली होती.  रुकू दिवसभर रडली , देवाला तिची नेमकी चूक काय हे विचारत राहीली ! असेच दिवस जात राहिले.




:
:
:
:
:
:
  


     आज आठ महिने झाले महेशराव बेपत्ता आहेत, कोणी म्हणतं ट्रकने उडवलं, कुणी म्हणतं पळून गेले, कुणी म्हणतं नशेत रेल्वेखाली आले, कुणी म्हणतं येतील नेहमीप्रमाणेच, यावेळेस थोडे जास्त दिवस घेतील, कुठं जाणारेत.... पण रुकूला माहिती आहे ते कधीही येणार नाहीत, कधीही नाही. कारण तिनेच तिची नियती व्हायचं ठरवलं होतं. त्या दिवशी 'झाडांच्या काकां'कडे नेहमीप्रमाणे ती गेली असताना, गप्पांमधे तिला ज्याच्या एका घोटानेही माणसाचा जीव जाऊ शकतो अशा एका किटकनाशकाबद्दल कळलं, 'पॅराक्वाट डायक्लोराईड' हे नाव घोकत घोकत ती घरी परतली. काही दिवसांनी हिंमत करून तिने ते आणले व घरामागच्या बागेतल्या कोनाड्यात लपवून ठेवले. ती योग्य वेळेची वाट बघत राहीली, नियतीनेही योग्य वेळ आणायला फार काळ घेतला नाही. नित्याप्रमाणे अपरात्री महेशराव झोकांड्या खात घरी आले, तिने गारगोट्या शिजवून वाढल्या असत्या तरी वरणभात वाटावा अशा बेधुंद अवस्थेत ते होते . त्यामुळे स्वयंपाकातला हा 'रूचीपालट' त्यांच्या लक्षातही आला नाही. त्यांच्या भक्कम आहाराचे तिला आज प्रथमच समाधान वाटले. आज त्यांच्या आवडीचा स्वयंपाक होता. ते पोटभर जेवले, हात धुवायला उठताना शेवटचे वाक्ताडन करायला सुरू करताच ते कोसळले. वर्षानुवर्षाच्या व्यसनाने शरीर दुर्बळ झालेले होतेच. दारू आणि किटकनाशक एकत्र येण्याने त्यांचा जीव रक्ताच्या उल्ट्या होऊन ताबडतोब गेला. मागच्या बागेत रोज रात्री थोडंथोडं खंदून रुकूने बराच खोल खड्डा केला होता. तिच्यामते हे सर्व करताना जो बुटकेपणा आणि काळा रंग महेशरावांना आवडायचा नाही , त्या बुटकेपणाने ती सहज लपल्या गेली व काळ्यारंगाने अंधारात ती त्यांच्या दृष्टीसही पडली नाही. महेशरावांचे प्रेत तिने ओढतओढत आणून खड्ड्यात टाकून दिले व वर भरपूर काळी माती टाकून खड्डा बुजवून पहाटे त्यावर मोगऱ्याचे मोठे रोप लावले. तिला फार आवडायचा मोगरा!!

      तिच्या बाबांनी दिलेला रेडिओ , जो महेशरावांनी फेकून द्यायला सांगितला होता तरी तिने माळ्यावरील फडताळात गुंडाळून ठेवला होता, तो रेडिओ आता ती रोज संध्याकाळी लावते,  'मोगरा फुलला' गाणं लागलंय , तीही गुणगुणतेयं, नवीन लग्न झालेल्या पोरीबाळी मंगळागौरीसाठी फुलं वेचायला जेव्हा येतात तेव्हा रुकू त्यांना आवर्जून मोगरा न्यायला सांगते, मोगऱ्याची टपोरी फुलं न्यायला त्यांनाही आवडते . आता रुकूला तिचे रंगरूपही आवडते , तिचा आत्मविश्वासही परत आलाय. रुकूने शेतकी कॉलेजात प्रवेशही घेतलाय, तिच्या स्वप्नांसारखाच मोगऱ्याचा वेलही वरवर जातोय, बहरतोय !!!!


©अस्मिता
फोटो साभार विकीपीडिया




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऑपनहायमर

हृता

बंदिवान मी ह्या संसारी