काही गाणी आणि आरस्पानी

     







काही गाणी आणि आरस्पानी


   बन लिया अपना पैगंबर
   तैर लिया सात समंदर
   फिर भी सुखा मन के अंदर
   क्यों रह गया
   रे कबिरा मान जा....
   रे फकिरा मान जा..
  आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया



    साप जसा कात टाकतो तशी मी लिहिते, दुसरी इतकी चपखल आणि क्रीपी उपमा याक्षणी तरी आठवत नाही. काही तरी साचल्यासारखं वाटतं , व्यक्तं झालं की मोकळं होऊन आपापल्या मार्गाला जाता येतं. सापाला त्याचाच भाग असलेल्या काती विषयी काही विशेष आसक्ती वाटत नाही पण मुक्तताही हवी असते आणि सक्तीही नको असते, तसंचं काहीसं होऊन बसतं, बहुतेक मी विचित्र आहे, माझा प्रवास आरस्पानी असावा एवढाच आग्रह आहे !

    प्रवासात काही का येईना सगळी बेटंच आहेत, ध्रूवपद नाही, हे कळाल्याने बहुदा बऱ्याचशा गोष्टी 'whatever' गटात गेल्यात. भारतातून परत येऊन तीन महीने होतील, यावर वैयक्तिक न होता लिहावं असं वाटलं. पण पझलचे हजारो तुकडे एकदाच अंगावर पडल्यावर कसं लिहिणार. जे मलाच कळत नाहीये ते कसं बांधणार, वाचणाऱ्याला कसं समजणार !!! अधिकतर आठवणी स्मृती होतात, काही आपलाच अंश होऊन पुनःप्रत्ययाचे ecstatic झटके देत रहातात.

    बंधन है रिश्तों में, काँटों की तारें हैं, पत्थर के दरवाज़े, दीवारें
बेलें फिर भी उगती हैं और गुच्छे भी खिलते हैं
और उछलते हैं अफ़साने, किरदार भी मिलते हैं

     बंधनांचे कुंपनही असावे आणि फोफावायचं स्वातंत्र्यही, फोफावनंही आखिवरेखीव लागतं. पुनःपुन्हा येणाऱ्या वसंतात आपलेच आलेगेलेले बहर बघत आपल्या स्वतःशी असलेल्या नात्यातल्या व्यक्तिरेखांच्या भेटी घेत बसणे म्हणजे आयुष्य. हे अजून कमी होतं की काय म्हणून त्या आपलेच अवशेष म्हणावे अशा जागांनाही भेटी देऊन आले.  काही जागांमधे आपण कुणीच उरत नसतो म्हणून त्या विसाव्याच्या होतात. मी लिहिलेल्या पहिल्यावहिल्या लेखात उल्लेखिलेल्या कृष्ण मंदिरात जायची इच्छा मी मैत्रिणींना फोनवर बोलून दाखवली. ह्यांच्या अंगात कल्पवृक्ष आलाय, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहेत.

   "ओ.. आकाश, ओ.. पलाश राशि राशि एकतु सोबुजे चोख मुछिये दे…घोर छरा मनुशेर मोने", ह्या माझ्या आयुष्याच्या प्रवासातला पलाश आहेत, नेहमीच बहरलेला व सावली देण्यास आतुर असलेला. आम्ही सगळ्याच डोक्यावर पडलेल्या आहोत त्यामुळे कुणालाही कधीच एकटं वाटत नाही. माझी व्यवस्था(?) ठेवण्याची जबाबदारी ओढवून घेतात. गाडी चालेल का कार मागवू, एसी लावू की बंद करू, पाणी उकळू का बिस्लेरी आणू, बाहेर खाशील का घरी करू..... वगैरे सगळे मला विचारल्यासारखं करत आपसात ठरवतात. मी कितीही जीव तोडून सांगितले की मला अमेरिकेत कुणी काळं कुत्रंही विचारत नाही, फक्त हे म्हणायला वाव राहू नये म्हणून एक काळ कुत्रं मी आठवडाभर फॉस्टर केलं होतं. याउपर माझीच अवस्था श्वानसमान आहे तरी ते साफ दुर्लक्ष करतात. फार ओरडलं तर 'म्हणून तर करतोय' म्हणतात, मगं मीही गप्प बसते. तेथे लोकांच्या हातात सुत्रं देऊन गाडी काढली की बसा आणि त्यांना ठरवू द्या, या लहानमुलीच्या मोड मधे जायचं ,बस्सं!
 
      गेलो मगं त्या 'निरंजना'स भेटायला,  तो तसाच उभा आणि आम्हीही तितक्याच मख्ख. चौथा मित्र म्हटल्यावर त्याने का आमची उठबसं करावी, आणि आम्ही तरी त्याला फार मान का द्यावा, 'व्हाट्सप वर आहेस का विचारलं नाही एवढंच खूपंय' , त्यानी मात्र मला सगळ्या 'व्हाटस्प स्टेटस माहिती गं' असे मिश्किल भाव आणलेले. देव्हाऱ्यात पांघरायला गोंडे असलेले सुंदर मोरपंखी-चंदेरी वेलबुट्टीचे मोठे वस्त्र तिने आणलेले, सगळं दोघींकडून असतं नेहमीच, कुणीकुणाला सांगतविचारत बसत नाही. पुजारी काका थोडे नाराजंच, तुम्ही सुळसुळीत वस्त्र निवडले, आता ते देव्हाऱ्याच्या पायऱ्या वरून घसरणारच. यावर मी नवीन वस्त्रासाठी पैसे ठेवले, व दानपेटीत काही टाकले. सगळं जगंच ज्याचं आहे, जो 'जगदीश' आहे , मी त्याच्या दानपेटीत दोनशे रूपये टाकायचं नाटक करू का, करतात म्हणे ! कसंच औदार्य आणि कसचा दानधर्म. ती म्हणे, 'आपली दानत टिकावी म्हणून आहे हे, त्याच्यासाठी नाही कै'.  दोघींच्याही आजोबांच्या पुण्याईने कुठेही घुसून, हवं तितका वेळ कोणत्याही 'त्या'च्या सहवासात रहायला कुणी मनाई करत नाही.  उलट 'अजूनही विसरला नाहीत, किती वर्षांनी आलात गं' वगैरे आस्थेने विचारपूस होते. अजून दहापंधरा वर्षांनी कुणी ओळखणारंही राहणार नाही, तोपर्यंत करावी ठाकुरकी !

मैं ता गुल से लिप्टी तितली की तरह मुहाजिर हूँ
एक पल को ठहरूं
पल में उड़ जाऊं
वे मैं तां हूँ पगडंडी लब्दी ऐ जो राह जन्नत की
तू मुड़े जहाँ मैं साथ मुड़जाऊं
तेरे कारवां में शामिल होना चाहुँ
कमियां तराश के मैं क़ाबिल होना चाहुँ
वे की करां


      कधीकधी वाटतं अदृष्य राहून अधिक आरस्पानी राहता येतं किंवा एकदम प्रकट होऊन जग हालवता येतं, दोन्ही जमत नाही मगं स्वत्वाचे लपंडाव खेळत वेळ काढायचा. सगळ्या जगासोबतही रहायचंय आणि स्वतःचं वेगळेपणही जपायचं आणि खाली म्हणून यायचंच नाही. Don't lower your vibe to find your tribe म्हणे. कुणीतरी ,कुणालातरी , कुठंतरी नक्की ओळखलंय. बाहेर आलो दोघी, आतले दादा होते त्यांच्याशी ही बोलत होती , माझा कसलाच संपर्क नसल्याचे मी हुं हुं करत इकडेतिकडे वाड्यात बघत बसले होते. रावांची नात बऱ्याच जणांना शिष्ट वाटते, याचा मी अनेकदा फायदा घेतलाय.  चिरा पडल्यात भिंतींना त्या बुजवून रंग दिलेलाय, वडाचं झाड कसल्यातरी वादळात  कोसळलं म्हणे. त्या जागी पूर्ण वाढलेला पिंपळवृक्ष आलाय, हे बघून, 'मी किती वर्षांनी आले असेन' याचं वांझोटं त्रैराशिक मांडत बसले. आईला जावं लागलं मगं मला येता आलं, हे उत्तर आलं. आणि लोक म्हणतात, तुझ्या आईसारखी सात्त्विक व घरंदाज स्त्री पंचक्रोशीत नव्हती. ही विषण्ण-लीलाही तुझीच...! 

      'पोरी आल्यात लांबून असंकसं पाठवणार', चहा पोह्यांचा अगदी प्रेमळ आग्रह झाला. पण अजून दोन मित्रांना भेटायचं ठरलं होतं म्हणून ती उठली, मी निघाले. बाहेर आलो तर अजून दोनचार मंडळी बोलण्यास उत्सुक, त्यापैकी एक गवळीण आजी, अगदी साध्या, अशिक्षित, गरीब तरीही पन्नास वर्षांपासून रोज न चुकता कान्हासाठी दूध आणतात. हे खरे गोपीजनवल्लभ !! आपल्यात तर काहीच समर्पण नाही , तूप खाल्लं की रूप पाहिजे.
'खूलभर दूधा'चे सलेक्टिव तात्पर्य जपणारे. ती मितभाषी, 'तेच तर' म्हणाली. 'तिच्या वाटचं मी बोलत आलेय,म्हणून तिला फार बोलायची गरजच नाही राहिली' म्हणाली होती एकदा. बरं का वाईट कुणाला माहिती , आयुष्यातला एकच महिना आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. कारण ती एक महिना लहानंय !
  
     गोदावरीच्या आणखी जवळ गेलो , पन्नास पावलांवर काठ. राम तिष्ठत होता. आम्हाला खिडकीतून बघून वर रहाणाऱ्या वैनी लगबगीने किल्ली घेऊन आल्या, 'या'चा सगळा कारभार ह्यांचे कुटुंब बघते. नवीन रंग दिलेला असल्याने स्वच्छ वाटत होते, कोव्हीड काळातला सोहळ्यांचा उपवास राम सोडणार होता , जसं काही याला मोठं आवडतंच ते ! राम तसाच बघत, काळ्या सहनशील डोळ्यांनी. संधी मिळाली की वनात सुटणाऱ्या लोकांपैकी तू एक , कुठं अडकलास रे ?! तसंच पाहिजे. मंदिर उघडलं . याला काय मागू मी , याने याच्या बायकोची साथ दिली नाही आपली देईल का?? तूही हरवला-चुकला असशीलच म्हणा.

नैनो के घाट ले जा नैनो की नैय्या
पतवार तू है मेरी, तू खेवैया
जाना है पार तेरे, तू ही भंवर है
पहुँचेगी पार कैसे नाज़ुक सी नैय्या


    'या गं दोघी, रामनवमीला मोठा उत्सव आहे, गाण्याचा मोठा कार्यक्रम आहे.'  , दिवे लावले पोरींनी, दसऱ्याच्या व नवमीच्या स्मृतींना भेटी देत दोनच सुस्कारे सोडले. चपला सोडायच्या कोनाड्यावरच्या भिंतीवर व्रात्य कार्ट्यांनी 'पादत्राणे येथे सोडा'च्या 'त्रा'वर चुना फासला होता. ते नवीन रंगाने मिटवले. पुन्हा एक वांझ त्रैराशिक !! नदीकाठचे लोक म्हणजे द्राव्य , वाहता तेवढे येते. कसचं कसचं, 'काल प्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम' , मगं युवतींनी तरी काय करावं . स्वतःशी कसं भेटावं?

     आणखी पुढे म्हणजे नंदीग्रामाचे ग्रामदैवत , सगळे नदीकाठचे प्लॉट तूच बूक करतोस ना बैराग्या. उघड्यावरंच ओटा, सरपटत जावे इतके छोटे दार. तिथे कबुतरांनी केलेली घाण, नदीवरचा दाट हिरवट थर , वडाचे झाड , कोमट वारं, त्याबरोबरच कसलातरी धुरकट वास, प्रचंड आर्द्रता, पिवळसर रोगट संधीप्रकाश, बाजूच्या मशिदीची बांग, नदीवर चोरट्या पावलांनी दाट होत जाणारा अंधार, सेन्सरी ओव्हरलोड . मंदिर बंद. तसंही फिरून संपलंच होतं सगळं ,परत फिरलो.

    आळंदीला गेले होते , ज्ञानी मुलाला भेटायला. तो माया सर्वांवर करतो , ज्ञान मात्र तोलामोलाच्या मोजक्या लोकांनाच देतो, त्यालासुद्धा रक्त आटवूनच मिळालंय, फेअर इनफ!! आपण आपलं यडं बघितल्यासारखं-हुरहूरल्यासारखं जरतरचे अंदाज बांधत हिंडायचं आणि यायचं परत. वारकरी रानावनात, रस्त्याच्या कडेला, काट्याकुटात, मिळेल त्या अन्नात, मेणकापडावर रात्र काढत... केवळ त्याच्या ओढीने येतात . मी मात्र एसीत झोप काढून, व्यवस्थित नाश्ता करून, नेहमीची एकादशी सुद्धा टाळून, ओलाने जाऊन चंदनाचा टिकला लाऊन आले, हे त्याला दिसलंच असेल की! तू असायची असतीस, हा सगळा काथ्याकूट करत वेळ गेला असता.
  
      'नानकजी राहिलेच, पुढच्या वेळी भेटू' म्हणाले , तर 'ते तर करूच गं पण पुढच्या वेळी काशीला जाऊया आपण, मी सगळं ठरवते तू 'फक्त' ये. आपण फक्त आणि रिक्तच उरलोत आता. तुझा 'हिरण्यकश्यपू अवतार' बघून तुला श्रीकृष्णाची सुरेख मूर्ति देणार होते ते राहूच दिलं' म्हणाली. मी म्हणाले ,' 'निरव' दिलंस की अजून काय पाहिजे मला, मी आळंदीहून सर्वांसाठी चिमुकले विठोबा-रखुमाई आणलेत ते तेवढे आठवणीने ने '!!!

पाके खोना खोके पाना होता आया रे
संग साथी सा है वो तो मोहे साया रे
लगा तूने जीना बस जी से जी मेरे
बोले सिने में वो तेरे धीमे धीमे
तोहे पिया मिलेंगे मिलेंगे मिलेंगे




----------------

©अस्मिता
फोटो#टायनीबुद्ध.कॉम


संदर्भ : कबीरा मान जा
           दिलसे रे
           बुलेया
           तुम तक


           




       

    
  
  
  
  


     





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता