ब्रह्मास्त्र -मोठ्यांचा 'छोटा भीम'
'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच. अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिस्सकन हसू आलं. त्याला 'रघूगुरु' असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला 'लघुगुरु' सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. ('आजोबा उठा, सुन्मुखाची वेळ झाली.' आजोबा कशाचे उठतात , प्रीतिभोजानंतर डायरेक्ट विहिण पंगतीला उठायचे ठरवूनच झोपलेले असतात. हे खरे वानप्रस्थ !) यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय , तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो. मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. मौनी दंडाला पेडोमिटर लावून हिंडल्यासारखं अस्त्राचा तुकडा लावून फिरते, हे जेव्हाजेव्हा लाल होतं, तिचे डोळेही लाल होतात. जसं फोनवरचा मेसेज अॅपल वॉचवर...