ब्रह्मास्त्र -मोठ्यांचा 'छोटा भीम'
'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच.
अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिस्सकन हसू आलं. त्याला 'रघूगुरु' असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला 'लघुगुरु' सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. ('आजोबा उठा, सुन्मुखाची वेळ झाली.' आजोबा कशाचे उठतात , प्रीतिभोजानंतर डायरेक्ट विहिण पंगतीला उठायचे ठरवूनच झोपलेले असतात. हे खरे वानप्रस्थ !) यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय , तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो.
मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. मौनी दंडाला पेडोमिटर लावून हिंडल्यासारखं अस्त्राचा तुकडा लावून फिरते, हे जेव्हाजेव्हा लाल होतं, तिचे डोळेही लाल होतात. जसं फोनवरचा मेसेज अॅपल वॉचवरून वाचता येतो, तेच तंत्रज्ञान आहे ते ! ही आणि हिची फौज सतत स्नोबूट्स घालून हिंडतात व प्रार्थनाही करतात. हे सगळे मिळून 'नागीण, क्राईम पेट्रोल व देवों के देव महादेव' मधल्यासारखेच दिसतात. पण हिरोची गँग इतकी लेम आहे की हे ताकतवान वाटत राहतात. हिरोच्या टीममधल्या मुलींची नावं राणी व रवीना व मुलाचे नाव शेर आहे. नावंच नाहीत म्हटलं तरी चालेल. अकबराच्या गोष्टीत जसे तो 'हातही न लावता रेष लहान करून दाखव' म्हटल्यावर बिरबल दुसरी मोठी रेष काढतो. तसेच पण उलट म्हणजे बी ग्रेड व्हिलनटीमसाठी हिरोची सी ग्रेड टीम तयार केलीये.
जेव्हा अस्त्राचा तुकडा कसाबसा वाचवून काशीहून हिमाचलच्या आश्रमात न्यायचा असतो. तेव्हा तो कारमधे जिपीएससारखा ठेवला होता. मला आपलं, 'अरे पूर्ण पृथ्वी नष्ट होणारे ना याने , निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी ठेवा' झाले. फारच अंडरव्हेल्मिंग झालं.
रघूसरांच्या आश्रमात सगळे ज्येना हास्यक्लबात हात वर करून हसतात तसंच काहीतरी गेटटुगेदर करत अस्त्र अॅक्टिव्हिटी करतात. डिम्पल हेलिकॉप्टरच्या फेरीची ड्रायव्हर आहे. एअरलिफ्ट करायची कुठलीही अर्जन्सी नसताना व बाकी ज्येना कारने ये-जा करताना, ही मात्र ईशाला हेलिकॉप्टरने सोडते-आणते. झालं तेवढंच !
आलियाचे एकदोन कपडे वगळता सगळे कपडे 'फॉरेव्हर ट्वेन्टीवन'चे वाटतात. डेनिम पँट्स आणि व्हाईट टँकमधे(फना-फना) कटरीना इतकं कुणीच एकाचवेळी सेक्सी आणि स्ट्रॉन्ग दिसत नाही हे मला लक्षात आलंय. आलियाला दुर्गापूजेच्या सीनमधे एक लाल साडी दिली आहे, त्यात ती फार सुंदर दिसलीये.
हे सगळे वँपला शोधत हिंडल्यामुळे तिला यांना फार शोधावे लागत नाही. हे लगेच सापडतात, अक्षरशः मागेच २० फुटावर असतात व 'उसको हमारे बारे में पता चल गया है' म्हणतात. त्यामुळे जेव्हा यांना ती दणके देते, मला यांच्याविषयी सहानुभूतीही न वाटता, 'मरा मूर्खांनो, कशाला तरफडलात मागेच' वाटले. नागर्जुनाचा रोल फार छोटा आहे व फार संवाद नाहीत. शाखाचे संवाद अत्यंत भंगार आहेत. व्हिलनशी पकडापकडी खेळताना त्याला 'तू घोडा आहेस... नाही, तू तर हत्ती आहेस, गेंडा आहेस' असं अत्यंत वैताग वाटावा असं बोलत राहतो. मगं मौनी रॉय त्याला जादूने बार्बेक्यू/ब्रॉईल करत करपवून टाकते. अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही. हे चालू असताना शाखा मक्याच्या कणसासारखा तांबडालाल होत असतो, त्यामुळे भुट्ट्याची आठवण येऊनही प्रेक्षकांना भुट्टाही मिळत नाही.
संवाद अतिशय टुकार आहेत. शिवाय दोन संवांदांच्यामधे जो शून्य काळ असतो तो गरजेपेक्षा जास्त वाटतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लूलेस दिसत राहते. सर्वच संवाद अनैसर्गिक आहेत. शिवाय दोन संवादातील केमिस्ट्रीही विचित्र आहे. कोवीड काळात कंटाळा घालवण्यासाठी घरोघरी बायकांनी ड्रेसवरून एकदम साडीवर जाण्याचे जे व्हिडिओ केले होते , त्या सगळ्या काकवा, वैन्या, ताया, मावश्या, माम्या यांना एकत्र केल्यावर शेवटी जी काही ' ईनऑरगॅनिक आणि ऑकवर्ड' क्लिप तयार होते, त्याचीच आठवण आली.
जमेच्या बाजू म्हणजे रणबीर-आलिया अत्यंत सुंदर दिसलेत, VFX अगदीच वाईट नाहीत. मुलगा 'आमच्यापेक्षा लहान मुलांचा सिनेमा आहे' म्हणाला व मुलगी 'शार्क बॉय अँड लाव्हा गर्ल' सारखा म्हणाली. मला 'छोटा भीम ऑन स्टेरॉईड्स' वाटला. तसा सुरवातीचा अर्धातास सोडला तर एन्गेजिंग आहे.
मला रणबीर व आलिया दोघेही आवडतात. माझी फार अपेक्षा नसते( झिम्मा आवडलेल्यांपैकी )आणि मला पैसे वाया गेले वगैरे वाटले नाही. मी बघणारच होते व बघितलाही. दॅट्स दॅट ! केसरिया गाणे, वाराणसी, आश्रमाचा परिसर, डोंगर-दऱ्या वगैरे फ्रेम्स सुंदर आहेत, मला मजा आली. फक्त या कास्ट व बजेटमधे कथेला नीट बांधून, संवांदातली केमिस्ट्री व दर्जा सुधारून अजून चांगला बनवणे सहज शक्य होते. एक फ्रँचाईज म्हणून पुढे काय करतील याची उत्सुकताही आहे.
<a href="https://lookingforasmita.blogspot.com/">©अस्मिता</a>
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा