सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय -थोडं चिंतन

 


ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू. Happy

नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यासाठी फार समतोल साधत तरीही वाचकांपर्यंत जास्तीत जास्त प्रामाणिक-फर्स्ट हँड अनुभव पोचवत लिहिलंय. इतकं स्पष्टं-सरळ भाषेत व जिथे अनावश्यक तपशील देण्याची गरज नाही , तिथे 'प्रिय वाचकांनो, मला कुणाचा अनादर करायचा नाही, कुणाच्या भावनाही दुखावयाच्या नाहीत, म्हणून यापेक्षा जास्त सखोल मी लिहू शकले नाही.' असा थेट कबूली जबाब दिलायं. लोकांना फिल्मी लोकं सामान्य लोकांपेक्षा 'उघड्यावर' असल्याने ते व्हल्नरेबल असतात हे माहिती असते. ह्याचं भान तिलाही आहेच. यास्तवं तिने फार 'सशक्तं लक्ष्मणरेषा' आखली आहे. जी अलिप्ततेपेक्षा healing झाल्यावरची वाटली. जितक्या जजमेंट सहन करायची ताकद आहे, तेवढीच माहिती बाहेर येऊ दिली आहे. हा पर्फेक्ट अप्रोच सांभाळूनही साधीसरळ शैली जपलीये.

हे पुस्तक पुस्तक म्हणून असामान्य नाही, ती काही सराईत लेखिकाही नाही. तसा काही आवही आणलेला नाही. तरीही खिळवून ठेवणारं व रंजक आहे. लहान वयात पळून जाऊन केलेले लग्नं मगं वर्षभरातच घेतलेला घटस्फोट, हे कशानं तर आई म्हणत होती 'लग्नं करा व हवं तितकं हिंडा पण आधी असे चाळे नकोत.' नंतर पंडित जसराज यांच्या मुलाशी ठरलेलं लग्न अचानक मोडणं व त्यावर त्या कुटुंबानी प्रचंड घरोबा असतानाही कुठलेही सबळ कारण न देता उडवाउडवीची उत्तरं देणं. इथे नाव बदललं आहे पण फारच सहज लक्षात येतं. व्हिवियनच तर आधीच विवाहित होता. हे माझ्या मनाला टोचलंच. कारण मान किंवा सुख यापैकी एकाच पर्यायाचे स्वातंत्र्य असेल तर मी मानंच निवडेन. जन्मभर असुखी राहीले तर राहीले. अशा नात्यांना भविष्य आणि स्थैर्य दोन्ही लाभत नाही. नीना काहीतरी वेगळीच आहे. तिने या नात्याला फार आदर दिलाय, मसाबाला होऊ देण्याचा तिला काहीही पश्चाताप नाही. I am pro-choice for pregnancy but not-so-much with falling for an already married man. तेही जेव्हा आपण कधीही एकत्र येणार नाहीत ह्याची खात्री असताना. ती आता खूप आनंदात आहे , विवाहित असलेल्या माणसाच्या प्रेमात पडून तो विभक्त झाल्यावर आधीच्या विवाहबाह्य संबंधातून झालेली तरूण मुलगी असताना मगं लग्न केलंय. किती 'आऊट ऑफ द बॉक्स' असावं एकाच माणसानी..! मला एवढे तपशील माहिती नव्हते. पण मी ह्यामुळे तिला लक्षात ठेवणार नाहीये, तिच्या कामामुळेच ठेवेन. तरीही हे माझ्या कंफर्टझोनच्या बाहेरचं होतं.

मला आपलं छोटीमोठी पण छान कामं करणारी, आता या(?) वयात कारकीर्द भरभराटीस आलेली आत्मविश्वासू वावर असणारी अभिनेत्री हीच ओळख होती. 'मसाबा- मसाबा' सिरीज मला फार आवडली होती, त्यातलं मायलेकीचं नातं भन्नाट वाटलं होतं. असेही मला मिक्सड-रेस लोक अफाट खास वाटतात, पण या सिरीजमुळे जी 'वास्तवाधारित काल्पनिका' म्हणता येईल, त्याने मला मसाबाही सुंदर, कल्पक, हुशार, जबाबदार आणि मेहनती वाटायला लागली.
1ca9b15c-c7e4-4be3-9bfe-8779d51a9148.__CR0,0,300,300_PT0_SX300_V1___.jpg

या पुस्तकातला मला आवडलेला भाग म्हणजे National School of Drama आणि त्यातल्या गमतीजमती व शैक्षणिक प्रकिया. यात आवर्जून व पुन्हापुन्हा आलेली नावं म्हणजे सतीश कौशिक, ओम पूरी, इला अरूण, अनिता कँवर आणि इब्राहिम अल्काझी. ह्या शिवाय यात्रा, बहादुरशहा जफर, खानदान या दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा उल्लेख, तसेच 'मंडी' सिनेमातले धमाल किस्से , शाम बेनेगेल यांच्याकडून मिळालेले रीतसर शिक्षण व त्यांची शिस्त. ऍटनबरोंच्या 'गांधी'मधे आभाची भूमिका. 'लल्लू लडकी' ची व्यक्तिरेखा का केलीस हा गिरीश कर्नाडनी रोखटोक सवाल , त्यानंतर टाईपकास्ट झाल्याने खरोखरचं चांगली कामं मिळायची बंद होणे व नंतर दूरदर्शनमुळे झालेली मदत. स्वतःचा 'बाजार सीताराम' ह्या दिल्लीतल्या पूर्वजांच्या घरावर बेतलेली पूर्णपणे स्वनिर्मित नाटीका व त्याला मिळालेला नॅशनल अवार्ड. तरीही कामाबाबत अनिश्चितता. डेव्हिड धवनच्या सिनेमात मिळालेला व कुठलाही संवाद नसलेला भिकारणीचा रोल ,'किमान एका वाक्याचा संवाद तरी द्या' म्हटल्यावर झालेली कुत्सित हेटाळणी. 'चोली के पिछे' गाण्यामुळे मिळालेले स्टेज शोज, त्यातले बरेवाईट अनुभव. सतत दुय्यम भूमिकांचा आलेला वीट. सप्तपदीच्या सीनमधे पॉलिस्टर कपड्यात यज्ञवेदीजवळील दृष्यादरम्यानच्या चित्रिकरणात 'टिपू सुलतान'च्या सेटवर लागलेली प्रचंड आग व त्यातून मसाबाला पाजवायला काढता पाय घेतल्याने थोडक्यात बचावलेला जीव. एकता कपूरच्या मालिकांच्या लाटेत स्टार प्लसने रद्दबातल केलेले अनेक कार्यक्रम , त्यामुळे बसलेला मानसिक धक्का. अचानक मिळालेल्या 'बधाई हो' व 'पंचायत' आणि 'द लास्ट कलर' सिनेमातल्या गमतीजमती व कारकिर्दीला अनपेक्षितपणे मिळालेली कलाटणी. असे आणि इतरही रंजक-रोमांचक किस्से आहेत.
article-l-2022615412263744797000.jpg
सतत छोटीछोटी कामं करावीच लागणं कारण घर चालवण्यासाठी पर्याय नसणे, शिवाय हा निर्णय आईवडिलांच्या मनाविरूद्ध घेतलेला असल्याने , शक्यतो सगळ्या गरजा भागवणे हे नीनाला अगणित वेळा करावे लागलेयं. सोसायटीच्या सचिवानी नीनाचे चारित्र्यहनन केल्याने तिच्या बाबांनी त्याच्याविरूद्ध आवाज उठवून स्वतः सहभागी होऊन निवडणूका घेऊन त्याला पदावरून निलंबित केले, हे मला फार कौतुकास्पद वाटले. असे सगळे असूनही तिचे आईवडील अत्यंत सपोर्टीव्ह वाटले मला, कारण त्यांनी तिला मुंबईत घरं घेऊन दिली, मसाबाच्या वेळीही हट्ट धरला नाही, आईपश्चात बाबांनी तिचे बाळंतपण केले, ते व्हिवियनलाही अत्यंत आदराने वागवायचे, मसाबालाही अगदी मायेने वाढवलं. आधी जो काळजीपोटी विरोध असायचा तो त्यांनी कधीही ताणून धरलायं असं वाटलं नाही. तो विरोधही विरोध नसून ती तिच्या निर्णयांवर किती ठाम आहे याची चाचपणी वाटली. ती संस्कृतमधे एम फिल आहे. सुविद्य व बुद्धिमान मुलगी असल्याने तिच्या आईची इच्छा होती की तिने आपले PhD पूर्ण करून चांगल्या संस्थेत प्रोफेसर किंवा IAS व्हावे व या बेभरवशाच्या क्षेत्रात आपले आयुष्य लोटू नये. ही पालक म्हणून उच्चं तरीही अवाजवी नसलेली अपेक्षा आहे. वडिलांचा अजून एक संसार असल्याने आईला प्रचंड मनस्ताप व्हायचा , ह्यावर मोकळेपणाने सांगितले आहे. याकरिता त्यांच्या मृत्यूपश्चातचं लिहायचे धाडस तिने केलेयं.

हे पुस्तक प्रामाणिक आणि प्रांजळ वाटले. ना स्त्री मुक्तीचा आवेश- ना प्रसिद्धीचा अभिनिवेष ! ना चोरटेपणा- ना खाजगी बाबींचा चव्हाटा , ना उथळ- ना फार गंभीर. गुजगोष्टी केल्यासारखे पण संग्रही असू द्यावे असे सखोलही नाही. एकदा वाचताना कंटाळा येणार नाही इतके रोचक आणि सोप्या इंग्रजी भाषेत.

मला प्रवाहाविरूद्ध पोहणाऱ्यांची उत्सुकता वाटते ते या निर्णयांच्या परिणामांना कसे सामोरे गेले असतील म्हणून..! ती ताकद कोठून येते..! त्यांच्यात असं काय असतं जे माझ्यासारख्यांत नाही. चूक-बरोबरपेक्षा मला अधिक काही तरी हवं असतं, जे मला माझे तथाकथित "नियम" मोडायला लावेल. शूर नाही तर किमान मला समृद्ध तरी करेल. लेबल लावणं सोपं आहे पण त्याने आपलीच वाढ कुठेतरी खुंटते. मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. फक्त निरिक्षकाच्या भूमिकेत रहायचं !!

मी काढलेला सारांश हा की नीना ही मुलीसाठी अतोनात कष्टं उपसणारी एक 'आधुनिक हिरकणी' आहे.

©अस्मिता
चित्र # साभार बॉलीवुड शादी आणि अमेझॉनवरची पुस्तक प्रसिद्धी

मायबोलीवरील लिंक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12th Fail (Hindi movie)

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

हृता