व्हेज ग्रीन थाई करी

 

पूर्वतयारीचा वेळ: 
३० मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

करीच्या वाटणासाठी:
२ पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल(थाई आले),दोन काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबीरीच्या काड्या, २-३ सांबारचे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची सालं (पांढरा भाग न येऊ देता).

बाकीचे:
१ लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली- प्रत्येकी अर्धी वाटी लाल-हिरवी शिमला मिर्ची , ब्रॉकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बाळ कणसं,थाई बेझिलची ५-६ पाने

क्रमवार पाककृती: 

क्रमवार पाककृती *
१. वाटणाचे घटक मिक्सर मधून घूरकावून घ्या. निन्जा बिनपाण्याचे करत नाही म्हणाले, म्हणून अर्धीवाटी पाणी घातले. त्यात माझी लेमन ग्रास जून/निबर निघाली, त्यामुळे थोडे जास्तच फिरवले. आर्टिफिशय इंटलेक्टचे निन्जा लईच आगाव हाय, चटणी झाली समजून मनानंच कुटणं थांबवतं. त्याला खवट सासू नव्या सुनेला ज्या प्रेमाने समजावते तसं किंवा 'मोटा शाणा झाला का बे' म्हंणत, ओव्हरराईड करत ओल्या नारळाच्या चटणीसारखी चटणी करून घेतली.
Screenshot_20221022_085959.jpg
* संज्याेतनी गलांगल व हळदीची सालं काढली की नाही कळलं नाही पण मी काढली.
Screenshot_20221022_090015.jpg
२.नारळाच्या दुधापैकी दोन वाट्या दूध मोठ्या कढईत घेऊन आटवले. मग त्यात वाटणाचा गोळा टाकला.
Screenshot_20221022_090033.jpg
३. हा गोळा तूप सुटेपर्यन्त परतला. मग उरलेले सगळे दूध कढईत घालून १० मिनिटे खळखळ उकळू दिले.
Screenshot_20221022_090046.jpg
४. सगळ्या भाज्या घातल्या व करकरीतपणा किंचित कमी झाला की बंद केले. एकीकडे कुकर लावून भात शिजवून घेतला.
Screenshot_20221022_090059.jpg
५. तयार करीवर तुळशीपत्र टाकून (थाय बिस्ट्रोच्या घरावर बेझिल पत्र) भातासोबत गट्टम केले. कुणाचीही वाट बघितली नाही, कुणालाही वरवर केले नाही पहिली वाफ निवायच्या आत......असो.
Screenshot_20221022_090116.jpg
क्रमवार मूर्खपणा
*
१.जास्मिन तांदूळ संपला नाहीये हे गृहीत धरणे व शेवटी बासमतीचा गुरगुट्या करणे.
२.बेबी कॉर्न ऐवजी ट्रेस लेचेस घेऊन येणे, मागच्या वेळी अंडी विसरून नेलपॉलिश आणले होते, त्यामानाने ही प्रगतीच!
३. संज्याेत कीरने टोफू टाकला नाही म्हणून आपणही न टाकणे. जसं काही बाकी नियम पाळतेच!
४. नारळाचे दूध थाई कुकिंगचे न शोधता, लॅक्टोज इन्टॉलरन्स लोकांसाठी असलेल्या सेक्शन मधून गडबडीने घेणे.
५. कांदा आणून वाटणात घालायचा विसरणे व पुन्हा वेगळा वाटून घालणे.

क्रमवार कष्टं* :
पहिल्या तीन घटकांमधे तडजोड करायची असेल तर आपली कढी करा सरळं. गलांगल हे कंद आहे , आले नाही. त्याचा गंध व पोत आपल्या आल्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. गलांगल,गलांगल, गलांगल .... रामायणातल्या राक्षसाचे नाव वाटते.
हे मला बर्मिज स्टोअरमधे मिळाले, नवऱ्याला कायप्पावरून मागे लागून मिळवले कारण मी बाकी सामान आणून रिस्क घेतली होती. ते दुकान इतके अजागळ होते की नवरा व कलिग दोघे गलांगलाच्या शोधात गेले असताना कलिग म्हणाला, 'आप जाओ मै बाहरही ठीक हुं!' थायलंडला जावे लागले असते तरी चालले असते अशा थराला गोष्टी गेलेल्याच होत्या. 'दृष्टी आड गलांगल' केल्याशिवाय करी होणे नाही. चार पेरं वापरून उरलेल्या पाव किलो गलांगलाचं व दीड छटाक ओल्या हळदीचं मी आता काय करणारे हे महत्त्वाचं नाही. गलांगल, ओली हळद व लेमनग्रास यांचा मी 'अय्या'तल्या राणी मुखर्जी सारखा आलटूनपालटून गंध घेत बसले. मी कुठलीही निर्मिती केली तरी माझी सगळी इंद्रियें ओव्हरटाईम करतात. Happy

*मी उद्या 'लीक सूप' करणारे. त्याचा या लेखाशी संबंध नाही, पण त्याचेही सामान ह्यासोबतच आणून ठेवलेय म्हणून !

करून बघा व प्रमाणात खा!

'करी'दिन समाप्त ! Wink
©अस्मिता

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी २ वेळा
अधिक टिपा: 

वरचा मूर्खपणा, तुमच्या टिपा !

माहितीचा स्रोत: 
संज्याेत कीर. https://youtu.be/-zeV6vSS0mk

आहार: 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता