सिनेमा आणि मी : भाग १





मूळ कमेंट  

ॲन्ट मॅन बघितला.

तिथे जाऊन नाव माहीत नसल्याने "Three tickets for Ant man and the whatever, please" म्हटले. मार्व्हलच्या परंपरांचे पाईक असल्याने सगळं बघायचं असं तत्त्वं आहे. अशात आलेल्या थॉर पेक्षा बरा व ब्लॅक पॅन्थरपेक्षा फारच बालीश वाटला.


मायकल डग्लस उगीच गमती केल्यासारखे करतो, पॉल रड आजन्म कन्फ्यूज दिसतो, मिशेल फायफर सतत ओढल्यासारखा चेहरा व विचकटलेले केस घेऊन वावरते. तीस वर्षे क्वांटम मधे अडकून काय घडले हे तिने घरी सांगितलेलं नसतं.


व्हिलन चांगला होता पण त्याचे संवाद फार साधारण होते. मधेच तो साऊदिंडियन सिनेमातल्या विष्णूसारखा निळा व्हायचा. त्याचं विमानाचं काही तरी फायफरताई दुरुस्ती करते म्हणून तोडून वर सिरम सांडून टाकतात. त्याला बऱ्याच विश्वांचा व टाईमलाईनचा सत्यानाश करायचा असतो, मग त्याला येतो राग ! येणारच नं , दळण आणायला गेलो आणि लाईट गेले एवढं सोपं थोडीच आहे.


तिचा राग म्हणून तिच्या नातीला एका गुंडांच्या मदतीने जो रोबो-हम्प्टीडम्प्टी सारखा दिसतो, ओलीस धरून पॉल- जावयाला त्याच्या DNA मुळे सोडतात. हे मला कळलं नाही सासू आणि जावई DNA , असो. मग त्याचे तिथे रिप्लिका तयार होतात व त्यांच्या कलकलाटात तो त्यांच्याकडून दहीहंडी करून (हो दहीहंडीच) दही-सिरम काढून घेऊन जातो. मग वास्पवहिनी वाचवतात. डग्लस काका आपल्या मुंग्यां या क्वांटम मधे अतिप्रगत होऊन कुठल्या कुठे गेलेल्या बघतात. नंतर ते मुंगीसेना तयार करून व्हिलनच्या हेल्मेटहेडेड सेनेचा चुनचुनके बदला घेतात. सगळे मिळून छोट्या ताईला वाचवतात, जिच्या आगाऊपणामुळे हे सगळं घडलेलं असतं.


कुठल्या प्रसंगात कुठेही high नाही, कथा, ॲक्टिंग, विनोदी प्रसंग, थरार सगळंच फार linear आहे. नाही बघितला तरी चालतो. तरीही आम्ही एक्स्ट्रा क्रेडिट बघून आलो, तेही बंडल वाटलं.


मूळ कमेंट

An Action Hero @Netflix
आयुष्मान खुराणा आणि जयदीप अहलावत आहेत. मला आवडला. वेगवान आहे, खूप मारामारी व ॲक्शन सिक्वेन्स आहेत. शेवट थोडा अधिक दमदार व विश्वसनीय होऊ शकला असता पण सिनेमा मसालेदार आहे व खिळवूनही ठेवतो. आयुष्मान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत आहे. तो यात खऱ्या आयुष्यात एक हिरो आहे जो हातून नकळत झालेल्या खुनापासून स्वतःला वाचवत वास्तवातही एक हिरो होतो. किंचित अ आणि अ आहे, पण मला आवडला. दोन गाणी आहेत, दोन्ही अनावश्यक व अनॉयींग, चीप आहेत. आयुष्मान खुराणा व जयदीप अहलावत पर्फेक्ट वाटले. दोघांचीही कामे नेहमीप्रमाणे उत्तम!


फोन भूत फारच टुकार आहे. विनोद आचरट आहेत, भितीदायक नाही. 'स्कूबी डू व्हेअर आर यूचा' विनोद व रहस्यही बरे म्हणावे अशी गत आहे. कुणालाही अभिनय करावा असं वाटलं नाही. सेट तर गणेश मंडळातल्यासारखे 'भव्यदिव्य' वाटले. कॉमेडीच्या नावाखाली वेगवेगळ्या सिनेमातले संदर्भ घेतलेत, त्याचं टायमिंग गडबडलेयं . त्यामुळे अर्ध्या वेळा हसू येत नाही व उरलेल्या अर्ध्या वेळा फक्त राग येत नाही. जॅकी श्रॉफ लहरी सुताराची देहबोली घेऊन वावरतो. त्याची व्यक्तिरेखेवर अजिबात नियंत्रण वा पकड नसते . मनाला आलं तेव्हा नाचतो , अगम्य हातवारे करतो, नाहीतर पुंऊूूंऊूूंऊंऊंऊं चालीतली हिरो सिनेमातली पुंगी वाजवतो. एकच पुंगी किती वेळा वाजवणार हे पितापुत्रं , जुना प्रेक्षक नवी बासरी हा नियम असायला हवा. पहिल्या गाण्यात ताडपत्री सारख्या लालड्रेसमधे कटरिना फार वाईट दिसली आहे. नंतर सुसह्य आहे.
प्राईमवर बघू नका.

पॉनियन सेल्व्हन हिंदीतून आलेला दिसतोयं, प्राईमवर.

नेटफ्लिक्सवर एमी अॅडम्सचा 'लीप ईयर' पुन्हा दिसतोयं. हलकाफुलका रोमँटिक कॉमेडी आहे. जरूर बघा. मी अनेकवेळा बघितलायं.

https://www.maayboli.com/node/82555?page=35

Ticket to paradise पिकॉकवर बघितला.
ज्युलिया रॉबर्ट्स व जॉर्ज क्लूनी. चांगला आहे, रॉमकॉम, हलकाफुलका. टिपिकल डिव्होर्सड् पेरेंट्स व मुलीचे लग्न. इंडोनेशियात सीवीडचा शेतकरी असलेला चिकना-प्रेमळ जावई, जो राहूनराहून अमेरिकनच वाटतो. बाली फार सुंदर दाखवलंय. बाकी कुठल्याही रॉमकॉम पेक्षा सरस वगैरे नाही, एकदा बघा आणि विसरून जा कॅटॅगरीत.

प्राईमवर रामसेतू व थँक गॉड बघितला.
थँक गॉड फार साधारण वाटला आणि त्यातला विनोद डेटेड वाटला. आता हसू येत नाही अशावर.सिद्धार्थ मलहोत्रा हा फारच मर्यादित acting skills असलेला अभिनेता आहे. ह्याला विनोदाचे टायमिंगच जमत नाही. अजय देवगनचा कंटाळा आलायं. कथा दमदार नाही. शेवटी तर कंटाळवाणा आहे.नाही बघितला तरी चालतो. नोरा फतेहीचे एक उथळ गाणं आहे.

रामसेतू बरा आहे. मला अजिबात अपेक्षा नव्हती म्हणून बरा वाटला असेल. अक्षय म्हातारा दिसतोय. ते मिरवतोयही, पण जरठ कुमारी विवाह पार्ट कितवातरी नुसार नुशरत बरूचा याची बायको आहे. यांचे काही सिन एकत्र आहेत. ते फार विचित्र वाटतात. जॅकलिन एनवॉयर्नमेंटल रिसर्च करते. फारच डम्ब भाव होते चेहऱ्यावर. ही हुशार दिसतचं नाही उलट फिट इनची केविलवाणी धडपड करतेयं असं वाटत रहातं. हिला 'चिट्टीया कलैया वे' च ठीक आहे. ओके आहे सिनेमा. सगळ्यांनी वरवर काम केलयं. कुणालाच आस्था नसताना हा विषय का निवडला कुणास ठाऊक. अक्षयचे तर रामाबद्दलचे भाव, गहिवरून येणं वगैरे नकली वाटले. याचे केस तर उलटा फडा लावल्यासारखे वाटले. हा कामात मग्न दाखवायचे असल्याने केस विंचरलेले नाहीत, पण विग विचकटलेल्या केसांचा होता. दाढीचे पांढरे खुंट व गबाळे कपडे. गेला हंकोत्तम कुणीकडे !!

संदर्भ



कांतारा नेटफ्लिक्सवर हिंदीत बघितला.
जेवढे कौतुक ऐकले, तेवढा खास नाही वाटला. रिषभ शेट्टी शिवाचे पात्र जगलायं. खरोखरचं शिवा वाटतो तो. रासवट, तामसी, मागचा-पुढचा विचार न करता पुढ्यात आलेले काम पैलवानी डोक्याने करून टाकणारा. त्याची तरूण आई व कोला-नर्तक बाबा आवडले. नंतरची आई वयाने त्याच्याएवढीच केस पांढरे केलेली बाई वाटली. काम तिचेही आवडले. वैताग खरा वाटतो तिचा. मित्रांचे काही काही विनोद आवडले. सर्वात उत्तम काम वन अधिकाऱ्याचे आहे. त्याची देहबोली सुद्धा फार apt आहे. त्याचं पात्र फार व्यवस्थित विकसित केलेले वाटले. त्यामानाने मित्रांचे व जमीनदाराचे तितके व्यवस्थित वाटले नाही. गुरवाचा चेहरा व वावर फार शांत आहे. छान वाटला. त्याला मारल्यावर खरोखरचं वाईट वाटले. जमीनदार आपापल्या भूमिकेत ठीक. त्याला शेवटी प्रवचन देताना शिवा म्हणतो 'आम्ही गरीब लोक कभी कभी तो हमें सुखी रोटी खाके गुजारा करना पडता है' माझ्या मनात आले सतत तर मटन, चिकन , डुक्कर, फिशकरी खाताना व स्कॉच पिताना दाखवलाय. उलट ओव्हरइटिंग झालेयं Proud

लीला बहुतेकवेळा गोंधळलेली वाटते, फार लो एनर्जी आहे, तिच्या गोडव्याचीही छाप पडत नाही. लव्ह स्टोरी गोड आहे पण कथेला खीळ बसवते, फक्त शेवटी कथेशी संलग्न वाटली. तोपर्यंत हे समांतर कथानक वाटत रहाते. गाणी आवडली नाहीत. हे कमी करून त्यांनी मूळ दंतकथेला अधिक फुटेज द्यायचे असते. कारण मी सतत दागिने घातलेल्या रानडुकराची वाट बघतेयं असं वाटू लागलं. जेव्हा जेव्हा पंजुर्लीची व राजाची गोष्टं, राजाची शांतीसाठीची तगमग, वराहरूपम् , कोला व ते कथकली सारखे नृत्यं होते, सिनेमा फार उच्च होऊन जातो. पण शिवा व वराहरूपम् हे कनेक्ट व्हायला फार वेळ लागला. मधेमधे तर पकड सुटली व संथही झाला. त्याने आधीच्या उच्च अनुभूतीचा प्रभाव टिकत नव्हता. मूळ कथा आध्यात्मिक वाटली. प्रत्येकाचा देव, श्रद्धास्थानं व पाळमुळं वेगवेगळी असतात. आपण तर प्राणीमात्रांत व निसर्गातही परमेश्वराचे अस्तित्व मानतो. त्यामुळे वराहरूपम् काय किंवा मच्छकच्छरूपम् काय दोन्ही तितकेच भावले असते. पण त्यावर फोकस ठेवायचा असता. 'वराहरूपम्' च्या प्रभावाबाहेरचा शिवा फक्त एक रँडम दाक्षिणात्य नायक म्हणूनच उरतो. उलट वनअधिकारी त्यापेक्षा कितीतरी स्वतंत्र व स्थिरबुद्धी वाटतो. शेवटचे सगळेच उच्च आहे, त्या आरोळ्या वगैरे निसर्गातल्या 'त्या'शी जोडणारा अनुभव !!! सुरवातीची व शेवटची वीस मिनिटे , मधले काही तुकडे व म्हशींची शर्यत आवडली. अगदी सुरूवातीच्या राजाच्या गोष्टीने 'चांदोबा'तल्या गोष्टी आठवल्या.

संदर्भाची पोस्ट




मोनिका, ओ माय डार्लिन्ग ! - @नेटफ्लिक्स

मला विशेष आवडला नाही. लक्षात रहाण्यासारखा नाही. हुमा कुरैशी, राजकुमार राव, राधिका आपटे तिघेही या आधीपासून आवडतात. विजय केंकरे हा एक सुखद धक्का आहे, पण त्यांना फार संवाद नाहीत.

सगळ्यांची कामं चांगली झाली आहेत पण चित्रपट पकड घेत नाही. एका ॲन्गलने कॅमेरा क्लोजअप्स व गाण्यांच्या लाऊड ओळी असे काही नवीन तंत्रज्ञान वापरलं आहे ते जास्त रिपिटेटिव्ह वाटलं. रारा कॉन्फरन्स मधे लेदर जॅकेट घालून येतो. गरिबीतून मोठ्या कष्टाने वर आलाय असं सांगतात, पण तो कधीही काम करताना दिसत नाही. राधिका आपटेचा वावर छान आहे पण तिच्या भूमिकेला खोली व लांबी दोन्ही नाही. हुमा कुरैशी आपापल्या भूमिकेत फिट आहे, पण तिचं अचानक येणं आणि जाणं अबरप्ट वाटलं. तिचं येणं येणं न वाटता प्रकट होणं वाटतं , हे अनेकदा होतं! हे धक्कातंत्र असावे पण धक्का फार बसला नाही.

मुडद्यावर मुडदे पडत असतात पण पोलिस एकदम चिल असतात. What's with the Cobras ? इतकं सर्रासपणे घेता येतात का. टेक कंपनी आहे की गारूडी हॅन्ग आऊट. रहस्य शेवटपर्यंत टिकतं पण ते टिकवण्यासाठी जे उपद्व्याप कथेत दाखवलेत ते ओढूनताणून वाटले. एका फ्लो मधे आलंय असं वाटलं नाही. मी पाचपैकी अडीच स्टार देईन!

संदर्भाची पोस्ट


भूलभुलैया २

भूलभुलैया २ अतिशय वाईट आहे. दोन तुकड्यांत बघितला, दुसऱ्या दिवशी तर सुरू केलाय तर उरकून टाकू या भावनेने बघितला. सुरवातीला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इग्लूतल्या डिस्कोत जत्रा आहे, त्यात सगळे बेदिंग सूटमधे नाचूनही हायपोथर्मियाने मरत नाहीत. जत्रेसाठी मुद्दाम चुकवलेली बस मात्र कुठे तरी खाईत पडून सगळे लोक मरतात. पूर्ण सिनेमाभर कियारा उघडउघड लपून बसली आहे.कार्तिक आणि कियारा यांचा संसर्ग झाल्यासारखे तब्बूचा अभिनय गंडलाय. (ह्या वाक्यावर माझाच विश्वास बसत नाहीये, फार आवडते ती) तब्बुचा मेक अप अतिशय वाईट आहे. तरुण तब्बुचा चेहरा खास करुन दातांची ठेवण, जबडा,जिवणी सिजीआय वाटत राहते, लॉन्ग शॉट मधे तर ओळखायला येत नाही. त्यात तिला भरपूर लांबीचा रोल आहे. फक्त आवाजाने खात्री पटवायची.

    राजपाल यादव, अश्विनी केळशीकर आणि संजय मिश्रा या तिकडीने कॉमेडीच्या नावाखाली काहीही आचरट दाखवलेय, अजिबात हसू येत नाही. हे कमी होतं की काय म्हणून अरिजितने 'मेरे ढोलना सुन'चा जीव घेतलाय, कसलेच चढउतार नाहीत, आर्तता-व्याकुळता नाही ,अगदी (नेहमीपेक्षाही कैकपट) एकसुरी करुन माती केलीये. त्यावर कार्तिकचा नाच तर 'भीक नको पण कुत्रा आवर' आहे. जुने 'मेरे ढोलना' ज्यांना आवडते त्यांना चक्क कोतबो वर्दी आहे. पहिल्या भूभुत भूत नसूनही रहस्य शेवटपर्यंत टिकवलंय, इथे भूत सतत दाखवूनही दचकायला सुद्धा होत नाही. अक्षय, विद्या, परेश रावल, रसिका जोशी, राजपाल यादव, मनोज जोशी, विक्रम गोखले यांनी जे काम केले होते ते अमेझिंग होते. त्यामुळे फार निराश करतो हा सिनेमा!

        गाणी जी रिमिक्स आहेत तीच लक्षात रहातात. अक्षयचे 'मेरी आँखे भूलभुलैया' गाणं सुद्धा जबर होते .तो अगदी बेपर्वा, vagabond , उथळ, बेभरवशाचा, वेडसर वाटतो, तो camera कडेही बघत नाही, भानच नसलेली व्यक्तिरेखा आहे. इथे नवीन गाण्यात सतत भान, रोखून बघणे व मी किती 'मदनाचा पुतळा' टाईप बॉडी लँग्वेज आहे. कार्तिक रोमँटीक सीन्समधे अनॉयिंग व झपाटलेल्या सीन्समधे वेडसर वाटतो. कियारा लक्षात रहात नाही. आधी कथेला अलाईन न होणाऱ्या गोष्टी दाखवून शेवट गडबडीने गुंडाळलाय.

   मी मध्यरात्री स्मशानात बसून बघितला असता तरी टरकले नसते एवढा पांचट आहे. पण बाहेर फार ऊन होतं आणि दुकानात गेलं की पैसे जातात म्हणून मी बघितला. Proud

https://www.maayboli.com/node/81454?page=26

कला (Qala)

तृप्ती दमरी, स्वास्तिका मुकर्जी.


बघितला , फार आवडला.
कलाच्या मनाचे भावाविष्कार सादरीकरणातून, मागच्या सेट्स मधून फार सुरेख टिपलेत. तृप्तीने अतिशय सुंदर अभिनय केलायं. तिच्या मेकपमधे आयलायनरचा शून्य वापर केलायं, म्हणजे तिचे डोळे भकास दिसावेत. डोळ्यातून आपला आत्मा दिसत असतो. त्याचे एकाकीपण दाखवलंय. पहिल्या रियाझानंतर आई घराबाहेर काढण्याने जो धक्का बसतो , त्यानंतर जेव्हाजेव्हा तिला आपण अपयशी झालो आहेत हे जाणवते तिची प्रतिक्रिया PTSD सारखी पुन्हा बाहेर पळण्यात होते. बाहेरही बर्फ आहे , त्यातून ते वातावरण मायेच्या उबेपासून वंचित असल्याने आलेला थंड एकटेपणा दाखवते. समोरचे मेझ हे Labyrinthआहेे त्या एकटेपणाच्या भूलभुलैयात ती पुरती अडकली आहे. त्यातून बाहेर जायला ती काहीही करायला तयार होते, जशी त्या पझलमधल्या पाऱ्याला सुटका हवी आहे आहे , तशीच तिलाही. गूढ वातावरण मुद्दाम दाखवलयं म्हणजे काय करायचे ते कळत नसताना जी अनिश्चितता येते , त्याचे सावट असल्यासारखे.त्या सावटाची सवय होऊन हळूहळू ती त्यातचं अदृष्यंं होत असल्याचा आभास निर्माण केलायंं.

तिच्यात गुण होते पण तिच्याआईसाठी ते कधीही पुरेसे नसणार होते. तसं आईने ठरवलेलं होतं. मलाही तीव्र स्वरूपाचे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि कुठेतरी आपल्या मुलाला हीने गिळलंय व पितृसत्ताक पद्धती . ह्या तिन्हीचे जहरी एकत्रीकरण वाटले. कारण सतत बुलींग झालं , तू सुंदर नाहीस, तुला गाता येत नाही ई म्हणून. ती भाबडी होती , जे समोर आलं ते तिनं केलं. तिला गायिकाही आईसाठी व्हायचं होतं , तिला स्वतःला काय हवं तेच माहिती नव्हतं, स्वसंदेहाचा रंग कोबाल्ट ब्लू , त्यामुळे श्रोत्यांमधे काही जणांना करड्या रंगाच्या खालोखाल दिला आहे. तिचेही सगळे कपडे करडे व शिमरी आहेत. शिमर म्हणजे वरच्या चकाकी खाली लपलेला करडा गहिरा एकटेपणा. करडा म्हणजे काळा नाही वा पांढराही. खऱ्याखोट्यातला फरक न कळणे. नात्यात समोरच्याच्या अपेक्षा कळत नसताना जो संभ्रम व तणाव निर्माण होतो तो डार्क कोबाल्ट ब्लू / मिस्टीक ब्लू रंगाने दाखवलायं. सगळे फर्निचरही तसेच आहे, फायरप्लेसचे मँटलही सुंदर पण उदास छटेचा क्रिम कलर दिलेले आहे. तिला आत्मविश्वास येऊ दिलेला नाही म्हणून ती शोषणाला बळी पडते. तिथेही दोन उघड्या तोंडाचे दोन गॉरगॉईल्स दाखवलेत. ते मला माणसाच्या रूपातल्या गिधाडाचे प्रतिक वाटले. पुढे नदी आहे म्हणजे वाट वा पर्याय नाही.

तो एलेव्हेटर मधे तिला , आज तू जी काही आहेस ती माझ्यामुळे म्हणतो. तेव्हा दुसऱ्या एखादीने कानाखाली जाळ केला असता. पण यशस्वी होऊनही हिचा सेल्फ एस्टीम इतका लो आहे. तिला ते कुठेतरी खरं वाटतंय , शिवाय आत्म्यावर आलेली अपराधी भावना. ती महत्त्वाकांक्षी नव्हती, फक्त मायेसाठी तरसलेली इंट्रोव्हर्ट मुलगी होती. पण ज्यासाठी तिने पाराप्रपंच केला तेही तिला मिळणार नाही हे कळल्यावर गिल्ट मोठा व्हायला लागला. शेवट अजून वेगळा काय असू शकला असता, ते दुःख, गहिरा एकाकीपणा फार मुरत गेलेला होता.

मला तर वाटलं जगनला सत्य लक्षात आलं , कारण त्या कपाटात तो निर्वाणीचं बोलत होता. मलाही गुरू की करनी तितकं भावलं नाही. 'निर्भौ निर्वैर' जगन शिवाय कुणीच नाही तिथं म्हणून ते अधोरेखित केल्यासारखं वाटलं. पाऱ्याला प्रवाही असूनही संपूर्णत्व कधीच मिळत नाही, कारण तो कधीही तुकड्यातुकड्यात विखरतो. त्यामुळे सतत असुरक्षिततेची भावना.

संदर्भाची पोस्ट


नेटफ्लिक्सवर 'कुमारी' बघितला. Happy
सबटायटल्स वाचतच बघावा लागतो. एकंदरच दक्षिणेतली लोक बोलघेवडी आहेत, त्यामुळे मला पुलंच हंगेरीत 'किल्ल्याकडे घ्या' म्हणायला ५० वाक्यं लागतात, हा संदर्भ आठवत रहातो. आपण लहानपणी प्रभुदेवाची गाणी बघायचो तेव्हा शब्द आटून जायचे पण तोंड वळंवळंत रहायचं, तसं डबड्या व्हर्जनात होतं. त्यामुळे सबटायटल म्हणजे 'किल्ल्याकडे घ्या' आणि डब्ड म्हणजे 'येक्स्ट्रा वळंवळं' ह्यापैकी एकाही अनुभवाला मुकायचं ठरवूनही मुकताच येत नाही. Proud

अतिशय रमणीय गाव व डोंगररांगा दाखवल्यात. ऐश्वर्य लक्ष्मी व शाईन टॉम म्हणून दोघे मुख्य भूमिकेत आहेत. खूप छान काम केलेय दोघांनी. सिनेमा कुठेही ओंगळवाणा वाटत नाही. तुंबाडपेक्षा वेगळा आहे. तुंबाडची स्क्रिप्ट व व्यक्तिरेखा फार स्पष्ट होत्या. त्यातली लालसा वाढत जाणं फार नैसर्गिक वाटतं. इथे ते थोडं वेड किंवा ऑबसेशन वाटलं. तिथे राग आला म्हणून मुडदे पाडले नाहीत. इथे मात्रं सटासट ..... बाळाला जन्म द्यायचा सीन फार रिअल वाटला. ह्या कुमारीचा अभिनय बोलका वाटला व व्हिलन नवऱ्याचा भेदक वाटला. आधी दोन अमानवीय एन्टिटी आहेत हे लवकर कळालं नाही. पिढ्यानुपिढ्या पूर्वीच्या शापातून मुक्त होण्यासाठी लेकराचा बळी द्यायला निघालेल्या बापापासून आई आपल्या लेकराला कसं वाचवते, हे जरा वेगळ्या ढंगात दाखवलंय. मला आवडला. फक्त ते भूत बारा पिढ्यांपासून तळघरात बसलेलं असतं, ते बळी घ्यायला बाहेर येतं तेव्हा आधी फक्त त्याचे हात वगैरे दाखवून भयनिर्मिती केली आहे. पण ते जेव्हा शेवटी पूर्ण दाखवलं , ते आळोखेपिळोखे देऊन एकदम शाखाच्या सिग्नेचर पोजमधेच गेलं. आत्ता 'मितवाss' म्हणेल असं वाटलं. या पोजमुळे त्यांची बारा पिढ्यांची प्रतिक्षा व माझ्या दोन तासांच्या हॉरर वाईब्स क्षणात बेचिराख झाल्या. Wink पण सिनेमा भारी आहे.

https://www.maayboli.com/node/82555?page=24


गुडबाय 
आताच बघतं होते, महाबोअर, रटाळ अगदी. रश्मिकाला हिंदी येत नाही की तिचे सर्व संवाद विचित्र आहेत काय माहिती. पाऊनतासात पेशंसच संपला व गुडबाय म्हटलं.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऑपनहायमर

हृता

बंदिवान मी ह्या संसारी