कबिरास पत्र

 मराठी भाषा गौरव दिन २०२३ निमित्त स.न.वि.वि. या उपक्रमात भाग घेतला होता, त्यात कुणालाही पत्ररूपी लेख लिहायचा होता. यावर्षी मी म भा गौ दि निमित्ताने मायबोलीवर संयोजनातही भाग घेतला होता. 




प्रिय कबीरा,

तुला काही कल्पना नाहीये इथे काय चाललंय , त्याने माझ्यासारख्या किती जणांचा गोंधळ होतोय. ज्यांना आत्मशोधाची जिज्ञासा आहे त्यांची दिशाभूल करायला इथे सर्वस्व वेचणारी लोक आहेत. असत्याबाबत केवढी एकनिष्ठता, आणि सत्याशी म्हणजे तुझ्या कैवल्याशी काही देणेघेणे नाही. आजकाल आस्तिक कोण नास्तिक कोण कळत नाहीये. बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे. आता महाभारत झालं तर काय नवल..! त्यांना जीव तोडून सांगायला माझ्याकडे कसलाही पुरावा नाही , माझं काय मी आज आहे उद्या नाही पण तू तर चिरंतन आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही. दिसामागून दिसं चाललेत, जे आहे त्याला साक्षात्कार का मानू मी तरी! 'तेरे बिन खाली आजा खालीपनमें' जमणं किती कठीण आहे.

कुणाला सांगू कुणाला बोलू, दशानन झालाय माझा! प्रत्येक जण वेगळ्या चेहऱ्याची ओळख लक्षात ठेवतेय. जोपर्यंत माझं काही खरं नाही तोपर्यंत तुझंही काही खरं नाही , धमकी समजं! ह्या अशा विचारांनाच कोहम्-सोहम् मानायला पाहिजे नं की विशिष्ट रंगाचे आसन अंथरून विशिष्ट दिशेला तोंड करून तुझे नाव मुखाने घेणे म्हणजे 'कोहम् सोहम्' आहे. मी मानव आहे, यंत्रमानव नाही. तू अवडंबरापुरता उरलायस! अवडंबराची नवी नवी फँसी रूपं बाजारात येतात व त्याचे नियम सांगणारे एजन्टही. अर्थशास्त्राचा नियम अध्यात्मात का नाही लावत लोक, जितकी मध्यस्थांची साखळी मोठी तितके ग्राहकांचे नुकसान अधिक. वेडे, क्रूर, नार्सिसिस्ट ,मूर्खं गोळा झालेत बघं. आधी सुरक्षा देणारे कवच, आता सोन्याच्या बेड्या झाल्यायत. धर्मात अध्यात्माचा लवलेशही राहिला नाहीये. तरीही काही जणांना दोन्ही एकच वाटतं. ध्यान त्यांना आवडत नाही , मंदीरात पहाटे उठून उपाशीपोटी अनवाणी जाणे, घरात ताटवाट्या बडवणे जास्त नैसर्गिक वाटते. मी काही तुझी एजन्ट नाही. सत्य जर सिंहासारखे असेल तर तुझी डरकाळी त्यांना का ऐकू येत नाहीये. तुला आयडेन्टिटी क्राईसेस कसे आले नाहीत अजून! तुझी नक्कीच शेळी झालीये. उठ आता !

एकदा काय झालं माहिती, रामकृष्ण परमहंसांच्या कानावर केशवचंद्रांची कीर्ति गेली. आता कीर्तिने भूरळ पडावी असे काही रामकृष्ण नव्हतेच. केशवचंद्र म्हणजे अचाट बुद्धिमत्ता आणि अभिनव अशा बंगाली लिपीचे संशोधक, ब्राह्मोसमाजाचे सर्वेसर्वा, ख्रिस्ती धर्माचे थोर अभ्यासक. सतत भद्र लोकांनी वेढलेले, लोकप्रिय. परमहंसांना जगन्मातेची आज्ञा 'केशवला भेटंच'. परमहंस म्हणाले 'अगं, ती मोठी लोकं वेगळीच भाषा बोलतात. मी काय सांगू त्यांना, आणि माझ्यासारख्या अशिक्षित खेडूताचं त्यांनी का ऐकावं. मातेनी नादचं लावला. मगं गेले तर त्यांचं ते ध्यान बघून कोणी त्यांना बोललंही नाही. असं तीनदा झाल्यावर केशवांची भेट झाली. केशवांना परमहंस आपलेच वाटले.भद्र लोकांना आत्मशोधापेक्षा ब्राह्मोसमाज व त्याची मतं महत्त्वाची होती. केशव यात अडकणाऱ्यांपैकी नव्हतेच. निर्मळ मनाचे असल्याने ते ब्राह्मोसमाजातूनच बाहेर पडले. ब्राह्मोसमाजाची झळाळीच गेली. सुरवातीला सगळेच समान ध्येयाने प्रेरित असतात पण हळूहळू बंधनं , एकमेकांचे अहं , समाजातले स्थान व लोकप्रियता या गोष्टीं ध्येयापेक्षा मोठ्या होतात आणि कळपाची निर्मिती होते. केशवांचा आपल्याच मूल्यांबाबत गोंधळ व्हावा व रामकृष्णांना परमहंस असून एकटेपणा यावा मग आमचे काय व्हावे.

हे तुला सगळं माहिती आहे , मलाही माहिती आहे. आपण काय विसरलो आहोत ह्याचेही विस्मरण झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना हे पुन्हापुन्हा वाचण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सर्वव्यापी असली की 'अतिपरिचयात अवज्ञा' ह्या उक्तीला अनुसरून काही जाणीवा बंद होतात बहुतेक !!!जिथे अर्जुनाला स्मरण करून द्यावे लागले तिथे आमच्यासारख्यांचे काय.

Integrity is doing the right thing even when no one is looking, right?! सगळी नीतिमान लोक आस्तिक व पापी लोकच खरीखुरी नास्तिक वाटतात मला आता. मी माझ्यापुरता आस्तिकत्वाचा व ईश्वराचा संबंध लावणं संपवून टाकले आहे. पण जगात वेगळ्याच कशाला तरी यश मिळतंय. हे दिसत असताना मला माझ्याकडे आता काहीच राहीलं नाही असंच वाटणार नं. इतरांच्या चुका मीही करत राहू का. जिथे माझा रस्ता संपतो तिथे मुलांचा सुरू व्हावा ना? का सगळ्यांनी एका वर्तुळातच फिरत रहायचं. ज्यांना वर्तुळ दिसत नाही त्यांचं चांगलंय, ज्यांना दिसतं ते तर बाहेर पडायचा प्रयत्न करणारचं नं. बेसिक इन्स्टिंक्ट..! भ्रमाच्या एका बुडबुड्यातून दुसऱ्या बुडबुड्यामधे जाणे म्हणजे प्रगती नाही हे मला चांगले ठाऊक आहे. तू हरवला आहेस, मी नाही. मला सगळं स्पष्टं दिसतं, शब्दांचा पाऊस पडतोय. फक्त मिळतेजुळते शब्द वेचायचा अवकाश असतो, म्हणून हा पत्रप्रपंच!

तुझी 'अस्मिता'

प्रेरणा :--
मोको कहाँ ढूंढें रे बन्दे, मैं तो तेरे पास में ।


मायबोलीवरील लिंक

तिथे याविषयावर बरीच उद्बोधक चर्चा झाली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता