बंदिवान मी ह्या संसारी

बंदिवान मी ह्या संसारी



<a href="https://en.m.wikipedia.org/wiki/Bandiwan_Mi_Ya_Sansari">बंदिवान मी ह्या संसारी</a>

आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव. 

दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी 

१९८८


आशा काळे(कमल)  लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं.  गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात. 


मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी'  ;)..!


या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भत्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!

बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून  पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स. 


निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही ;) '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.


पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून.  मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही.  पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.


#दोनतासकुठंहोताकाकू

खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.


मायबोलीवरील लिंक आणि अभिप्राय


©अस्मिता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता