जवान
जवान -नेटफ्लिक्स
दोन तास पन्नास मिनिटे लांबीचा- एकतर अतिशय मोठा आहे. त्यात कथानक वीस मिनिटात संपेल इतकं आहे , बाकीचे वीस तास मारामारी आहे. एकदा मधेच मी पॉज केलं तर टिव्हीवरच्या कोपऱ्यात 'एक्स्टेंडेड कट' दिसलं, प्राण कंठाशी आले होते, त्यात 'अब क्या बच्चे की जान लोगे क्या' झालं. दोन शाहरुख खान आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. हो, विक्रम आणि आझादमधे तेवढाच फरक आहे.
मोठ्या शाखा-विक्रमचा ट्रॅक सुरू झाला की माझं लक्ष उडालं. सेथुपतीनी हाणहाणहाणल्याने मोठ्या शाखाला 'याददाश्त खो गयी' झाले व एक्सप्रेशन नदीत वाहून गेले. डोळे फिरवून काहीतरी मिनिमम दाखवतो. मोठा शाखा जेव्हा तरूण होता, तेव्हा तो जितेंद्रचे कपडे घालून फिरत होता. पण तेव्हा तो स्वतंत्र पात्र- विक्रम वाटलाच नाही. देहबोलीत कसलाही फरक नाही, फक्त कपडे-केस बदलले. बाबा व मुलगा शाखा म्हणजे जस्टिस चौधरीच जणू. :फिदी: तरूण शाखा -आझादलाच फॅन्सी ड्रेसमध्ये पाठवलंय असं वाटलं. दिपीका तर साडी नेहमीपेक्षा खाली नेसणारी निरूपा रॉयच. इतकं रडली आहे की ज्याचं नाव ते. स्त्रियांचा तुरुंग हा एक लेडिज हॉस्टेलचा भाग वाटतो. अधुनमधून 'ऑरेंज ईज द न्यू ब्लॅक -इन निरूपा रॉय व्हर्जन' बघायला मिळते.
नयनतारा काहीही प्रभावी नाही. बांधा व उंची चांगली आहे. तिची तिच्यामुलीसोबत किंवा आझादसोबत कसलीही केमिस्ट्री दिसत नाही, फारच सुपरफिशियल वावरते. आपल्या मुलीला बाबा म्हणून आवडलेल्या माणसाशी लग्न करते, हे काय कारण आहे? उगाच बंदूक घेऊन इकडंतिकडं हिंडते. 'एक था टायगर'ची कट्रीना यापेक्षा कितीतरी सरस, चपळ आणि तडफदार वाटली होती. तिला आझाद तोच गुंड आहे, हे लक्षात कसं येत नाही. आपल्याला स्पष्ट ओळखू येत असतं. जुन्या काळी मस लावून आलं की ओळखू यायचं नाही, तसं हा तुटका मास्क लावून वेषांतर करत होता. वेषांतरही बेमालूमपणे न करता भाविकांना श्री श्री श्री शाखांचे थोडे दर्शन झालेच पाहिजे ह्या बेताने केले आहे.
आझादची गर्ल गॅन्ग लेम आहे. ब्रह्मास्त्र मधली हिरोची गॅन्ग जितकी लेम होती तितकीच, फक्त यांना स्वतःची कथा आहे. त्यांची कथा मूळ कथानकात जोडून मरणांत पिळलं आहे. आता मंगळसूत्र 'छिनून' घेतलेलं बघितल्यावर डोळ्यात पाणी येणारी पिढी राहिली नाही. 'बेनटेक्सच असेल दुसरं येईल त्यात काय' वाटतं.महाराष्ट्रीयन शेतकरी दाक्षिणात्य वाटत होता, त्याला विवस्त्र करून त्याचा अपमान केल्याने त्याने आत्महत्या केली असं दाखवलं आहे. पण स्वतः आझाद नंतर एका पोलिस ऑफिसरला विवस्त्र करून तुरुंगाबाहेर संजय दत्तकडे पाठवतो, ती मात्र गंमत आहे बरंका..! पुष्पा जसं गुंडाला स्त्रियांच्या रिस्पेक्टचं प्रवचन देऊन नंतर एका स्त्रीला हसण्याचे पाच हजार देतो. ह्या विरोधाभासाच्या शैलीत दाक्षिणात्य सिनेमांची हातोटी आहे. पण मग दांभिक प्रवचन तरी देऊ नका, उघडउघड उथळपणा करा.
संजय दत्त सिनेमात का आहे हे मला काही कळलं नाही. मधेच गर्ल गॅन्ग राजस्थानी मेकप करून ट्रक पळवते तेही कळलं नाही. फक्त डोळे बघत होते, मेंदू बंद पडला होता. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सिनेमात सुसूत्रता व सलगपणा नाही. रजनीकांतच्या सिनेमात (जेलर) मसाला असूनही सुसूत्रीकरण असल्याने तो सिनेमा म्हणून चांगला-एन्गेजिंग वाटला होता. त्यातला विनोदही बरा होता. इथं टायमिंग जाम गंडलं आहे. सेथुपतीला विक्रम सॅन्टा क्लॉज म्हणतो तो पंच बघा. भट्टी जमली नाही . कुठल्याही पात्राला कसलीही रेंज/हाय-लो नाही. एकसारखे वागतात. सेथुपतीला राग आला की तो चंची काढून मॅट्रिक्स सिनेमातल्या लाल-निळ्या गोळ्या खातो-खाऊ घालतो. ओठांची माफक हालचाल करून संवाद व गाणी म्हटल्यासारखी वाटली -रामसेंच्या भुतांची आठवण झाली. मूळ कथानकाला इतके पाय फुटले आहेत की ते अळीसारखं वळवळत रहातं. मी असह्य झाल्याने शेवटापर्यंत बघू शकले नाही. क्रिं-जवान..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा