आत्मपॅम्फ्लेट

 


मला तर खूपच आवडला आत्मपॅम्फ्लेट. ते नॅरेशन जरी काही ठिकाणी लांबले असले तरी प्रेक्षक म्हणून एकदा त्याचा वेग अचूकपणे पकडला की आपण बरोबर रोलर कोस्टर सारखं खाली-वर जातो. नुकताच बघितलेला हेन्री शुगरही असाच वाटला होता. नॅरेशन वेगवान असण्याने कथानक एकाग्रता कमी असलेल्या प्रेक्षकाला धरून ठेवते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून टीमचं कौतुक वाटलं आणि जिथे मार्केट फेअर नाही तिथे कलाकृती नवीन धाटणीत सादर करणे याला हिंमत लागत असावी.

माझ्यामते 'सर्वधर्मसमभाव' ह्या कन्सेप्टला कल्पकतेचा डेड एन्ड आला आहे. 'अमर ‌अकबर ॲन्थनी' पासून- ते 'बॉम्बे'- ते मागच्या आठवड्यात आलेला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पर्यंत सगळे जॉन्रा+कथाप्रकार करून झालेले आहेत, तरीही हा सिनेमा मला रिफ्रेशिंग वाटला. कारण सगळ्या जातींच्या कंडिशनिंगवर वास्तववादी भाष्य करूनही सिनेमा कुठेही कडवट वा टोकदार झालेला नाही, त्याने प्रेक्षक म्हणून तो सहज स्विकारता येतो व प्रवचनाचं ओझं होत नाही.
घराण्याचा मूळ पुरुष 'स्त्री' असणं हेही आवडलंय, आईबाबा, शिक्षक आवडले. मित्र तर खूपच आवडले. भावांनोने तर शेवटी धमाल आणली आहे. सगळे मिळून मिसाईल उचलतात व सर्व शत्रू डोळ्यात पाणी आणतात ते गमतीदार व निरागस वाटलं. 'चाचा चौधरी' कॉमिक्स मध्ये जी धमाल आणि निरागसता असायची , ती खोटी वाटली तरी मजा यायची तसं काहीसं वाटलं. Happy

साधारण नव्वदच्या दशकातील बालपण असणाऱ्यांसाठी खूपच रिलेटेबल झाला आहे. अगदी राममंदिराची वीट- बाबरी मस्जिद असो , बर्फाचा गोळा, बेंचवर कर्कटकने खोडलेली नावं, शाळेत न्यायला येणाऱ्या बाई, इंग्रजी बोलण्याचे झटके मित्रांची उधारी ई .


सिनेमा लहान मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिल्यासारखा वाटला. गंभीर विषय असूनही त्या बाबींचा अनुल्लेख किंवा उदोउदो दोन्ही न करता, वास्तववादी व विनोदी दोन्हीला स्पर्श करूनही कथा म्हणून पुन्हा स्वतःचं वेगळेपण जपत स्वतंत्र आणि अलगद रहातो. कुठेही आव किंवा अभिनिवेश नाही, एखाद्या निरागस लहान मुलाने त्याची गोष्ट तिखटमीठ लावून सांगावी व काही खरं सांगावं आणि थोड्या थापाही जोडाव्यात आणि ते ऐकणाऱ्याला कळूनही त्यानं मुग्ध होऊन ऐकत बसावं तसा अनुभव होता. 
पुन्हा बघेन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता