रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या Stopping by woods on a snowy evening या कवितेचा भावानुवाद




 <em>Whose woods these are I think I know.

His house is in the village, though;

He will not see me stopping here

To watch his woods fill up with snow.


<em>My little horse must think it queer

To stop without a farmhouse near

Between the woods and frozen lake

The darkest evening of the year.</em>


<em>He gives his harness bells a shake

To ask if there is some mistake.

The only other sound’s the sweep

Of easy wind and downy flake.</em>


<em>The woods are lovely, dark and deep,

But I have promises to keep,

And miles to go before I sleep,

And miles to go before I sleep.</em></em>





-----------





रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता सर्वांच्या परिचयाची आहे.

त्यांना ही कविता सुचली त्या काळात आर्थिक चणचणीमुळे आपल्या मुलांसाठी नाताळाला काही भेटवस्तू घेता आल्या नाही याचं त्यांना अपार दुःख झालं होतं. एक आपेशी पिता म्हणून टोचणी लागलेली असल्याने त्यांना आत्महत्येचे विचार यायला लागले पण त्यांनी हताश मनाला पुन्हा एकदा समजावून योग्य मार्गावर नेले. 



एक 'पृथ्वी' नावाचं गाव आहे म्हणे आणि तुम्ही तिथे काही काळ जाऊन आलात आणि परत आल्यावर कुणी विचारलं 'कसा वाटला अनुभव' तर तुम्ही जे काही सांगाल, तेच तुमचं जीवन. "नको जाऊस, फार तर एकदा जावू शकतोस , काय भाषा बोलतात काय माहीत मी तर जन्मभर चाचपडतच राहिलो, तिथलं मला काहीच जमलं नाही, यंत्र झाली आहेत सगळी-माणसं शोधूनही सापडत नाहीत, काय करायचेय जाऊन वेडेयत सगळे, मला माझ्यासारखं कुणीच सापडलं नाही म्हणून मी कायम एकटाच राहिलो....." . unrecommend करायला अनंत कारणं सापडतील, जगायला मात्र एकही कारण पुरेल... 'क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा' !


प्रत्येक माणूस मृत्यूचा विचार कधीनकधी करतच असतो. अनिश्चिततेचे सावट आलेल्या मनाला प्रचंड भीती किंवा एकदा कधीतरी हे सगळंच संपणार आहे याचा दिलासा ह्यापैकी काहीही वाटू शकतं. मृत्यूमुळे जीवन अर्थहीन आणि अर्थपूर्ण दोन्ही होतं. मरणाची भीती नसती तर कदाचित आईलाही अपत्याची काळजी वाटली नसती. अर्थहीनतेत आपण समर्पित राहू शकत नाही म्हणून त्याला अर्थपूर्ण समजून पूर्ण झोकून देऊन कर्म करत रहाणं हेच उचित आहे. आता आलोच आहोत तर देऊ शंभर टक्के, वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा.....



 निराशेच्या गर्तेत पुन्हापुन्हा जाणाऱ्या मनाला अवखळ घोड्यासारखी तीच-ती झापडं वारंवार लावून कर्माकडे वळवायचं हाच कवितेचा आशय आहे. अतिशय साधे शब्द आणि जीवघेणा गहन अर्थ. अन्वयार्थ किंवा भावानुवाद हा आपण किती वेदना आणि सुख बघितलं आहे, त्या परवशतेच्या दऱ्या -गर्ता, त्या आनंदाच्या- यशाच्या टेकड्या- ती उन्मादाची शिखरं या दोन्ही मधलं बेफाम अंतर , तोच आपला एखाद्या कलाकृतीकडे बघायचा दृष्टिकोन..! 


 सरळ रेषेतलं जीवन हवंय कुणाला, अर्थ समजून घेण्यासाठी कड्यावरून उडी मारायची तयारी ठेवायची पण मरायचं नाही. अश्वत्थाम्यासारख्या चिरंतन काळापासून भळभळणाऱ्या अमर्त्य वेदनेचे दोन क्षण अनुभवायला झोकून द्यावंचं लागतं. असाही काय अर्थ आहे नाही तर.... कशालाच. 



हे कुणाचं 'अरण्य' आहे कोण जाणे, घटकाभर बसायला गेलं तर मेलं ओढ लावतंय. मी गुपचूप आलो तर कळेल का कुणाला, देव करो आणि कुणाच्या लक्षातही येऊ नये. सगळीकडे हिमवर्षाव झाला आहे, दूरदूरपर्यंत कुणी नाही. मी असं तडक कुठल्याही बाजारी न थांबता- न भुलता इथं येणं आणि या तरूंकडे हरवल्यासारखं एकटक बघणं ह्या माझ्या घोड्याला विचित्र वाटतंय बहुदा. 



त्याला काय कळणार या अरण्याची ओढ, ती निष्पर्ण तरूंची राई, आयुष्यातील सगळ्यात काळीकुट्ट संध्याकाळ वाटावी अशा या त्यांच्या दूरपर्यंत पसरलेल्या संध्याछाया. आजची रात्र इतकी गर्द-गर्द की वाटावे या रात्रीची सकाळ कधी होणारच नाही. जिथून आलो तिथं जायचा मोह अधूनमधून होतोच. 'झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया....'



किती गूढ-गहिरं अरण्य आहे हे, का खुणावतंय मला. कुठं संपतं का असंच क्षितिजापर्यंत जातं कळत नाही, अंतच नाही की काय याचा. आत पाऊल ठेवलेला माणूस परत आलेला बघितलंय का कुणी. थांबवा रे कुणीतरी या संमोहनाला..!


माझ्याच शंकाकुशंका, अपयश, अपेक्षाभंग, निराशा, टोचणी यांची पेरलेली बीजं आकाशाला भिडणारी वृक्षं कधी झाली कळलंच नाही. असंख्य बीजांची दाट झाडी. इतकी उंच की प्रकाशाचा मागमूस नाही. फक्त काळोख... ओळखीचा. हे घोडं आणि त्याच्या घंटीची किणकिण. थंड वाऱ्याची कुजबूज , भुरभुरणारं बर्फ ... निःशब्द शांतता पसरली आहे. ह्या विश्वात फक्त मीच आहे जणू. गूढगर्भातून चिरनिद्रेच्या अनाहूत हाका. जन्मोजन्मी ज्याची प्रतिक्षा केली तीच व्याकुळता घेऊन पुन्हापुन्हा काळजात खंजीर खुपसायला तयार. 


   हे घोडंही जणू मोठी चूक झाल्यागत बघायला लागलंय. आपण ही अंधाराची लक्तरं घेऊन परत जावं हेच खरं. अरण्य कुठं जाणारं ... ते असंच उभं... नित्य.. शाश्वत. तीच निष्पर्ण तरुंची राई. तूच वाट बघ बाबा. अरण्या, तू विलक्षण मोहक आहेस खरा, पण दिल्याघेतल्या अपूर्ण वचनांची काळजातली खिंडारं घेऊन मी काही येत नाही आता... अजून पुष्कळ काही करायचं आहे. सहस्र स्वप्नांची आणि समर्पणाची पूर्तता होईपर्यंत तू वाट बघ 'चिरनिद्रेच्या अरण्या'... तू वाट बघ... पुष्कळ मोठा पल्ला गाठायचाय... आता तूच वाट बघ माझी. 


©अस्मिता

Copyright free picture from pexel

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता