12th Fail (Hindi movie)

 




12th Fail सुरेख जमलाय. खूप आवडला.

विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही.

त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला.

मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आहे.

आज्जी, बाबा, आई, शिक्षक, मित्र सगळेच आवडले. आज्जी 'बा बहू और बेबी' मधली बा - सरिता जोशी आहे, आता थकल्यासारखी दिसते. 'टूरिझम' ऐवजी चुकून 'टेररिझम'वर निबंध लिहितो तेव्हा आपलाच जीव तळमळतो. त्यामुळे त्याला जेव्हा यश मिळतं आपल्यालाच सुटल्यासारखं होतं. तो ताण, तगमग आणि समर्पण अतिशय खरं वाटलं आहे. एरवी निबर होत गेल्याने अशा गोष्टी कथेतच असाव्यात अशी आपली अपेक्षा असते पण हे खरं असल्याने ते सकारात्मक झालं आहे.

खाकी- वेबसिरीज मधे याचाच थोडा पार्ट टू आला आहे. पण तो नायक प्रिव्हिलेज्ड पार्श्वभूमी असलेला होता. कुणीही कमी/जास्त नाही. 'मैं लठ्ठ गाड दूं- मैं जाडा फाड दूं' जिगर ठेवणाऱ्या सगळ्यांचाच आदर व कौतुक वाटते. 


नंतरही हे वर्थ होते/ नव्हते- पेक्षा ज्या परिस्थितीत त्याने एवढी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली व जिद्दीने आणि निष्ठेने ती पूर्ण केली हे कुठल्याही क्षेत्रात असणाऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरते. जो एवढी जिद्द दाखवू शकतो तो तेही सारून नेईलच असा विश्वासही वाटतो. मुख्य म्हणजे अशा कथा समोर यायला हव्यात कारण आपलं कवच गळून पडतं. काही प्रेक्षकांना डोळ्यासमोरून चित्र हलली म्हणजे सिनेमा बघितला असं मानता येत नाही. त्यात पृष्ठभागाच्या खाली काय आहे याची उत्सुकता असते, मग ते काही बाबतीत अपूर्ण असलं तरी चालतं. अपूर्णतेची गोडी ! 


UPSC चे भयंकर वास्तवही खोटे नाहीच पण हा चित्रपट त्या व्यक्तीपुरतंच असलेलं सत्य आहे. जेव्हा असे सिनेमे जास्त लोकांपर्यंत पोचतील/आवडतील, निर्माते आणि दिग्दर्शक सुद्धा असे, याविरुद्धचे वास्तव, दुसरी बाजू किंवा आणखी पूर्णपणे वेगळे विषय संयत पद्धतीने मांडायला धजावतील.


आपण प्रेक्षक म्हणून किती उदासीन आहोत, चांगल्या गोष्टींवर पटकन विश्वास बसत नाही, नकारात्मक गोष्टी मात्र सतत खुणावत असतात. सकारात्मकता सुद्धा कचकड्याची असते. याचे पर्यवसान होऊन बघायला शेवटी 'राज मल्होत्रा' वगैरे पात्रच बरं वाटतं-आनंद देतं. इतके ओटीटी उपलब्ध असल्याने आता लॉयल प्रेक्षकही नाही राहिलेत.


जसं आपण पठाण- जवान- एक था टायगर ३ विसरू तसा हाही सिनेमा विसरून जाऊच. जर आता impulsivelyच सगळं बघणार असू तर त्यातल्या त्यात असे विषय खूपच बरे वाटतात. Breath of fresh air..! आपल्याला फक्त त्याला enable करायचं आहे.


सिनेमा बघून मिळालेली 'उमेद' काही चिरकाल टिकत नाही. माणूस स्वयंप्रेरितही (किंवा भ्रमिष्टही )असावा लागतो. चित्रपटातील वाईट गोष्टी मात्र सहज घेतल्या जातात. कारण reptilian brain ला सुखाचा 'शॉर्ट कट' सोयीचा वाटतो. संदर्भ - कदाचित 'ॲनिमल' सिनेमा.


उथळ, सवंग आणि अतिरंजित सिनेमांच्या लाटेत एखाद्या मृद्गंधासारखा वाटला. व्यावसायिक सिनेमापेक्षा समांतर सिनेमाची आठवण करून देतो.


- अस्मिता.


https://www.maayboli.com/node/84513?page=1

फोटो सौजन्य विकिपिडिया.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग २

हृता

ऑपनहायमर