खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

 



मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४

मराठी: लेखन घडते कसे -उपक्रम

----------------


शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये.


एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंडं दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌


नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांनी भरलेली असायची आणि विषयांचे बंधन नव्हते. ज्योतिषापासून पॅपिलॉनपर्यंत, प्लूटोच्या माहिती पासून 'साद देती हिमशिखरे'पर्यंत, आईच्या दासबोध ते रूचीरापर्यंत सगळं मी आठवीनववीपर्यंत वाचून झालं होतं.


आईचं मराठी भाषेवर फार प्रेम आणि शब्दसंग्रह अफाट. फारच शांत, अतिशय अदबशीर, माणसं जोडणारी आणि संयमी होती. तिची शांतवणारी एनर्जी उतरते माझ्या आध्यात्मिक लेखनात. 'स्प्लिट पर्सनॅलिटी' सारखे अनेक कप्पे आहेत मेंदूत, योग्य त्या कप्प्यातून काढून त्या-त्या वेळी ते वापरता येणं आणि तरीही या सगळ्यापासून सुद्धा कुठंतरी अलिप्त रहाता येणं ही निसर्गाची कृपा. 'Like a Samurai with a sword in his one hand and meditating with the other' ह्या वचनाचा आदर्श घेतला आहे.


माणसं जोडणं सुद्धा तिचंच. वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टींवर प्रचंड मार्मिक भाष्य करायची. सगळ्याच मराठी कविता तिला पाठ असायच्या. आम्ही त्यावर गप्पाही मारायचो.


माझ्यात लहानपणापासून एक विचित्र -अफाट एनर्जी आहे, तिला वाट करून दिली नाही तर ती मलाच जाळून टाकेल हे लक्षात आल्याने आईने मला बऱ्याच गोष्टींमधे गुंतवून टाकले होते. एकदा 'जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला राहीन मी घरट्याविना चिमणी गेली उडून राना' ह्या कवितेतल्या ओळींवर गप्पा मारताना 'तू अशीच आहेस, तू अगदी त्या चिमणीसारखी आहेस. तू पिंजऱ्यात राहूच शकत नाहीस आणि म्हणून मला तुझी सारखी काळजी वाटते' म्हणाली होती. असं चालत नाही नं पोरीच्या "जातीला"...... 'त्या' पिंजऱ्याला धडका द्यायच्यात लिहूनलिहून. 'लेकीच्या माहेरा माय सासरी नांदते' हेही तिनंच एकदा बोलतबोलत समजावलं होतं. लग्न होईपर्यंत समजलं नव्हतं.


खरंतर ज्या गोष्टींचा अभिमान वाटायला हवा, त्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे असे आजुबाजूचे सामाजिक संस्कार व मानसिकता असल्याने व्यक्ती म्हणून मला अजूनही या दोन्ही कवितांच्या अभिव्यक्तींचा 'सुवर्णमध्य' साधता आलेला नाही.


आजोळ डोक्यावर पदर/ धारदार पितृसत्ताक व 'एक गाव बारा भानगडी' टाईप खेडं आणि घरात शंभर चतुर माणसं. तिथे सरळ बोलतच नाही कुणी. मग आपण अजूनच हजरजबाबी व्हावं लागतं. गंमत म्हणून मामाच्या किराणा आणि शेतीच्या अवजाराच्या दुकानातही बसलेली आहे मी. जगातील सगळ्यात बोअर दुकान असते ते. हे असं विचित्र कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मी कुणाशीही 'फ्रिक्वेंसी मॅच' करून लिहू शकते.‌


'पर्यावरणाचा ऱ्हास' हा एकदा निबंधाचा विषय होता. वाड्यातल्या एका ताईने शेवटी लिहायला दोन ओळी सुचवल्या, ज्या मला अजूनही आठवतात.


हिरवे शिवार सारे पिवळे पडून गेले

आकाश पेलणारे पक्षी उडून गेले


या ओळी मला इतक्या आवडल्या की मी त्यांना बऱ्याच ठिकाणी लिहिले व बक्षीस मिळविले.‌ कुणाला ही कविता माहिती असेल तर सांगा.‌


इलेक्ट्रॉनिक आणि तेही फक्त मायबोली, मैत्रीण आणि ब्लॉग. ब्लॉगसाठी म्हणून आवर्जून लिहिले नाही, माबोसाठीच लिहिते. मग एकत्र रहावं म्हणून ब्लॉगवर टाकते.


सगळ्याच प्रकारचं लेखन करते. जे कुणीही केले नाही ते मला माबोवर करायचे होते. त्यामुळे मी शंकराचार्यांपासून गोविंदापर्यंत कुणालाच सोडलं नाही. इथं पैसे मिळत नाहीत/द्यावेही लागत नाहीत आणि नोबेल किंवा पुलित्झरही मिळत नाहीत. मग कशाला अडकवायचे स्वतःला. कधीकधी वाटतं मी कविताच कशी केली नाही अजून. ही धमकी असेल/ नसेल ते काळच ठरवेल. लेखनामुळे नाही तर माणसं जोडण्याच्या हातोटीमुळे माझे लेखन काही लोकांना आवडते. लोक तुम्ही काय लिहिले हे तितकं लक्षात ठेवत नसतात, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हीच 'last seen memory' असते. मी इतरांच्या फक्त चांगल्या स्मृतींमधे रहायचा प्रयत्न करते.


माझ्या मैत्रिणीने मला प्रोत्साहन दिले होते. तेव्हा मला वाटायचं जो उठतोय तो लिहितोय. लेखक जास्त वाचक कमी झाले आहेत, त्यात मी कुठं लिहू. पण तिने मला म्हटलं 'ते लिहितात, तू काळजात सुरा खुपसतेस' म्हणून तू लिही. माणसं आणि भावभावनांचे कंगोरे बघून प्रेरणा मिळते. आध्यात्मिक लेखनामागे निसर्ग, जवळची तेजस्वी माणसं व माझी जिज्ञासा प्रेरणा आहेत. इतरांना माझा दृष्टिकोन समजवायला लिहावं वाटतं.


मी कुठल्याही लेखनप्रकाराला कमी समजत नाही पण चित्रपटावरचं लेखन माझं सुपरफिशियल व्हर्जन आहे, कारण ते फक्त निरीक्षणाधारीत आहे. वैचारिक लेखन मात्र दृष्टिकोनाने आविष्कृत आहे. मी किती खोल विचार करू शकते, हे मला लिहायला लागल्यावर कळलं. आधी वाटायचं सगळेच करतात. मला माझ्या खोल विचारांतून सहज बाहेर पडता येते पण वाचकांचा गुंता होतो. त्यांना चक्रव्यूहात अडकून स्वतः लीलया बाहेर येऊन त्यांची फजिती बघायला मला मजा येते.


लेखनाला विषयाबद्दलची आस्था लागते, त्यामुळे ते कुणाला पोचलं की खूप आनंद होतो. कौतुकापेक्षा 'पोचलेले' प्रतिसाद भावतात. मायबोलीवरील लेखनासाठी लेखक नसलं तरी चालतं पण प्रतिसादांना उत्तरं देण्यासाठी वकील व्हावं लागतं. आजोळच्या आनुवंशिकतेमुळे ते मी मध्यरात्री सुद्धा करू शकते. लिहिताना मला माझे विचार अर्जुनाला माश्याचा डोळा दिसला तितके स्पष्ट दिसतात. त्यामुळे कुणाला पटवत बसवण्याची असोशीच वाटत नाही.


माझे इथले सगळे अनुभव अगदी अपवादात्मकरित्या चांगले आहेत. मला माबोकरांचं फक्त प्रोत्साहन, कौतुक आणि आपलेपणाच वाट्याला आला आहे. माझ्याही नकळतपणे आणि फक्त ऑथेंटिक राहून मी इथली अदृष्य सोशल लॅडरही भराभर चढली आहे. इतकं सहज-सरळ होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.


अगदी पहिल्या लेखापासून... जेव्हा मी नवखी होते तेव्हापासून प्रतिक्रियांची संख्या सुद्धा भरपूर. बरेचदा वाटतं मी एवढं प्रेम 'डिझर्व' करत नाही. माझ्यापेक्षा चांगले लेखन कौशल्य, दांडगा अभ्यास व आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेली लोक इथे आहेत आणि माझं 'तीसमारखां' सारखं झालं आहे.तीसमारखां keeps me grounded .


त्यामुळे मी प्रत्येक नवीन लेख/ प्रतिसाद कुठल्याही विषयाचं किंवा आधीच्या लेखाच्या कौतुकाचं/टिकेचं बॅगेज न ठेवता अगदी पहिलं लेखन असल्यासारखं लिहीत असते. मोबदला मिळत असो/नसो स्वलेखनाच्या प्रेमात अडकणं कल्पकतेसाठी (आणि अहंकारासाठी सुद्धा) अतिशय घातक ट्रेंड आहे. काहीही चिरकाल टिकणारे नाही, जे एकदोन क्षण मिळतात त्यात उत्तम करायची धडपड आहे . त्यामुळे त्याच्यात सुद्धा अडकायचे नाही आणि मला कायम नवीन विषयही खुणावत असतात. मला स्वतःला माझ्याच लेखावर चर्चा करायचा सुद्धा पाच दिवसांत कंटाळा येतो आणि मी 'नमस्कार' करून धूम ठोकते, 'कोपिंग मेकॅनिजम' नॉर्मल नाही. चांगल्या/ वाईट कुठल्याच भावनांमधे रमता येत नाही.


मी स्वतःला लेखिका समजत नाही कारण कुठेतरी 'पुस्तके लिहिणारी हीच लेखिका' असं समीकरण आहे पण मला निसर्गाने व्यक्त व्हायची ताकद दिली आहे आणि त्यातून मलाही आनंद मिळतो म्हणून हे जे चाललं आहे ते चाललं आहे. आताही कुमार सरांच्या धाग्यावर हेच लेखन असेच्या असेच डकवले तर मी वाचकांना कमी 'नार्सिस्टिक' वाटेल आणि स्वतंत्रपणे लिहिले तर जास्त, हे लक्षात आलं होतं पण who cares ..!


धन्यवाद 

-तुमचीच अस्मिता.

https://www.maayboli.com/node/84728




**** या उपक्रमानिमित्त कुठंतरी आपण नक्की काय करतो ह्याची तुलना केली गेली. थोर कवी- लेखक काय करायचे याचा अंदाज घेता आला. तरीही कुणाचीच निर्मितीप्रक्रिया नक्की काय असू शकते हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. कारण ज्याची कलाकृती असते, त्यालाही हे स्पष्ट नसतं आणि बरेचदा निर्मितीप्रक्रियेवर आपलं यत्किंचितही नियंत्रण नसतं. आपल्याला भ्रम असतो की नियंत्रण आहे पण नसतं. बरेच लेखन, चित्र, संगीत आणि इतर कलाही कुणीतरी त्या व्यक्तीकडून 'करवून' घेतल्यासारख्या असतात. निसर्गाच्या आवेगात आपण जितकी कमी ढवळाढवळ करू तितकी ती कलाकृती रसिकांच्या अंतरंगात जास्त पोचते.

या निमित्ताने मला काही तरी अंतरंगातील लिहावं वाटलं त्यासाठी आभार. इथं सगळा हौशेचा मामला असला तरी आपण एकमेकांमधल्या काहीतरी सुरेख- तरल भावना बाहेर काढू शकतो. We bring out the best or worst in each other sometimes. Choice is always ours ...!!


पर्सनल बद्दल- एकदा आपण इथं लिहिलं की लोक इथे आपल्याला आपल्याच अनुभवाबद्दल नक्की काय वाटायला हवं, हे सांगण्याची शक्यता असते. मलाही माझ्या 'गाभाऱ्यात' कुणी पाऊल ठेवलेलं आवडत नाही. बरेचदा त्यांना ते अनुभव आलेलेही नसतात. मग मनात येतं, तुम्ही ज्या गावाला गेलेला नाहीत त्या गावचा रस्ता मला दाखवू नका. 'टेरिटोरिअल' होते एकदम. एकएकट्याने मोकळं बोलायला मात्र आवडतं.


लेखन आपल्याला आपल्या अनुभवाकडे त्रयस्थपणे बघायला मदत करते आणि त्यापासून थोडं विलग करते. Reliving and relieving.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग २

हृता

ऑपनहायमर