असंख्येच्या अपारी- A trip to infinity

असंख्या किंवा infinity म्हणजे काहीतरी अगणित, अमर्याद, अमोज. ही गणित आणि विज्ञान दोन्ही विषयांतील अमूर्त संकल्पना आहे. अमर्याद गोष्टीची पहिली ओळख लहान वयात तारे मोजताना होते. पहिली जाणिव की काहीतरी आपल्या कुवतीबाहेरचं आपल्याला सताड डोळ्यांनी दिसतंय पण ते कधीही संपणारं नसावं. ते एकाचवेळी भयप्रद किंवा गूढ असल्याने कुतूहल जागवणारं असं दोन्ही असतं. माझ्यासाठी ही संकल्पना नेहमीच आकर्षक राहिली आहे. काळ कधीच संपत नाही, काळ्याकुट्ट विहीरीच्या डोहाचा तळ कधीच दिसत नाही. काळ अस्तित्वात नाहीच मुळात, फक्त घड्याळं आहेत. काळ अमर्याद आहे पण आपल्याला मर्यादेतच जगता येतं. हे कदाचित मानवाला मोजता यायला लागल्यावर लक्षात यायला लागले असावे. कारण तोपर्यंत 'मोज' आणि 'अमोज' कल्पना दोन्ही समानच. माणूस तेव्हाच खूप मोठा होतो जेव्हा त्याला कळतं की तो विश्वाच्या पसाऱ्यात किती इवलासा आहे. याकारणाने इन्फिनिटीचा विचार करायला हवा. असंख्येचे तीन प्रकार आहेत- भौतिक, गणितीय आणि आधिभौतिक. (Physical, mathematical and metaphysical) गणितीय- गणितातल्या कुठल्याही अमूर्त संकल्पनेच्या वापराआधी नियम घालून तिला ...