The help

 The Help (@Prime)

Emma Stone, Viola Davis, Octavia Spencer.




मायबोलीवरील लिंक
हा चित्रपट मीही काल पाहिला. चित्रपटाची कथा १९६५ च्या काळात मिसिसिपी राज्यातील छोट्याशा गावात घडते. हा काळ मानवी हक्क संरक्षणाच्या अविरत प्रवासातील जागृती होण्याचे छोटेसे पाऊल म्हणता येईल असा होता. अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची गुलामगिरीतून 'औपचारिक' सुटका होऊन शतक उलटून गेले होते तरी मानसिकता आणि वंशभेद तितकाच ठळक आणि क्रूर वाटावा असाच होता. त्यातल्या दोन घरगुती कृष्णवर्णीय मदतनीसांना मिळणारी अन्याय्य वागणूक व त्यांचा केला जाणारा वापर व तशा सगळ्याच स्त्रियांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या आयुष्यातील या प्रवासातील छोट्याछोट्या गोष्टींचे पुस्तक छापण्याची ही कथा आहे. एका गोष्टींच्या पुस्तकाची गोष्ट असूनही त्याही पलिकडे हा एक समांतर घडणारा अनौपचारिक इतिहास सुद्धा आहे.

या गावातील तरुण श्वेतवर्णीय पत्रकार एमा आपल्याला लहानपणी सांभाळलेल्या आयाचा शोध घेत असते. कारण एकोणतीस वर्ष या घरात राहून एमाला पोटच्या मुलीसारखा सांभाळ करूनही तिचे वय झाले या कारणाने हकालपट्टी करण्यात आलेली असते. मुलगी भेटायला आलेली असताना घरातील पाहुण्या उच्चवर्णीय स्त्रियांसमोर ती मागच्या दाराने न येता सर्वांसमोरून येण्यामुळे तिचा व लेकीचा अपमान करून घालवून देण्यात आलेले असते. त्या काळात हा उच्चवर्णीयांचा अपमान समजला जायचा. 'कलर्ड पीपल' यांनी गुलामासारखी सेवा करावी, जे दिले त्यात 'देवाचे आणि गोऱ्यांचे' आभार मानावेत अशी अपेक्षा केली जायची. त्यांचा सेवेचा मोबदलाही त्यांना उपकृत केल्याच्या आवेशात दिला जायचा, कसलीही कृतज्ञता किंवा आदर त्यांच्या 'असण्याला' मिळायचा नाही.

घरातील वर्षानुवर्षे मुलांना मोठं करणाऱ्या या स्त्रियांवर तीच मुले मोठी झाल्यावर मालकी हक्क दाखवायची. गोऱ्यांची बाळं सांभाळताना त्यांना आपले मूल दुसऱ्याकडे वाढविण्यासाठी द्यावे लागायचे. यांच्या मुलांनी शिकावे, यातून त्यांची सुटका व्हावी असे कुणालाही न वाटता उलट कोंडी- अडवणूक करण्याकडे कल असायचा. हीही माणसेच आहेत ह्या जाणिवेची जाणिव करून देणाऱ्या या गोष्टी आहेत. ज्यात मुलाच्या फीस साठी सफाई करताना मिळालेली अंगठी घ्यावी वाटणे व त्याला अत्यंत अपमानास्पद शिक्षा होऊन नोकरी जाणे. दुसरीला घरातील बाथरूमचा वापर न करू देणे व घराबाहेर वादळीपावसात जायला सांगणे व पर्याय नसताना वापरल्याने नोकरी वरून कमी करणे. एकीच्या तरुण मुलाचा कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने अपघात होणे व कलर्ड लोकांच्या हॉस्पिटलमध्ये 'असेच फेकून' येण्याने आईसमोर त्याचा मृत्यू होणे. ही फार हृदयद्रावक घटना वाटली, असे होतही असेल. या तिघींशिवाय अनेकींच्या गोष्टींचे संकलित रूप होऊन निनावी प्रकाशित केले जाणे व एमाने हे सगळे केलेले आहे हे लक्षात येताच तिचे ठरलेले लग्न मोडणे हेही त्या वंशवादाचाच भाग आहे.

एखाददुसरा प्रसंग सोडला तर चित्रपट गंभीर नाही. अधुनमधून या मेड्स हास्यविनोद करतात, मालिकिनींची थट्टा करतात व एकमेकींशी हसून खेळून बोलतात. अशाच परीघावरचे आयुष्य असले की सगळेच अंगवळणी पडून त्यातही गंमत शोधण्याचे कसब निर्माण होतेच आणि त्यामुळे ते ऑरगॅनिकही वाटते. त्याच सहजतेने सर्व प्रसंग येत जातात. एक प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे मुख्य फोकस वंशभेदावर असूनही चित्रपट पुरुषसत्ताक पद्धतीवर सुद्धा पुष्कळ भाष्य करतो. गोऱ्या स्त्रियांची नवरा मिळवण्याची धडपड, स्वैपाकघरापुरतीच निर्णयक्षमता, नोकरी करावी असे वाटणारीला विचित्र समजणे, आपल्या मुलीवर तरूणांनी कटाक्ष टाकावा म्हणून तंग कपडे घालून पार्ट्यांना आवर्जून पाठवणे. सगळ्या तरुण गोऱ्या स्त्रिया बार्बी बाहुली सारख्या दिसणे. स्त्री सौंदर्यांला आणि त्यानुसार मिळणाऱ्या अटेंशनला अवाजवी महत्त्व असणे.

सोशल लॅडर मधे सगळ्यात वर उच्चवर्णीय पुरुष मग उच्चवर्णीय स्त्रिया असणे, त्यामुळे या उतरंडीत कृष्णवर्णीय स्त्रिया या समाजातील सगळ्यात दुर्लक्षित व उपेक्षित असणे हे सुद्धा अधोरेखित केले आहे. ( जे आपल्याकडे जातीनुसार येते.)

चित्रपट मला आवडला, सर्वांचीच कामे उत्तम झाली आहेत. वायोला डेव्हिसचा अभिनय अप्रतिम वाटला ती डोळ्यांमधे सगळे भाव आणून उत्कटतेने वावरते. व्हायोला आणि ऑक्टेव्हिया यांची केमिस्ट्रीही छान जमली आहे. ऑक्टेव्हियाचा कॉमिक टायमिंग धमाल आहे, ती काही ठिकाणी धमाल उडवून देते. काहीकाही विनोदावर खरोखरच हसू आले.‌ एमाला रोज लपतछपत ह्यांच्या घरी जाऊन या गोष्टींची टिपणे घ्यावी लागतात व तीही हळूहळू गुंतत जाते हेही बघण्यासारखे आहे. शेवट सुखद असूनही कुठलाही अभिनिवेश किंवा खूप कलाटणी वगैरे न दाखवता सहज किंवा ऑब्हियसली येणारा वाटला. जरूर बघा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता