पाणी
पाणी चित्रपट बघितला. खूप आवडला. माझ्या नांदेड (मला मिरवायचे किंवा लाजायचे- दोन्ही नसते, 'जे आहे ते आहे' असाच अप्रोच असतो) जिल्ह्यातली लोहा तालुक्यातील नादरगाव नावाच्या खेड्यात घडणारी कथा आहे. हनुमंत केंद्रेे नामक युवक पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतो. त्यासाठी एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या गावकऱ्यांवा व खास करून भजनी मंडळ व बचत गटाच्या क्लृप्त्या वापरून गावातील स्त्रियांना एकत्र आणतो. संपूर्ण गावाच्या सहकार्याने व श्रमदानाने गावाला पाण्याच्या सोयीसाठी स्वयंपूर्ण करतो. लग्नासाठी सांगून आलेली मुलगी फक्त गावात पाण्याची सोय नाही म्हणून जेव्हा तिचे वडील नकार देतात तेवढं निमित्त हनुमंताला ह्या कार्यासाठी प्रेरणा देणारं ठरतं.
यातील प्रत्येक गाव माझ्या ओळखीचे आहे, लोहा व जिथे सुबोध भावेे भाषण देतो तो कंधार तालुका, माळाकोळी हे सगळेच मी ऐकलेले व बघितलेले आहे. पाणी टँकरने आणून विकणे, लोकांच्या रांगा, धुणं धुताना कपडे भिजवलेले पाणी भांड्याला वापरणे, कोरड्या पडलेल्या विहिरी- नद्या, कितीही खोल खणून- खंदून फेल गेलेले बोअरचे अपयशी प्रयत्न, आटलेले ओढे, पाण्याचा टिपूसही न येणारे हापसे, घागरी घेऊन उन्हातान्हाचे कोसकोस चालत जाणाऱ्या बायका ही प्रत्येक गोष्ट मी बघितली व कमी तीव्रतेने अनुभवली आहे. किल्लारीचा भूकंप हा माझ्या शाळकरी वयातला पहिला धक्कादायक अनुभव होता. माझे आजोळ तेथून फक्त तीस किलोमीटरवर असलेले खेडे आहे. तेथे भूकंपानंतर जमिनीतले पाणी आटून, गाव काही वर्ष अत्यंत दुर्भिक्षात होते. जो माझ्या अननुभवी जगातला पर्यावरणाच्या असमतोलाचा पहिला अनुभव होता. ती पाणी टंचाई मी कधीही विसरू शकणार नाही. फक्त नादरगावाची नसून संपूर्ण मराठवाड्याचीच ही कथा आहे.
औरंगाबादच्या पुढे गेल्याशिवाय खरा मराठवाडा दिसत नाही. खेड्यात पाणी नाही, वीज नाही, रोजगार नाही. सगळीकडे उडणारी कोरडी धूळ, बाभळीची झाडे, भेगा पडलेल्या जमिनी प्रचंड उन्हाळा आणि रूक्ष गवत. अत्यंत वाईट रस्ते, 'न भूतो न भविष्यति' असे कमरेचे टाके ढिले होऊन जातात. एक बाई उन्हातानात पायपीट करून घागरभर पाणी आणताना चक्कर येऊन पडते व जीव गमावते. काही जणं तिला उचलून नेतात तेव्हा दुसरी बाई तिच्या घागरीतले पाणी आपल्या घागरीत ओतून घेते हा प्रसंग बोलका आणि काळजाला हात घालणारा वाटला. सुरवात यानेच होते. छोट्याछोट्या प्रसंगातून पाणी टंचाई चांगली दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर गावाचा नेता किशोर कदम पाण्याच्या सोयीसाठी हनुमंत मदतीची विनवणी करत असताना जोरात चूळ भरतो तो प्रसंगही बोलका आहे. पाण्याच्या अनुषंगाने येणारे सूचक प्रसंग जागोजागी येतात. चित्रपट विचारपूर्वक बनवला आहे. डॉक्युमेंटरीच्या अंगाने जात व्यवस्थित माहिती देऊन मनोरंजनातही कमी पडत नाही. कथा बऱ्यापैकी लिनिअर आहे.
सगळं शूटींग तिथलंच आहे. चित्रपट व्यवस्थित अभ्यास करून बनवला आहे. भाषा अगदी मूळची मराठवाड्याच्या नांदेड जवळच्या खेड्यातलीच आहे. बसायलो, खायलो, करायलास, वगैरे पर्फेक्ट जमले आहे. आदिनाथचे बेइरिंग कुठेही सुटत नाही. सुबोध भावेचे मात्र काहीही होऊ शकत नाही. तो कायम पुणेरीच वाटतो. सुवर्णा आणि हनुमंतची लव्हस्टोरी सुद्धा गोड आहे. पुणेरी लोक भाषणं देऊन जातात तेही चपखल आहे. अभिनय सर्वांचाच चांगला आहे. बायकांचा विशेष आवडला, सहज वाटला. कपडेपटही मला त्या गावाप्रमाणे चपखल वाटला.
शेवटी खणताखणता जेव्हा पहार दगडावर बसून जमिनीला पाझर फुटतो, त्यांच्यासोबत प्रेक्षकांनाही शापमुक्त झाल्यासारखे वाटते. निष्ठा, जिद्द व ध्यासाची गोष्ट आहे, एकट्या माणसाची वाटली तरी संपूर्ण गावाची गोष्ट आहे. एका गावाची वाटली करी संपूर्ण मराठवाड्याचीच गोष्ट आहे. दुर्भिक्षाने सुरू होऊनही तृप्ततेकडे नेणारी गोष्ट आहे. साधीसरळ तरीही मोठं काहीतरी करून जाणारी साध्या माणसांची गोष्ट आहे. नक्की बघा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा