Goldfish
Goldfish हा दीप्ती नवल व कल्की केक्लां आणि छोट्या भूमिकेत रजत कपूर यांचा चित्रपट पाहिला. अतिशय सुंदर वाटला. नेहमीपेक्षा फारच वेगळा आहे. आई आणि मुलगी यांच्यातल्या ताणलेल्या नात्यावर आहे. मी सुरू केला तो फक्त दीप्ती नवलचे नाव बघून पण कल्कीचेही काम अप्रतिम आहे.
आईपासून दुरावलेली मुलगी आईचा डिमेंशिया वाढत गेल्यामुळे परत येते व तिला धड काळजी घेणं जमत नाही, त्यात नात्यात प्रचंड तिढा, दुखऱ्या आठवणी, आईचं रोज काही तरी विसरून जाणं/ प्रसंगी धोकादायक वागणं. जुन्या आठवणी काढून नात्यातील दुरावा कमी करावा म्हटलं तरी आई आणि मुलीचे पूर्णपणे वेगवेगळे भावविश्व, दृष्टिकोन व मतवादी स्वभाव. आईचा नवा मित्र रजत कपूर, व शेजारी रहाणारी लोक यांच्याशी जुळवून घेणे. आईला डिमेंशिया रुग्णांच्या केअर सेंटर मधे ठेवण्याचा निर्णय घेणे वगैरे फार फार सुंदर दाखवले आहे. बॅकग्राऊंडची गाणी/ गझला व ठुमऱ्या अतिशय सुंदर आहेत.
टिपिकल वृद्ध आणि तरूणाई यांच्या नातेसंबंधावर (जुनं फर्निचर - गळे काढणे, आम्हाला कुणी विचारत नाही, वृद्धाश्रमात 'सोडणे' टाईप बंबाळ करून सोडत नाही, लवलेशही दिसला नाही) नाही किंवा उगाच इमोशनल ब्लॅकमेल नाही. वास्तवाला धरून आहे, खरा आहे. दोघींमध्येही भरपूर दोष आहेत, आईनेही पालकत्वाच्या भरपूर चुका केल्या आहेत, एकमेकींना आयुष्यभर जज केले आहे. याची दोघींनाही जाणीव आहे. त्यात डिमेन्शियाची लटकती तलवार असताना आपोआपच नाते सुधारत जाते ते फार मस्त दाखवले आहे.
काही काही पंचेस एकदम भन्नाट आहेत - कल्की मैत्रिणीला कंटाळून म्हणते, माझ्या आईला मी आवडत नाही, बहुतेक तिला अजूनही माझ्या जन्माच्या वेळेचे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे आणि दीप्ती लेकीला म्हणते,' young people talk, old people pry. कल्कीचे नॅरेशन मधेमधे येते, तेही फार छान आहे. गोल्डफिश या मासळीला एकावेळी फार टिकणारी स्मृती वाट अटेंशन स्पॅन नसतो म्हणून हे नाव दिले असावे.
वैधानिक इशारा -आर्ट फिल्म किंवा उच्च अभिरुची गटात येत असावा. चित्रपट इंग्रजी आहे, युकेची पार्श्वभूमी आहे. एखाददुसरा संवाद तेवढा हिंदी होता.
-केक्लांचा उच्चार योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी ॲन्कींना थॅंक्स. विसरून 'कोचलीन' लिहिले होते आधी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा