प्रूफ

 प्रूफ (2005)



(Anthony Hopkins, Gwyneth Paltro, Jake Gyllenhaal, Hope Davis)

एका अतिबुद्धिमान गणितज्ञ व त्याच्या मुलीची गोष्ट आहे. दोघेही रूढार्थाने विचित्र, विक्षिप्त व लहरी वाटावेत अशा व्यक्तिरेखा. ॲन्थनी व ग्वेनेथने अप्रतिम काम केले आहे. तो शिकागो विद्यापीठात शिकवत असतो, तीही तेथेच शिकत असते. पण मानसिक आजाराने तो हळूहळू पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होत जातो, ज्याची जाणीव त्याला नसते. घरी बसून वह्याच्या वह्या गणितीय सिद्धता व सूत्रांनी भरवून टाकत असतो. काळवेळ खाणंपिणं ह्याचेही भान त्याला उरत नाही.

त्यात मानसिक आजार कुठला हे नक्की सांगितले नाही पण लक्षणं स्किझोफ्रेनिया सारखी वाटली. ती त्याचीच काळजी घेत बसते व तिच्याही स्वास्थ्यावर, अभ्यासावर व हळूहळू आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो. काही वर्षं दोघांनाही एकमेकांशिवाय कुणी उरत नाही.‌ कारण वेडसर बाबांची काळजी घेणारी तिरसट, अब्सेंट माईन्डेड मुलगी असे इक्वेशन होऊन जाते. बाबांच्या फ्युनरलला गर्दी बघून ती सर्वांना म्हणते, "मला तर माहितीही नव्हते की त्यांना एवढी मित्रमंडळी आहे कारण गेली पाच वर्षे ते आजारी असताना तुमच्यापैकी कुणालाही त्यांना भेटायला आलेले बघितले सुद्धा नाही, म्हणजे ते गेले हे एकाअर्थी बरेच झाले."

मोठी बहिण न्यूयॉर्क मधे राहून यांना थोडीफार आर्थिक मदत करत असते पण दोघी बहिणींमधे प्रचंड बेबनाव असतो. वडील गेल्यावर तर तो अधिकच कुरूप होऊन बाहेर पडतो. जेक हा तिच्या बाबांचा गणिताचा विद्यार्थी जो सध्या PhD करत आहे. तो येऊन सगळ्या वह्या "प्रूफ" ( सिद्धता व सिद्धांत) साठी तपासत जातो, त्यात त्याला एक मोठ्या सूत्राचा शोध लागतो. जो ग्वेनेथने लिहिला आहे. पण तिच्या बहिणीच्या मते तिच्यातही बाबांच्या कौशल्याचीच नाही तर वेडेपणाची लक्षणंही दिसण्याची सुरुवात झाली आहे व ती आता एकटी राहण्यासाठी सक्षम नाही. पण या प्रूफ च्या निमित्ताने ग्वेनेथला पुन्हा मोटिव्हेशन मिळते व तीही तिच्या बाबांच्याच मार्गाने जाण्याचे ठरवते.

मागे एकदा 'प्रतिभावंतांच्या तऱ्हा' धाग्यावर मीच "Intelligence and creativity (together) can cause psychosis" लिहिले होते. त्याची येथे तीव्रतेने आठवण झाली. वडील आणि मुलगी पुष्कळ सारखे आहेत, बुद्धिमान आहेत व समाजात "fit in" होणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना कुणी समजून घेऊ शकत नाही, त्यांचाही काही आग्रह नाही. ते जरा "आपल्याच नादात" गणितावरच्या प्रेमात बुडून गेले आहेत. पण मानसिक आजारात स्वत्व गमावत जाण्याने सगळीकडून गोंधळ निर्माण होतो आहे. त्या गोंधळातच आता तिला वाटा शोधायच्या आहेत. छान आहे सिनेमा.

https://www.maayboli.com/node/86233



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिठी

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

हृता