लेट नाईट
काल दुपारी प्राईमवर 'लेट नाईट' पाहिला. फारच धमाल आहे. आधुनिक पद्धतीने मांडलेला रॉ विनोद आहे. विनोदाबाबत 'हे विश्वची माझे घर' असणाऱ्यांनी जरूर पाहावा, संकुचित दृष्टिकोन असणाऱ्यांना मात्र झेपणार नाही. 'टू मच' वाटेल.
खूप एंगेजिंग आहे, छोट्या छोट्या गोष्टींतूनही विनोदनिर्मिती केली आहे. एकुण भट्टी जमली आहे. एमा थॉम्सन प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आहे पण तिला ब्रूटल किंवा क्रूर वाटावा असा विनोद फार मस्त जमतो. या आधीही क्रूएलात सावत्र वाटावी अशी सख्खी आई तिने जबरदस्त साकारली होती. येथे मला पुष्कळ ठिकाणी क्रुएलाची आणि 'डेव्हिल वेअर्स प्राडा'ची आठवण आली.
पूर्ण आयुष्य करिअरला वाहून घेतलेल्या मुलंबाळं नको असलेल्या छप्पन वर्षांच्या स्टँड अप कॉमेडियनची तिच्याच शो वरून हकालपट्टी होणार असते. त्या शो शिवाय तिला दुसरी फारशी ओळख नसते, मित्रमैत्रिणी नसतात. स्वभाव प्रचंड उद्धट व तुसडा असतो. सगळे पुरुष हाताखाली ठेवून 'उठता लाथ बसता बुक्की' या धाकात ठेवलेले असते आणि फक्त वुमन ऑफ कलर -डायव्हर्सिटी हायर म्हणून मिंडीला लेखक म्हणून घेते. त्या आधी तिच्याशिवाय एकही स्त्री तेथे नसते. मिंडीलाही विनोदी लेखनाचा काडीमात्र अनुभव नसतो. त्यामुळे तिलाही सिद्ध करायचे असते, नुसते अमेरिकन भारतीय स्त्री म्हणून नाही तर लेखिका म्हणूनही.
अत्यंत तुसडी बॉस आणि सगळेच पुरुष सहकारी यात तिला जुळवून घ्यावे लागते ते फारच धमाल आहे. चित्रपट अगदी धारदार फेमिनिझम दाखवतो, इतका धारदार की कापलेलेही कळू नये. *स्लट शेमिंग, एज शेमिंग, जेंडर स्टिरिओटाईप, रेशियल स्टिरिओटाईप सगळं सगळं आहे पण ते एकदम स्वाभाविकरित्या येणाऱ्या विनोदांतून दाखवले आहे.
त्यातही दोघींचा बॉन्डही डेव्हलप होताना छान दाखवलं आहे. एरवी स्त्रिया सोशल कंडिशनिंग मुळे पुरुषांना प्रोत्साहन देतील पण दुसऱ्या स्त्रीला खास करून खरोखरच काही तरी चुणूक दाखवणाऱ्या व वेगळे काही तरी करण्याची धडपड करणाऱ्या स्त्री 'हंबल डाऊन' करण्याची जबाबदारी मानून कमी लेखतील अशी परिस्थिती असते. त्यामुळे मला पर्सनली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला साथ देते आहे हे पाहायला आवडले. यात कसलाही आव आणलेला नाही हे विशेष.
त्यातील एक स्त्री जवळजवळ नीच वाटावी इतकी स्वार्थी व बेदरकार आहे, त्यामुळे तीही एक गंमत आहे. सर्व सहकलाकार अगदी चपखल. ऑफिसमधला विनोदही भन्नाट जमला आहे. सगळ्यांचेच काम सफाईदार झाले आहे, शिवाय टायमिंग जुळून आले आहे. नक्की बघा.
*स्लट शेमिंग - पुरुषांनी एखादे विवाहबाह्य प्रेमप्रकरण केले की त्याला समाजाने समजून घेणे, तेच एका स्त्रीने केले की तिला व्यभिचारी ठरवून आयुष्यातून उठवण्यासाठी हातभार लावणे.
----------------------
मिंडी केलिंग बाबत हेच मत आहे माझेही पण जे काही थोडेफार पाहिलेय त्यावरून ती एक अभिनेत्रीपेक्षा लेखिका म्हणून जास्त चांगली आहे असे वाटते. ह्या चित्रपटाचे लेखन तिचेच आहे. दिग्दर्शन कुणी तरी निशा गनात्रा हिने केले आहे. हा चित्रपट स्त्रीप्रधान म्हणता येईल पण ते लक्षात न येण्याइतकी सफाई कथेत ओवली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा