फस्सक्लास दाभाडे
'फस्सक्लास दाभाडे'
आज पाहिला. आवडला. धन्यवाद.

*स्पॉयलर्स असतील.
सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ व क्षिती जोग तिघे बहिण-भाऊ आहेत. राजन भिसे व निवेदिता जोशी आईबाबा आहेत. उषा नाडकर्णी आत्या आहे. राजसी भावे ( लाईक आणि सबस्क्राईब) ही अमेय वाघची नववधू आहे.
फस्सक्लास दाभाडे नाव का आहे कुणाला माहीत पण साधारण दाभाडे कुटुंबातील दुरावलेल्या नात्यांवर, दुराव्याचे कारणही कुठेतरी एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे कुटुंबातील सदस्य, एकमेकांकडून बऱ्याच अपेक्षा पर्यायाने अपेक्षाभंग यावर संपूर्ण पटकथा बेतलेली आहे. नंतर हळूहळू दुरावा कमी होत जाऊन नात्यांची खासकरून भाऊबहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा प्रवास आहे. सर्वांचीच कामं उत्तम झाली आहेत, पण मला क्षिती जोगचे काम सर्वात जास्त आवडलं. ती माहेरी बरीच ढवळाढवळ करणारी, कडाडून भांडणारी पण मुळात प्रेमळ बहिण आहे. तिघाही भावंडांचे सिरियस ईश्यूज आहेत. आई अंधश्रद्ध व वडील मितभाषी दाखवलेत. त्यामुळे आईची सर्वांचे 'अहं' जपताजपता तारेवरची कसरत होत असते.
सिद्धार्थचा घरगुती कारणांमुळे लग्न मोडून तुसडा देवदास झाला आहे. क्षितीच्या निपुत्रिक असण्यावरून तिला हेटाळणी सहन करावी लागत असते व तिची एक आयव्हीएफ सुद्धा अयशस्वी झालेली असते. अमेय वाघ लग्न होऊनही पहिल्या अनेक रात्री काही न घडता गेल्याने हरवलेला असतो. इरेक्टाइल डिस्फन्क्शन (असं स्पष्ट म्हटलेलं नाही) मुळे त्रस्त असताना घरी बाळ व्हावे म्हणून अंगारेधुपारे मनात नसताना करावे लागत आहेत. भाऊ आणि बहीण आईला नातू देऊ शकले नाहीत. त्यामुळे पूर्ण कुटुंबाच्या अगदी लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून अपेक्षा असतात. त्याचा परिणाम होऊन ह्याला पर्फॉर्मन्स ॲन्क्सायटी येते आहे. रोमान्स अतिगोड आणि निरागस आहे. आधी कसलाही लैंगिक अनुभव नसलेलं वयाने लहान नवपरिणित जोडपं आहे.
पण हळूहळू सर्वजण एकमेकांशी बोलत राहतात, काही गोंधळ, काही विनोद, बऱ्याच अंधश्रद्धा वगैरे बघायला मिळतात पण नाती किंवा तंटे अतिताणले नाहीत. त्यामुळे ते सगळं नैसर्गिक वाटतं, रिलेटेबलही वाटतं. चित्रपट एंगेजिंग आहे, संवाद चुरचुरीत आहेत. राजसी भावेच्या मैत्रिणीने धमाल आणली आहे. ती स्वतःचं लग्न ठरलेलं असतानाही मैत्रिणीच्या दिरावर खुशाल लाईन मारतेय. वरवर सामान्य दिसणारी पण एकदम सेक्शुअली इन्डिपिन्डेन्ट किंवा बोल्ड भूमिका आहे. तरीही चित्रपट मला चावट किंवा आगाऊ वाटला नाही. सगळं आपोआपच घडत आहे असं वाटत राहतं. ही मैत्रिणीला 'ट्रेनिंग' देत असते.
निमशहरी भाषा, घर वगैरे सगळे आवडले. कारण साधारण चित्रपटात पुण्यामुंबईचीच पार्श्वभूमी असते नाहीतर एकदम ग्रामीणच असते. असे अधलेमधले भट्टी जमलेले सिनेमे फारसे नसावेत, हा त्यापैकी आहे. मला त्यांचं घर, अंगण, आहेरमाहेर, मुलींना गाड्या भरून सामान देऊन सासरी पाठवणी करणे, रुसवेफुगवे, बोलीभाषा हे सगळंच परिचयाचं वाटलं. त्यामुळे की काय मजा आली बघताना.
** आपली संस्कृती लैंगिक दमन, अज्ञान वा चोरटेपणावर आधारलेली आहे पण बाळ मात्र लवकरात लवकर हवं असतं. असा काही तरी 'ऑक्सिमोरॉन' सिनारिओला यात सहजपणे वाचा दिली आहे असे वाटले. विनोदही सवंग पद्धतीने हाताळले आहेत असं मला तरी वाटलं नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा