आप जैसा कोई

 


आप जैसा कोई (नेटफ्लिक्सवर)



माधवन, फातिमा सना शेख, नमित दास, आयेशा रजा, मनिष चौधरी


हा नावावरून क्रिंज आणि ट्रेलरवरून फार काही खास किंवा नाविन्यपूर्ण नसलेला वाटला होता. सहज 'वर्क आऊट' करताना लावला आणि याने खिळवून ठेवले. संपूर्ण पाहूनच उठले. 'आप जैसा कोई' ऐवजी 'आज जाने की जिद ना करो' नाव ह्यातल्या रोमॅन्ससाठी चपखल ठरले असते.‌ इतका vintage आणि हुरहूर लावणारा आहे.


माधवन(श्रीरेणू त्रिपाठी) एक ४२ वर्षे वय असलेला संस्कृतचा शिक्षक आहे. लग्न जमत नाहीये, कुणालाच तो इंटरेस्टिंग वाटत नाही. फातिमा (मधू बोस) एक ३२ वर्षांची फ्रेंचची शिक्षिका आहे. नमित दास मित्राच्या भूमिकेत आहे, फार भारी काम करतो आणि अंडररेटेड वाटतो. आयेशा रजा एकदम गृहकृत्यदक्ष, आई एवढा जीव लावणारी मायाळू वहिनी व मनिष चौधरी इतरांना ताब्यात घेणारा एकदम पुरूषसत्ताक विचारांचा मोठा भाऊ आहे. मधू बोसचे कुटुंब एकदम प्रेमळ आधुनिक विचारांचे कलकत्त्यातील टिपिकल बंगाली कुटुंब आहे. माधवनचे कुटुंब आगरतळा व जमशेदपूरचे दाखवले आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, युपीही न दाखविल्याबद्दल टिमचे कौतुक.


श्री प्रचंड एकलकोंडा, लाजाळू व इंट्रोव्हर्ट आणि त्यामुळे व्हर्जिन आहे. ती अनअपोलोजेटिक, निर्भिड आणि आधी रिलेशनशिप मधे असलेली आहे. ती त्याच्या "आऊट ऑफ लीग" म्हणू तशी आहे. पण दोघेही प्रचंड प्रामाणिक आहेत. त्याला एकटेपणा आल्यामुळे गप्पा मारायला नमित एक "आप जैसा कोई" गुदगुल्या हॉटलाईन सुचवतो. याचे विनोद धमाल आहेत, उथळ नाही वाटले. श्रीचा ह्या ॲपवर गप्पा मारताना एकटेपणा बऱ्यापैकी दूर होतो. मग हे मधूचे स्थळ येते. त्याला विश्वास बसत नाही मग तो मित्र आणि एक विद्यार्थी घेऊन तिची सगळी चौकशी करून माहिती काढतो. कलकत्त्याचे घर ठाकूरांच्या कोठी टाईप दाखवले आहे. फातिमा मुळीच बंगाली वाटली नाही पण. सगळ्या बंगाली वातावरणात ठिगळ लावल्यासारखी वाटत होती. साड्या छान आहेत, ब्लाऊज फिल्मीच आहेत पण बिकिनी ब्रा नाही हेच खूप आहे.


तो कलकत्त्याला येऊन तिला भेटतो, ती आधीची सगळी नाती सांगून टाकते. तोही सगळं खरंखरं सांगून टाकतो. मग ते एकदम किशोर कुमार, मधुबाला वगैरेचे चित्रपट पहायला जातात. रोज भेटतात, खूप खिदळतात, भरपूर गप्पा मारतात. हळूहळू प्रेमात पडतात. हे फारच छान दाखवलं आहे. उथळ नाही, गंभीर नाही, सखोल नाही किंवा उच्छृंखलही नाही. जसं आहे तसं. कसलाच आव आणला नाही. संवाद पोएटिक आणि अर्थपूर्ण आहेत. सगळेच संवाद व्यवस्थित विचार करून लिहिलेले आहेत. भावनांचे चढ उतार असूनही कसलेच अग्रेशन नाही, सहजरित्या उलगडत जाणारे आहेत. तो वीणा वाजवतो, ती पियानो वाजवून साथ देते. तसेच नंतरचे तीव्र मतभेदही त्याच आलेखात पुढे गेलेत.


त्याला कळतं की तीही त्याच डेटिंग ॲप वर होती, त्याच्या सारखंच सबस्क्रिप्शन तिनेही घेतलेलं असतं. तसा तो लग्न मोडून टाकतो. तिच्या मते तो जसा होता तशीच तीही होती. ती अचानक लूज कॅरेक्टर कशी झाली..! इतका वेळ आधुनिक विचारांचे वाटणारे पात्र हे मात्र पचवू शकत नाही. तिकडे त्याचा भाऊ वहिनीला कंट्रोल करत असतो, स्वयंपाकघरात अडकवून टाकणे, चहात कमी पडलेल्या वेलची वरून चारचौघात पाणउतारा करत असतो. शेवटी कितीही शिकलो तरी घर जोडणाऱ्या स्त्रियांना उत्तम स्वयंपाक येणं आवश्यक, स्त्रियांनी पॉलिटिक्स वर बोलणं, पत्ते खेळणं, पुरुषांसोबत वाद घालणं, गप्पा मारणं वगैरे शोभत नाही. असे male chauvinist pigsचे ( पुरूषसत्ताक डुकरं?) वेगवेगळे प्रकार आहेत. काही तीव्र- काही सौम्य. पण माधवन, नमित, त्याचा भाऊ, एवढाच काय तर त्याचा विद्यार्थी सुद्धा कमीजास्त "पुसडु"(MCP) आहेत. मला खूप मजा येते आहे हे लिहिताना. तर श्रीला तिच्यावाचून जीव नकोसा होतो तेव्हा तो तिला जाऊन "मी तुला माफ केलं पण पुन्हा थोडी लिमिट मधे राहा" असे म्हणून सगळं अजून बिघडवून टाकतो.


तिकडे वहिनीचा स्वतः चा घरगुती व्यवसाय आहे, पण तो वाढवता येत नाहीये. मुख्य म्हणजे २८ वर्षांच्या या संसारात ती सुखी नाही, तिला प्रेम आणि आदर मिळालेला नाही. वहिनी व मधूचा मामा प्रेमात पडतात व हे सगळं घरात कळतं. ते समोर आल्यावर श्री ला आपण कुठे चुकत होतो हे कळतं. वहिनी भावाला सोडून वेगळी होते. तो वहिनीला सपोर्ट करायचे ठरवतो. प्रत्येकाला सुखी व्हायचा अधिकार आहे, जो समानता नसेल तर कधीही कळणार नाही आणि मिळणार नाही. इतकी साधी गोष्ट आहे, मेलोड्रामा नाही. सतत एक प्रसन्न व्हाईब आहे. ती प्रसन्नता चित्रपटात सगळ्या प्रसंगात टिकून राहते. शेवटी तो म्हणतो तसे - मीही ह्याच वातावरणात वाढलेला पुरुष आहे आणि माझ्या चुका होतीलच पण मी दुरुस्त करत राहीन, शिकत राहीन. बरोबरीचे प्रेम करत राहीन. नक्की बघा. मला आवडल्यामुळे हे एवढं लिहिलं गेलं.

https://www.maayboli.com/node/86233?page=53

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिठी

हृता

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग