ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या
ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या
परागताज्ञानमना: प्रभूय लभेत चिद्रुपसुवां मनुष्यः
यदियमार्कण्यचरित्रमंत्र वंदेsहभिशं गुरुशंकरं तं ।।
ज्याचे केवळ चरित्र श्रवण केल्यानेच मनुष्याच्या मनातील अज्ञान नाहीसे होऊन त्याला चित्स्वरूपामृताचा लाभ होतो त्या श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्यांना नमस्कार असो.कुठे तरी वाचले आहे की आपल्यातला भक्ती रस आटून अंतःकरण वाळवंटाप्रमाणे कोरडी ठणठणीत होऊ नयेत आणि आपल्या स्वाभिमानाचा व स्वधर्माचा ऱ्हास होऊ नये म्हणून श्रेष्ठ व्यक्तींची चरित्रे पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत.
आद्य शंकराचार्य यांचा जन्म रम्य अशा केरळ प्रांतात पवित्र अशा पूर्णा नदीच्या उत्तर तीरी कलाडी नावाच्या छोट्या गावात इ.स. ७८८ ला झाला. त्यांचे पिता शिवगुरु नावाचे एक श्रेष्ठ पंडित होते. त्यांच्या मनातही वैराग्याची दृढ इच्छा होती. तथापि पित्याची व गुरुची आज्ञा त्यांनी ईश्वरेच्छा मानली. त्याच प्रांतात रहाणाऱ्या मधपंडित यांच्या सुशील व साध्वी कन्येशी श्री अंबीका हिच्याशी विवाह केला.
कित्येक वर्षे सुखात गेल्यानंतरही त्यांना संतानप्राप्ती होऊ शकली नाही. असे अर्धे आयुष्य सरल्यावर उभयतां पती पत्नी अतिशय कष्टी झाले. शिवगुरु यांचे आराध्य श्री शंकर असल्याने त्या उभयतांनी श्री शंकराचे तप करण्याचे ठरवले. यासाठी वृष क्षेत्री अत्यंत खडतर व्रत आरंभिले. कित्येक दिवस उपोषण, ध्यान साधना यात घालवले. हे त्यांचे तप पाहून श्रीशंकर अतिशय प्रसन्न झाले. ब्राह्मण रुपात शिवगुरु यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी विचारले की तुमची मनोकामना मी जाणतोच तर तुम्हाला जड बुद्धी व दीर्घायुष्य असलेले अनेक पुत्र हवेत की सर्वज्ञ परंतु अल्पायु असा एकच पुत्र हवा. यावर अल्पायु असेल तर हरकत नाही पण सर्वज्ञ असा पुत्र हवा असे शिवगुरु यांनी उत्तर दिले. श्री शंकर तथास्तु म्हणाले. नंतर हा द्रष्टांत त्यांनी श्रीअंबीकेला सांगितला. तिला अतिशय आनंद वाटला. नंतर त्यांनी तपःश्चर्येच्या सांगतेसाठी अनेकांना गोदान व सुवर्ण दान करून संतुष्ट केले. श्री शंकराच्या प्रसादाने श्रीअंबीकेस शिवतेजाने युक्त असा गर्भ राहून योग्य वेळी श्री शंकराचार्यांनी जन्म घेतला.
आचार्य बालदशेत अत्यंत तेजस्वी दिसत. त्यांची अलोट बुद्धिमत्ता त्याही वयात दिसून यायची. असे म्हणतात की वयाच्या पहिल्या वर्षी त्यांना अक्षरज्ञान व स्थानिक भाषा मल्याळम येऊ लागली. दुसऱ्या वर्षी ते वाचू लागले. तिसऱ्या वर्षी त्यांना काव्ये, कोष पुराणे यांचा स्वमतीने अर्थ लावण्याची क्षमता आली. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी शिवगुरुंचे निधन झाले व सर्व भार त्यांच्या माऊलीवर पडला. अधिक अध्ययन करणे आवश्यक असल्यामुळे माऊलींनी यथोचित उपनयन करून त्यांना गुरुगृही पाठवले.आचार्यांची बुद्धीमत्ता अद्वितीय असल्याने ते सर्व काही वेगाने शिकत. त्यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली.
******कनकधारा स्तोत्राची कथा*****
आचार्य वयाच्या सातव्या वर्षी नित्याप्रमाणे भीक्षेसाठी निघाले असताना एका अत्यंत निर्धन ब्राह्मण स्त्रीच्या घरी गेले. तेव्हा त्या स्त्रीने डोळ्यात अश्रू आणून आपली कहाणी सांगितली. आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही. पण आपल्यासारख्या यतीस विन्मुख पाठवणे अयोग्य आहे. तरीही अंगणात आवळ्याचे झाड आहे. त्याचा हा आवळा आपण ग्रहण करावा अशी विनंती केली. तिचे ते दैन्य व भक्तीभाव पाहून त्यांना तिची दया आली. त्यांनी तिथल्या तिथे लक्ष्मीचे आवाहन केले व ती अवतीर्ण झाली असता या कुटुंबाचे दारिद्र्य दूर करण्यासाठी विनंती केली. यावर देवी म्हणाली की यांनी पूर्वजन्मी कुठलाही दानधर्म केला नाही तेव्हा मी या जन्मात यांना तरी कसे द्यावे. तेव्हा देवीला प्रसन्न करण्यासाठी आचार्यांनी कनकधारा स्तोत्र रचले व देवीला विनंती केली की हिने भक्तीभावाने मला एक आवळा दिलेला आहे. त्या पुण्याईचे व तुझ्या दर्शनाचे फळ हिला मिळायलाच हवे. ते भाषण ऐकून लक्ष्मीने प्रसन्नतेने आवळ्याचे झाड सोन्याच्या आवळ्यांनी भरून टाकले व ती अंतर्धान पावली.
******नदीचा प्रवाह फिरवला*****
आचार्यांच्या मातुःश्री घरापासून दूर असणाऱ्या पूर्णा नदीवर स्नानासाठी नित्य जायच्या. वृद्धापकाळाने त्या एकेदिवशी मार्गात मूर्च्छा येऊन पडल्या. तेव्हा आचार्यांना अतिशय दुःख झाले व त्यांनी नदीवर जाऊन प्रार्थना केली की हे जगदंबा, हे जगत्जननी , तू सर्वांची माता आहेस. असे असताना माझ्या मातेला तुझ्यापायी त्रास व्हावा हे योग्य नव्हे. तर तू कृपा करून माझ्या घराशेजारुन वहात जावे. हे ऐकताच नदीच्या प्रवाहाचे स्थान बदलून तो घराशेजारुन वाहू लागला. या चमत्कारामुळे अनेक लोकांना आचार्य ईश्वरी अंश आहेत यावर विश्वास बसला.
*****दिव्यऋषींशी भेट*****
असाही उल्लेख आहे की साक्षात श्री महादेव या अवनीतलावर आले आहेत हे जाणून अगस्त्य, उपमन्यु आदी दिव्य ऋषी हे आचार्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी आले. तेव्हा ऋषींनी मातुःश्रीना तुमचा पुत्र बत्तीस वर्षे जगेल व तो महान कार्य करेल असे सांगितले. आपला पुत्र अल्पायुषी असणार आहे हे जाणून त्या दुःखी झाल्या असता ऋषींनी त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले.
*****संन्यास घेण्यासाठी मातेची अनुज्ञा****
आचार्यांच्या मनात केवळ आठव्या वर्षी संन्यास घेण्यासाठी दृढनिश्चय झाला होता. परंतु त्यांच्या मातुःश्री त्यांना यापासून परावृत्त करत होत्या. त्यामुळे त्यांनी ही घटना घडवून आणली असे म्हणतात. आचार्य नित्याप्रमाणे पूर्णा नदीत स्नानासाठी गेले असताना एका मगरीने येऊन त्यांचा पाय धरला. त्यांचा आरडाओरडा ऐकून मातुःश्री तिथे धावत आल्या व ते दृष्य बघून गर्भगळीत झाल्या. ही संधी हेरून आचार्य म्हणाले "आई, तू जर संन्यास घेण्यासाठी मला आज्ञा दिलीस तर ही मगर माझा पाय सोडेल." तत्क्षणी या नक्ररुपी संसारापासून मुक्त होण्याची आचार्यांना आज्ञा मिळाली.
तथापी ते जेव्हा घर सोडून निघाले, तेव्हा मातुःश्रीनी अंतसमयी और्ध्वदेहीक कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली व आचार्यांनी तत्काळ मान्य केली.
*****गुरुंची आज्ञा*****
आचार्यांनी गुरु गोविंदनाथ यांच्या घरी काही दिवस घालविल्यानंतर गुरुंनी त्यांना काशीस जाऊन शारीर भाष्य व ब्रह्मसूत्रावर भाष्य तयार करण्याची आज्ञा दिली.
काशीस असताना श्रीशंकर चांडाळाच्या रुपात आले व त्यांनी आचार्यांची परीक्षा घेतली व त्यांचे मतपरिवर्तन केले. त्याक्षणी आचार्यांनी हा अंत्यज आहे, हा ब्राह्मण आहे या देह-भेदबुद्धीचा त्याग केला. ते म्हणाले की जो कोणी हे ब्रह्मांड व आत्मा हे एकरूप आहे असे मानतो. तो कुणीही असो तो वंदनीय आहे. यावर श्री शंभूनाथ म्हणाले की भेदाभेदवादी भास्कर, शाक्तमती अभिनवगुप्त, भेदवादी नीलकंठ, शैववादी गुरु प्रभाकर, गुरुमतानुयायी मंडण, इत्यादी जे भिन्न भिन्न मताला अनुसरणारे पंडित आहेत, त्यांना जिंकून सर्व पृथ्वीवर अद्वैत मत स्थापन करावे आणि वेदस्थापित धर्माच्या संरक्षणार्थ ठिकठिकाणी शिष्य स्थापन करावेत. ह्याप्रमाणे आपले अवतारकार्य झाल्यानंतर माझ्याकडे यावे.
ही आज्ञा शिरोधार्य मानून आचार्यांनी बद्रीनाथ येथे ब्रह्मसूत्रावरील भाष्य संपवले. नंतर ब्रह्मविद्या प्रतिपादक ईश, केन, कठ, प्रश्न, मांडूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, ब्रुहदारण्य या दशोपनिषदांवर भाष्ये केली. यानंतर त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य केले. याच दरम्यान त्यांनी पशुपतमताभिण्यांचे खंडण केले.
*****मंडणमिश्रांशी भेट/वाद*****
मंडणमिश्रांशी भेट घेण्यासाठी आचार्य माहिष्मती नगरीस आले. मिश्रा़ंचे घर शोधण्यासाठी निघालेले असताना तेथील पाणवठ्यावर दोन दासींना विचारले असताना. त्या दासी म्हणाल्या ' वेदवाक्य हे स्वतः प्रमाण आहे, किंवा परतः प्रमाण आहे? सुखदुःखाचे फल कर्म देते का सर्वशक्तीमान परमेश्वर देतो? जग हे सत्य आहे का मिथ्या? हा वाद ज्यांच्या दारामध्ये मैना करत आहे तेच मंडणपंडितांचे घर .
दासींची ही योग्यता तर पंडितांची स्वतःची योग्यता काय असेल या विचारात उत्साहाने आचार्य मिश्रांच्या घरी गेले.
ज्यावेळी ते तिथे पोहोचले त्यावेळी तिथे श्राद्ध सुरू होते. अचानक आणि अनिमंत्रीत आलेल्या आचार्यांना पाहून मिश्रांना त्यांचा राग आला.
त्यामुळे त्यांचा वाद सुरु झाला.
मंडण : " धर्मपत्नीचे पालग्रहण करण्याचे सामर्थ्य नाही, यास्तव शिष्यांचा आणि पुस्तकाचा भारा जमवून ब्रह्मनिष्ठेची प्रौढी मिळवतोस काय ?"
आचार्य: "गुरु कुलाला परांङ्मुख होऊन व गुरु सेवेविषयी आळस करून स्त्रीची शुश्रुषा करत बसला आहेस , ह्यावरून तुझी कर्मनिष्ठा कशी आहे कळून येते."
मंडण: " तो ब्रह्म कुणीकडे व तुझी दुर्बुद्धी कुणीकडे, हा संन्यास कुणीकडे ? कशास काही मेळ नाही. तर तू फक्त यथेच्छ गोडधोड खावयास मिळावे म्हणून योग्याचे सोंग आणले आहेस. "
आचार्य : "तो स्वर्ग कुणीकडे, तुझा दुराचार कुणीकडे! तर स्त्रीच्या उपभोगाकरिता तूही गृहस्थाश्रमाचे फक्त सोंग आणले आहेस"
मग मंडण म्हणाले मी ईश्वराला न मानणारा असून पूर्व मिमांसक आहे. मला निरीश्वरवादी म्हणतात आपणास माझे ज्ञान अवगत नाही म्हणून आपण वादाची याचना करत आहात. त्यांनी या वादासाठी सभेचे आयोजन केले व अध्यक्षस्थानी आपली पत्नी सरस्वती जी प्रत्यक्ष देवी सरस्वतीचा अवतार होती तिला नेमले. लोक मोठ्या संख्येने व उत्कंठेने तिथे जमा झाले. यात आचार्य म्हणाले की ब्रह्म हेच सत्य आहे हे जर त्यांना सिद्ध करता आले नाही तर ते संन्यासाचा परित्याग करून गृहस्थाश्रम स्विकारतील. तर मंडणपंडितांनी प्रतिज्ञा घेतली की वेदाचा पूर्व भाग कर्मकांड हाच प्रमाण असून तोच सर्वांना कारण आहे हे ते सिद्ध न करु शकल्यास ते संन्यास घेतील. आचार्यांनी अनेक श्रुतिप्रमाणांनी ब्रह्म सिद्ध करुन अद्वैतमत स्थापन केले व ते सरस्वतीलाही मान्य झाले.
*****सरस्वतीशी वाद*****
आपल्या पतीचा पराभव झाला व तो प्रतिज्ञेप्रमाणे आता संन्यास घेणार हे जाणून सरस्वती निजधामी गमन करण्यासाठी निघाली. परंतु ती जाणे आचार्यांना इष्ट वाटले नाही म्हणून मंत्रसामर्थ्याने तिला बंधन केले. ह्याचे कारण आपला तिच्याशी वाद व्हावा व ती प्रत्यक्ष सरस्वतीचा अवतार असल्याने तिला जे मत मान्य ते सर्वांना मान्य होऊन अद्वैतमताची सिद्धी उत्तम प्रकारे यशस्वी होईल. सरस्वतीनेही त्यांची थांबण्याची विनंती मान्य केली.
सरस्वतीने पत्नीही पुरुषाचे अर्धांग असल्याने तुम्ही मला जिंकल्याशिवाय विजयी होऊ शकत नाही , असे म्हणून वाद पुन्हा सुरु केला. तिही विदुषी असल्याने हा वाद खूप रंगला. तेव्हा सरस्वतीने आचार्यांना कामशास्त्राविषयी प्रश्न विचारले. आचार्य यती असल्याने ही उत्तरे देऊ शकत नव्हते. तेव्हा त्यांनी सरस्वतीकडून एक महिन्याचा अवधी मागीतला. या अवधीत त्यांनी नुकत्याच शिकारीत मेलेल्या एका राजाच्या शरीरात परकाया प्रवेश करून ही विद्या हस्तगत केली. परत येऊन त्यांनी हा वाद निर्विवाद जिंकून घेतला.
*****मठांच्या स्थापना*****
यानंतर आचार्यांनी चारही मठाची स्थापना करण्याची सुरवात श्रुंगेरी मठापासून केली. आद्य श्रीमच्छंकराचार्य , यांना श्रीक्ष्रेत्र श्रुंगेरी हे स्थान फार पसंत पडले, यासाठी त्यांनी विभांडक ऋषी पासून जागा मागून घेऊन विक्रम संवंत २२ मध्ये तेथे गंगातीरी आपला आद्य मठ स्थापन केला. या काळात त्यांचे अनेक शिष्य झाले व अनेक लहान उपास्य देवतांचे /मतांचे खंडण होऊन अद्वैतमताचा प्रसार झाला.
*****मातुःश्रींचा अंत्यविधी*****
श्रुंगेरी येथे एकदा ध्यानस्थ असताना आचार्यांच्या ध्यानात आले की त्यांची माता मरणासन्न झाली आहे. ते तत्काळ आकाशमार्गे त्यांच्या जवळ आले. मातुःश्रींना त्यांना ब्रह्मोपदेश केला. ते न समजल्याने मातेनी विनंती केली की सगुण परब्रह्माचा उपदेश करून ते माझ्या हृदयात ठसेल असे कर. याप्रमाणे महाविष्णूचे ध्यान करत त्या वैकुंठाला गेल्या. त्यांनी संन्यास घेतला असल्याने त्यांचे बांधवजन त्यांना और्ध्वदेहीक कर्म करण्याच्या विरोधात होते. परंतु त्यांच्या कडे आचार्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे खांदादेण्यासाठी सुद्धा कोणी आले नाही. हे पाहून आचार्यांनी स्वतः काष्ठे जमा केली आणि मातेच्या दक्षिण बाहूचे मंथन करून त्यापासून अग्नी उत्पन्न केला व आपल्या घराच्या परसातच मातेचे दहन केले.
*****विविध उपास्यमतांचे खंडण*****
यानंतर आचार्यांनी शाक्तांचे खंडण ( देवीचे उपासक) ,लक्ष्मी भक्तांचे खंडण, शारदोपासकांचे (वामाचारसंपन्न) खंडण, जंगमांचे खंडण ( शिवाची चिन्हे धारण करणारे), शैवांचे खंडण, अनंतशयनस्थ वैष्णवांचे खंडण केले. तसेच अन्य जी काही विष्णु व शिव याचा भेद करणारी मते होती त्या सर्वांचे आचार्यांनी श्रुतिवाक्य प्रमाणाने व युक्तीने खंडण करून, त्यांना अद्वैतमताची दीक्षा देऊन हिंदूधर्मिय लोकांत एकात्मता आणली. याच काळात त्यांनी कांची नगरीत शिवकांची व विष्णुकांचीची स्थापना केली.
*****चार्वाक मतांचे खंडण*****
नंतर नास्तिकमताग्रणी जो चार्वाक तो सभेत आचार्यांना म्हणाला. देह व आत्मा हा भेद चुकीचा आहे . देहाचा लय होणे हाच मोक्ष होय. यापेक्षा निराळा मोक्ष आहे असे जे म्हणतात ते मूर्ख आहेत. जो मरतो त्याला पुन्हा जन्म नाही. दुःख प्राप्त होणे हाच नरक आहे. कारण जो सुखाचा भोक्ता आहे, त्याला तो सुखोपभोगच स्वर्ग आहे. त्यामुळे स्वर्ग आहे , नरक आहे यात तथ्य नाही. म्हणून वेदातील मत व आपले मतही सयुक्तिक नाही. म्हणून मान्य करण्यास योग्य नाही. चार्वाक हा आपली मते मोठ्या आकर्षक पद्धतीने व सोदाहरण मांडायचा. त्यामुळे तो व त्याचे मत जनात प्रसिद्ध असायचे. लोकांची मतप्रणालीही त्याने बदलून चंगळवाद व नास्तिक मताचा प्रसार त्याने केला होता. त्यामुळे त्याच्या मताचे खंडण आवश्यक होते.
यावर आचार्यांनी भाषण केले. हे तुझे मत श्रुतिबाह्य आहे. देहातून आत्मा भिन्न आहे व तै मुक्त आहे. त्या आत्म्याच्या ज्ञानाने मुक्ती मिळते असे श्रुतीने सांगितले आहे. " ज्ञानाग्निदग्ध कर्माणी यान्ति ब्रह्म सनातन ", हे जर प्रमाण मानले तर तुझे कुत्सित म्हणने तरी का प्रमाण मानावे. आता स्थूल देह दग्ध झाला तरी तो लिंगदेहाने परलोकी गमन करतो, ह्या विषयी ज्योतिष्टोमादिक वाक्ये प्रमाण आहेत. हा जीव एका देहातून दुसऱ्या देहात जातो तो 'जलौके' प्रमाणे जातो. जलौके हा एक किडा आहे. तो प्रथम आपले पुढचे अंग जमीनीवर टेकतो आणि मागचे सोडून देतो. त्याप्रमाणे मृताचे प्रेतत्व नाहीसे होण्याकरिता व पुण्यलोकप्राप्तीकरीता पुत्राने श्राद्धादिक अवश्य केली पाहिजेत, व मुक्ती होण्याकरिता गयेमध्ये पिंडदानही करावे. अशी स्मृती व पुराणे यातही प्रमाणे आहेत. ही प्रमाणे तुला मान्य नसतील तर तू मूढ आहेस ह्याकरता निघून जा. कारण तू वादालाच अपात्र आहेस. हे आचार्यांचे भाषण ऐकून आपला वेष व भाषण यांचा त्याग करून तो आचार्यांना शरण आला व त्यांचे शिष्यत्व पत्करले. नंतर त्यांनी जैन बौद्ध व इतर मताचे सप्रमाण खंडण करून वेदमार्ग स्थापित केला.
आचार्य जेव्हा पद्मपाद शिष्याचा हात धरून विद्याभद्रासनावर चढत होते, तेव्हा मेघनादा समान अशी आकाशवाणी झाली. " तू सर्वज्ञ आहेस या विषयी शंका नाही. नाहीतर ब्रह्मदेवाचा अवतार जो मंडणपंडित त्याला तू कसे जिंकले असतेस? परंतू तुझ्या अंगी परिशुद्धता आहे की नाही हा विचार करण्यासारखा आहे. कारण यतिधर्मामध्ये असताना अनेक स्त्रियांचा भोग घेतला आहेस, तेव्हा तू शुद्ध नाहीस. या पदावर आरोहण करण्यासाठी जशी सर्वज्ञता लागते, तशी शुद्धताही लागते" .
तेव्हा आचार्य म्हणाले, हे माते! जन्मापासून या शरीराने कुठलेही पातक केले नाही. आता देहांतराने जे काही केले असेल, त्या कर्मापासून हा देह लिप्त होत नाही. कारण एका देहाने केलेले कर्म दुसऱ्या देहाला लागू होत नाही. असे शास्त्रसिद्ध आहे. शिवाय ते स्मृतींना व पंडितांना ही मान्य आहे. अशा प्रकारे आकाशवाणी व सर्व लोकांचे समाधान करून ते त्या विद्यापीठावर आरोहीत झाले ! त्यावेळी देवांनी दुंदुभी वाजविल्या व आचार्यांवर पुष्पवृष्टी केली.
****आचार्यांचा कैलासवास*****
याप्रमाणे काश्मीर येथील सर्वज्ञ पीठावर आरोहण करून ते पूर्वसंकेतानुसार कैलासावर गेले. तेथे काही काळ राहून त्यांनी शंकराचे आवाहन केले. निजधामी परत नेण्यासाठी प्रार्थना केली. यासमयी सर्व देवांसह ते नंदिकेश्वरावर बसून कैलासी गेले. ह्या प्रमाणे संपूर्ण भारतखंडात अद्वैतमार्ग स्थापन करून अवघ्या बत्तीसाव्या वर्षी श्रीमत्परमहंस आदीगुरु श्री शंकराचार्य कैलासास गेले.
आज श्री शंकराचार्यांची जयंती साजरी होते. त्या निमित्ताने मी माझ्याकडे असलेले पुस्तक "कृ. ना. आठवले लिखित श्री शंकराचार्य यांचे सर्वांगसुंदर विस्तृत चरित्र व शिकवण" हे तिसऱ्यांदा वाचले. यावेळी ते जरा अधिक समजले. हा लेख त्या पुस्तकाचा परिचय आहे. हे पुस्तक अक्षरधारावर उपलब्ध आहे. शिवाय आंतरजालावर असलेली त्यांची माहिती, चित्र व युट्यूब वरील माहिती पाहिली. या विषयाचा आवाका एवढा मोठा आहे की बराच भाग गाळावा लागला. काय नेमके घ्यावे हे निवडणे फारच आव्हानात्मक होते. काही संभाषणे काही भाग गाळून जशीच्या तशीच लिहावी लागली कारण आवश्यक वाटली.
आपल्याकडे बऱ्याच जणांना त्यांनी नेमके काय केले हे माहिती नाही. त्यांच्या बद्दल सामान्य माणसाला मठ स्थापना व बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे हिंदु धर्मावर आलेली ग्लानी दूर केली एवढेच माहिती आहे. हे पुस्तक वाचण्या अगोदर त्यांच्या कार्याविषयी मी ही नेमके सांगू शकले नसते. त्यांचे जाज्वल्य आणि असामान्य कार्य एका लेखात बसवणे व एका जन्मात समजणे अशक्य आहे. तरीही मी एक छोटा प्रयत्न करण्याचे धारिष्ट्य केले. गेले एक आठवडा मी त्यांच्या विषयावर इतके वाचले. लेखाचा शेवटच्या परिच्छेदात मलाच करमेनासे झाले. हा पुन्हा पुन्हा वाचल्या जावा व आपण त्यांना जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा आहे.
जगद्गुरू आदिशंकराचार्यांच्या जयंती निमित्ताने त्यांना स्मरण करू.
********************************************************
फोटो आंतरजालाहून साभार.
त्यांनी लिहिलेल्या शेकडो आवडत्या स्तोत्रांपैकी काही स्तोत्रे.
शिवोहम् शिवोहम्
निर्वाणषट्कम्
आत्मषट्कम्
गणेश स्तोत्र
**********************************************************
©अस्मिता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा