पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती

 पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती




दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

****************************************************************************
गीत रामायण

ग. दि. माडगूळकर
गायक सुधीर फडके

ह्या दोन गाण्यांमध्ये सुधीर फडके यांचा आवाज फक्त गात नाही तर तो स्पष्ट लाघवी आर्जवं ह्रदयात नेऊन पोहोंचवतो. मी त्यांना व्यक्तिशः ओळखायचे नाही, पण ही गाणी ऐकल्यावर यांतील माधुर्य, आर्तता आणि अनेक हालअपेष्टांनंतरही टिकून असलेली परमेश्वराप्रती अवर्णनीय निष्ठा जाणवून तेच स्वतः साधूतुल्य असल्याचा विश्वास वाटायचा!!
गीत रामायणात 'राम' आहेच. तो गदिमा व बाबुजींच्या अतुलनीय प्रतिभा आणि निष्ठा यांच्या अवीट संगमाने आलाय. ही निर्मिती हेच श्रोत्यांसाठी अमर्त्य वरदान आहे. गीत रामायण रामासारखेच शांतवन करते. आमच्याकडे ही गाणी मन लावून ऐकणाऱ्या व्यक्ती म्हणजे वडील /पपा व आजोबा/ बाबा. त्यामुळे की काय ही गाणी मनातही लागोपाठच येतात. एक ऐकले की दुसरे ही आवर्जून ऐकल्या जाते. बाबा कळतं नकळत ऐकू जाईल न जाईल इतक्या आवाजात गुणगुणंत. पपा त्यांच्या व्यवस्थित ऐकू जाईल अशा चार पदरी आवाजात गुणगुणंत किंवा घरघरंत जास्त योग्य होईल Wink ! नियमितपणे ही गाणी कानावर पडंत गेली.
मी अगदी वरवर हुशार, ठीकठाक, तुमच्यात रसं असलेले, संसारी ते जसजसे अंतरंगात डोकवायला जालं तसे विचित्र, गूढ , तूटक, वैरक्त्य आलेले यात हिंदोळे घेणाऱ्या स्वभावाचे लोक जवळून पाहिले आहेत !! मीही याच हिंदोळ्यावर बसते कधीकधी, वंशपरंपरेने मिळालायं तो कुठला चूकायला .बरं फक्त वडिलांकडून नाही आईकडून सुद्धा. या डबल जेनेटिक माऱ्यामुळे मोठा होऊन माझ्या मुलानं किंवा मुलीनं मुक्तीचा मार्ग निवडला तर मला आश्चर्यापेक्षा obviously वगैरे वाटून आनंदच होईल.
वैराग्याचे झटके नियमितपणे येणाऱ्या लोकांसोबत शरीराने आणि मनाने लहानाची मोठी झाले. छोट्या शहरात राहून हे विश्वची माझे घर होत गेले. अशा रुजवलेल्या संस्कारात मनाचा वृक्ष मोठ्ठा होत गेला. जुनी उत्तरं मिळतं गेली, नवे प्रश्न पडत गेले. माझा दातं दुखतो आहे म्हणून स्वतः जेवण न जाणारे पपा कधीही मला तुझे रूप चित्ती राहो मधल्या गोरा कुंभारासारखे विसरून जातील वाटायचं . कधी कधी काही असं सांगायचे आई काय किंवा पपा काय की ते "आपल्याच नादात" बोलले असतील असे वाटून घ्यावे म्हणावं तर खूप मोठा अध्यात्मिक दृष्टीकोन असायचा. त्यामुळे एकेका माणसाच्या स्वभावाची खूप मोठी रेंज असू शकते हे कळलं. हे त्या त्या क्षणी त्या त्या परिस्थितीत तितकेच खरे असते हे ही हळूहळू लक्षात यायला लागले.
या सगळ्यामुळे की काय मी फार चटकन माणसं ओळखायला शिकले. पण असे नुसते ओळखणे म्हणजे समजून घेणे नाही हे कळायला दोन तपं लागली ! आईला मोठी तोऱ्यात म्हणायचे , मलानं लगेच कळतं बघं कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय. नंतरनंतर नियमित ध्यानामुळे तर माणसांची मन आरशासारखी दिसायला लागायची. कुणी आपल्या खऱ्याखुऱ्या भावना लपवत असेल तर तेही कळायचं. काही काळातं ही गम्मत संपली. हळूहळू ह्यात काही अर्थ नाही व मला माणूस म्हणून अध्यात्मिक प्रगती करण्याच्या मार्गात हे
वृथाच नाही तर अडसरकारक आहे हे जाणवले. दुसऱ्यांच्या मनाचे मनात विश्लेषण करण्यासाठी ऊर्जा घालवायची नाही असे ठरविले. ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केले कारण हेच माझ्या सरोवरासम शांत मनात वारंवार खडे टाकायचे.
मगं स्वतःच स्वतःचे मनं त्रयस्थासारखे पृथक्करण करून पहायला शिकले मी.
या सगळ्यासाठी अशा गाण्यांनी गोष्टींनी मोठेच सहाय्य केले. कसे ते नाही माहिती पण केले .जर माझ्या रामाला पूर्वसंचित चुकले नाही तर मी कोण कःपदार्थ ! रामावर पराकोटीचे प्रेम होते. पुत्रवत् म्हणाले तरी चालेल. पुत्र होईपर्यंत माझी सत्यनिष्ठा मला उघडउघड म्हणू द्यायची नाही हे. मन म्हणायचे ज्याचा अनुभूती नाही त्याशी एवढी मोठी तुलना. एवढे धारिष्ट्य, राम राम. पण आता हे वक्तव्य असत्याचे किंवा अतिशयोक्तीचे वाटतं नाही. कारण आता आयुष्यात पुत्रही आहे आणि पुत्रवत् रामही! हळूहळू रामाकडून कृष्णाकडे कसा प्रवास झाला की रामाने नेऊन सोडले कळले नाही. राम पहिले प्रेम आणि कृष्ण शेवटचे. कुणावर जास्त हा विचारही त्रासदायक वाटतो. तरीही रामाच्या नावाने मन जसे शांत होते तसे सहज शांत मन कुठल्याही नामाने होतं नाही. तसे नामंच नाही या भूतलावर, अगदी माझ्या कृष्णाचे सुद्धा नाही. क्षमा मधुसूदना !
बाबुजींना राम मला जेवढा आवडतो तेवढाच आवडत असावा. कारण त्यांनी गीत रामायणात गायलेला हरेक शब्द स्वयंभू रामरूप आहे. आयुष्यात आलेल्या संघर्षाशी, दारिद्र्याशी अविरत लढूनही त्यांच्या आवाजातले आर्त या दोन्ही गाण्यांमध्ये काकणभर सुद्धा कमी नाही.
ही गाणी माझ्यासारख्या 'राममानसी' मनांना वाचा आणि वैचारिक खाद्य देतात. ही गाणी कधीही ऐकली मन मनातल्या गतकाळातील 'रामराज्यात' जाते व नव्या उमेदीने व निकोप मनाने नित्यनूतन संघर्षाला सामोरं जायला सक्षम होते. रखरखीत जमीनीवर पाणी शिंपडते जणू !
अध्यात्मिक मनाला संसार कधीकधी तुरुंगासारखो जाचतो तेव्हा ही गाणी परोल वर सुटका करतात.
ह्या गाण्यात राम भरताला काय म्हणाला किंवा भरत रामाला काय म्हणाला हे महत्त्वाचे नाहीच खरंतर ! रामासारखा अपरिमित अन्याय होऊनही इतरांशी न्यायाच्या मर्यादेत रहाणे आणि भरतासारखी परिस्थिती आली असता सारासार विवेकाने व तत्वनिष्ठतेने हतबलता दूर करणे हेच ह्या गाण्याचे सार आहे. माझ्या मते ही दोन गाणी अध्यात्मिक मनाचा चिंतनात्मक प्रवास आहेत. जेव्हा आपण जाणून घेऊ की आपण पराधीन आहोत तेव्हाच त्याचे रूप चित्ती राहील! मी रामाविषयी अखंड लिहू शकते पण पुरे करते. कारण एक क्षणही आपण निर्विचार आणि दोषरहीत झालो तेव्हा आपल्यातला रामच उरतो.
तुम्ही ही ऐका राममनातल्या रामनामाला !!
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम

।।रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती।।
।।जय श्रीराम।।


©अस्मिता.

मायबोलीवर पूर्वप्रकाशित.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता