भजेहम् भजेहम्

 श्रीहरी स्तोत्रम् ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे.

************







तूच नारायणा ,कधी गळ्यात पुष्पहार घालून बसतोस आणि मी तुला हरी हरी म्हणून हाका मारते आणि तू 'ओ ' तर देत नाहीसच पण सर्पमाळ व रूद्राक्षाने सुशोभित होऊन येतोस. मगं मला वाटते की हा आशु-तोष तर नक्की ऐकेल.. मला कधी कळणार की तुम्ही एकच आहात.
मला वाटायला लागते तुम्हा पुरुषांना का कळणार माझी अस्वस्थता , माझे स्त्रीह्रदय! हा विचार जणू तुला कळला की तू प्रकटतोस ती जगदंबा होऊन. तिच्यात मगं मी माझी आई शोधते . ती माझ्या रूदनाकडे दुर्लक्ष करू शकणार नाही अर्थातच !
सर्व रेणूंना कारण असणारी रेणुका म्हणते मला सुक्ष्मात शोध बाळा. आता आली की पंचाईत ! माझ्या संसारी दृष्टीत मात्र आसक्तीच भरलेली असल्याने मला कसं दिसणार. हा माझ्या दृष्टीचाच नाहीतर बुद्धीचाही दोष आहे असे मानूण मी गणरायाला आर्त करते. तो माझ्या दृष्टीपथातले विघ्न दूर करतो व शारदाकृपेने मतीवरही प्रकाश पडतो. ती जगदंबा, तो विनायक, ती सरस्वती तूच आहेस मला कधी कळणार.

भगवद्गीता वाचावी म्हणाले तर कुठे अर्जुन कुठे मी ?! पुत्रप्रेमाणे आंधळा झालेला तो धृतराष्ट्र मी , प्रतिज्ञापालनासाठी सारासार बाजूला ठेवलेला भीष्म मी , महत्त्वाकांक्षेसाठी कूळाला पणाला लावणारी सत्यवती मी, अयोग्य निष्ठेसाठी विवेक विसरणारा द्रोण मी, तुझे खरे रूप न ओळखणारा शिशुपाल मी, सत्तालालसेपोटी भ्रमिष्ट झालेला दुर्योधन मी, प्रतिशोधाच्या अग्नीत जळणारा शकुनी मी...हे सगळे दुर्गुण माझ्यात असल्याने मी तर तुझ्या शत्रुपक्षात आहे की योगेश्वरा. अर्जुन कुठयं मी .

अर्जुनाची भक्ती-प्रेम नाही माझ्याकडे, पण शंकाकुशंका यांनी आलेली संभ्रमावस्था मात्र आहे. तेवढेच साधर्म्य माधवा, दुर्दैव बघ !

त्यात स्त्री आहे मी. मगं कुणाशी साधर्म्य शोधू . आपल्या समाजात अलिकडील काळात 'एनलाइटमेंट' मिळवलेल्या स्त्रीया कोणकोण आहेत असं कुणीतरी विचारलं तर मला एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी नावं आठवायला सुद्धा महत्प्रयास करावे लागले. Not fair !

मला नाही अडकायचे या स्त्रीपुरूष भेदात. हा तर आत्म्याचा प्रवास आहे. शरीर तर बदलत गेलंय प्रत्येक जन्मात. मी नर असो की नारी , तुला नारायणाला तर मी एक अंश तुझाच. पण कुणी विचारले तर मला त्याला पराभूत करायला नक्कीच आवडेल. या क्षेत्रात आम्ही अन-संग हिरो असू पण मला नवीन आदर्श हवेत. नुसते स्त्रीयांकरिता नाही तर आख्ख्या समाजाकरता.

अस्मिता जपणाऱ्या नायीकांना अहंकारी ठरवणाऱ्या समाजाला प्रत्युत्तर द्यायचयं मला. असे जर शुष्क समाजाचा पोकळ अहंकार पोसत राहिले तर माझ्यातली मादीच फक्त उरेल. जे माझ्या भावभावनांच्या आविष्काराच्या एकशतांशही भरत नाही. माहितेय ना तुला.. I am much, much .....much more than that !
मी रोज प्रयत्न करते आहे राधा, मुक्ता , मीरा व्हायचा. मला नवीन अध्यात्मिक स्त्रीनेतृत्व हवंय.

ज्या अर्थी प्रेमाने भल्याभल्यांना आपलेसे करता येते. त्या अर्थी स्त्री सारखे ममत्व तुला तरी कोण देणार. बघं बर तुलाच कदाचित माझी जास्त गरज असेल.

मी होईल भक्त ध्रुव तेव्हा कळेल तुला मगं येशील पान्हा फुटल्यासारखे सैरभैर होशील आणि धावत येशील राणावनातून, काट्याकुट्यातून मला ह्रदयास लावायला, तुलाही लागतील ठेचा, ओरखडेल, पितांबर जिथंतिथं फाटेल , खरचटेल तुला , अ-शरीराला वेदना होतील, रक्त ठिबकेल, गळ्यातील पुष्पमाळा म्लान होईल. गदा, चक्र, शंख ही तुझी आयुधं मार्गात कुठेतरी पडतील आणि तुला कशाकशाच्च भान रहाणार नाही माझा टाहो असेलच असा. मला कडेवर घेशील एकदाचे. तेव्हा तू फक्त माझी आई असशील आणि मी तुझं बाळ.

तूच फक्त 'छलिया' नाहीस कृष्णा आम्ही स्त्रीयाही आहोत.


.©अस्मिता

चित्र आंतरजालावरून साभार.

मायबोलीवर पूर्वप्रकाशित.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7883595537263568"

     crossorigin="anonymous"></script>




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12th Fail (Hindi movie)

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

हृता