अवाकॅडो सँडविच , तिरंगी पचडी , अजिलिओ ए ओलिओ.
हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत पण मी एकाच धाग्यात लिहिले आहेत.
अवाकॅडो सँडविच
साहित्य .. १ पिकलेले अवाकॅडो , २ हिरव्या मिरच्या, १ लिंबू, वाटीभर चिरलेली कोथिंबीर , २ लसणाच्या पाकळ्या, चमचाभर मध /साखर , थोडे मीठ, १ टमाटा, अर्धा कांदा (साधारण अर्धी वाटीभर चिरून) , मीठ चवीनुसार / अर्धा चमचा, चीज स्लाइस, बटर.
कृती... एवोकॅडो साल व बी काढून मिक्सर मध्ये घाला. त्यात लिंबू पिळून, चमचाभर मध/साखर , मीठ व हिरव्या मिरच्या (फोटो मध्ये नाहीत पण टाकल्यात ) आणि लसूण घालून व्यवस्थित फिरवून एकजीव करून घ्या.
आता या स्टेपला ही रेसिपी डीपची झाली आहे. पण डीपने पोट नाही भरत म्हणून सँडविच करू !
या मिश्रणात आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, कोथिंबीर घालून हलवून घ्या. मीठ कमी वाटत असेल तर तेही टाकून घ्या. हे झाले स्प्रेड तयार. आता दोन ब्रेड मध्ये लावून हवे असल्यास चीज स्लाइस वर ठेऊन बटर वर नीट भाजून घ्यावे.
माहितीचा स्रोत...भाची देवकी .
********************************************************
तिरंगी पचडी
हा एक कोशिंबीरीचाच प्रकार आहे. पण मी वाफवून घेतली आहे. मूळ रेसीपीत (हमखास पाकसिद्धी) शिमला मिरची व टोमॅटो होते पण मी नाही घातले. शिवाय कांदा घातला जो नाही घातला तरी चालते.
साहित्य... मोठे मोठे किसलेले गाजर, रेड cabbage मला जांभळा वाटतो हा, थोडा चिरलेला कांदा , मीठ , मिरपूड , थोडे तूप , फोडणी पुरते जिरे, लिंबाचा रस, किंचित साखर.
माझ्याकडे तयार पाकिटे होती म्हणून फार झटपट झाले.
कृती...थोड्या तूपावर जिरे घालून कोबी व गाजर कीस वाफवून घ्या. अजिबात जास्त शिजू द्यायचा नाही. मीठ व थोडी साखर आणि चमचाभर मिरपूड घालून वाफवून घ्या.
माझा फार निबर होता, कोवळा असेल तर ही स्टेप गाळली तरी चालेल. नंतर बोल मध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून लिंबू पिळून गरम गरम खायला घ्या. सकाळी केलेले संध्याकाळी चांगले लागत नाही. पुन्हा गरम करू नये. लिंबू भरपूर चांगले लागते.. भाजी ऐवजी चांगले लागते.
माहितीचा स्रोत हमखास पाकसिद्धी , चूकुन तीन तीन order केले गेलेले कोलस्ला/coleslaw पाकीटे संपवण्यासाठी केलेली धडपड .
*******************************************************
अजिलिओ ए ओलिओ
साहित्य.. स्पघेटी पास्ता अर्धा पुडा, दोन टेबलस्पून लसणाचे बारीक तुकडे, एक टेबलस्पून चीली फ्लेक्स, तीन टेबलस्पून ओलीव्ह ओईल (no substitute for olive oil please), थोडे किसलेले मोझ्झोरेला किंवा पार्मेजान चीज, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार.
कृती...पास्ता पाकीटावरील सुचनेनुसार अल डान्टे उकडून घ्या. स्पघेटीच हवा. पेन्ने, बो टाय प्रयोग करू शकता. मी नाही कधी केले.
एका कढईत थोडी गरम झाल्यावर olive oil टाका. नंतर लसूण परतून (सतत हलवणे व आच मिडीयम लो ठेवणे ) घ्या . अर्धवट परतला की चिली फ्लेक्स घालून हलवत रहा. तेलाचा रंग किंचित बदलेल. साधारण लसूण कुरकुरीत झाला की उकडून ठेवलेला पास्ता मधील मोठी अर्धी वाटी पाणी/स्टार्च बाजूला ठेवून बाकीचा पास्ता गाळून घेऊन या तेलावर टाका. अगदी दोन मिनिटे यावर तेल उलटसुलट toss करून सगळीकडे हे तेल व्यवस्थित लागले पाहिजे हे बघा. कोथिंबीर टाका. एक दोन मिनिटात आच बंद करा. ताटात वाढून वरून थोडे चीज भुरभुरावे. खायला तयार.
( मी चुकून चांSगले परतले त्यामुळे रंग गडद आला पण चव छानच लागली
माहितीचा स्रोत भाची देवकी. रणवीर ब्रारचा विडीओ सुद्धा आहे ...हा pop झाला होता ती बरीला (Barilla) spaghetti ची दीर्घ जाहिरात होती. हा नंतर दिसला.
यात इतके कमी इनग्रेडियंट आहेत की बदल न करताच छान लागेल. पण केला तर मला सांगा व फोटो जोडा. धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा