अ....... आणि अस्मि
अ..... आणि अस्मि
अ ---- हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो.
अस्मि ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो.
हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही.
( एकंदर आपल्या अहंशी ('जीव' या अर्थाने) आपल्या 'अस्मि'( मी आहे) या जाणीवेशी झालेला संवाद किंवा सेल्फ टॉक, थेरपी सेशनच्या खिळखिळीत चौकटीत कसेतरी बसवलेल्या कथारूपाने.................)
*******************
अस्मि : रेने डेकार्ट म्हणून गेलायं, "I think therefore I am", गप्प बसला असता तर चाललं नसतं का, तसं तर मीही गप्प बसले तर चाललं असतं म्हणा.
अ: मी काय बोलायचे हेही तूच ठरवणार आहेस नं, मगं चटकन ठरवं.
अस्मि: काय अर्थ आहे बरं तुला 'अ' ?? एक अक्षर फक्त , खरंतर आवासून बसायचीच लायकी पण अथांगपणामुळे तुला बोलतं करायला लागतंय.
अ: मी अ-क्षर आहे, मला मरण नाही, त्या अथांग मनाला मी अमर्याद सुद्धा केलंय.
अस्मि : सुरू झाला शब्दंच्छल.... मीच भस्मासूर तयार केलायं.
अ : मला आसुरी आनंद होतोयं. तुझ्या विचारांनीच तर माझी शक्ती वाढत जाते.
अस्मि : विचार आहेत का रक्तबीज , एकापासून दुसरा , दुसऱ्यापासून तिसरा... ए 'अ' ,कदाचित हेच रूपक त्या कथेत वापरले असेल. कालीमातेने रक्त पिऊन जसा रक्तबीजांचा सर्वनाश केला, मला हे विचार पिऊन कशाचातरी नाश करावा लागेल.
अ: ए बाई , माझा नाश कसा होऊ देईन मी, वेडीयेस का ? चल तुझे लक्ष अ-व्याहतपणे भरकटवतो. आज तुझा मूड नाही हेच खरं, नाही तर भेट झाली नसती नाही का ? नेहमीचा उत्फुल्ल स्वभाव कुठे गेला.
अस्मि : उत्फुल्ल ..! माय फूट... जेकल-जेकल-हाईड चाललंय.
अः व्यक्त हो , व्यक्त हो... विचार कर , विचार कर. ही शृंखला थांबवू नकोस सये !!!!
अस्मि: व्यक्त होत रवीन्द्रनाथ होऊ का की सूप्त होत जाऊन माताहारी... सुखी झाले असतील का बरे ते , नेमकं हे मात्र अव्यक्तच राहीलं ,आयुष्य किती गमतीदार आहे नाही.
अ: अव्यवहार्यपणे जतन केलेला अग्नि आहेस तू , अ-ग्नि !!
अस्मि: पुन्हा 'अ' , द्रौपदी अग्नितून जन्मली , त्यामुळे तिच्यात कायमच मानिनी असण्याची ठिणगी होती, कुरूकूल पेटवलंनं तिने..... तसं माझ्यातल्या ठिणगीनी मी काय पेटवू???! काही तरी खाक झाल्याशिवाय याची क्षुधा शांत होणार नाही. अजून समिधा हवी मला .. ह्या विचारांनीच तर तो यज्ञ धगधगता ठेवलाय.
अ: तुला हळूहळू स्वाहा करणाऱ्या अग्निचे विकृत आकर्षण वाटतेय तुला....
अस्मि: कधीतरी अर्पण व्हावं वाटतं. What is wrong with being authentic ?????
अ : काही बाबतीत अव्यक्तच रहा नाही तर अशांत होशील.
अस्मि: तू काय 'अ'च्या भाषेत बोलतोयेस का आज !!!
अ: तूच खेळवत आहेस , तुलाच शब्दांशी खेळायला आवडतं, खेळणं झालं की ते निरर्थक वाटतात.
अस्मि: बघं नं, उगा शारदेला शिण आणि मलाही!!! शब्दात जीव नसतो काही , योग्य भावनेसाठी योग्य क्रमिकता वापरून, त्यांच्या मुसक्या बांधून त्यांना दास केल्याशिवाय ते काही व्यवस्थित भावना पोचवत नाहीत. शंभर टक्के फत्ते असं काम काही करताच येत नाही त्यांना.....!
अ: त्यांच्या संभाव्य चुका गृहीत धरून अधिक काळजी घे.
अस्मि: तुझ्याशीही बोलताना कोर्टात बोलल्यासारखं बोलू की काय.....
अ: अलंकारिक बोलत जा, आशय हरवेल याची भिती सोड..
अस्मि: अरे देवा..... तू काही मला ओळखत नाहीस की काय ??
अ: हे म्हणजे तू स्वतःशीच परक्यासारखे वागतेयस.
अस्मि: खरंय , तेही अ-कारण, आली बरं मला अ-व्यक्ताची अ-भाषा, मी नेहमीच लवकर शिकते. ए 'अ', मी श्लेष अलंकार वापरला , 'अ-भाषा' म्हणजे तुझी भाषाही आणि शिवाय मनातल्या संवादाला भाषेची काय गरज म्हणून ती वास्तविक अशी जड भाषा नाहीच..!!
अ: श्लेष नाही तू श्लेष्मा केलायेस, नेहेमीप्रमाणे..
अस्मि: I know...Right!!
अ: झालं का , जाऊ का मी अ-ज्ञातात परत..
अस्मि: मगं मी कुणाशी बोलू , कोणीच मला असं आरशासारखं ओळखत नाही.
अ: किती वेळ 'मिरर, मिरर ऑन द वॉल' खेळायचं...?
अस्मि: जोपर्यंत "हू इज द बेस्ट व्हर्जन ऑफ मायसेल्फ" कळत नाही..???!!! विच ईज नाही हू ईजच.....
अ: फार आत्मविश्वास , अ-धिकच.. !
अस्मि: घाबरट न होण्यासाठी इतका आटापिटा केला की आत्मविश्वास टिकला पण मसनजोगी झाले, साईड ईफेक्ट. मसनजोग्याला काही फरक पडत नाही..
अ: त्याचे कारण अस्थैर्य आणि अनिश्चितता यांचे सातत्य, मसनजोगी क्लब काढ.. !
अस्मि: हो, तीन मेम्बर भेटलेत , ज्यांना मी जशी आहे तशी आवडते कारण तेही तसेच आहेत. परफेक्ट फिट होतो आम्ही , समांतर जातही रहातो. भौतिक अंतर पुष्कळ असूनही आयुष्यभर सम-अंतर राहीलो.
अ: काही विचित्र बाबतीत किती नशीब काढलंस... अद्भुत !!
अस्मि: नाही तर काय...!
अ: अ-ध्यात्मात रस नसता तर सुखी असतीस... सारखं काय कोहम् कोहम्??
अस्मि: बहुधा !! चोविस तास कुणीही आध्यात्मिक नसते, तरीही जे आहे तेही नॉर्मल नाही माहिती आहे. इतरांसाठी नाही पण मला स्वतःला स्व- स्वरूपाशी प्रामाणिक रहायला आवडते, त्यापासून किंचितही दूर गेले की जीव गुदमरतो. काही तरी अदृश्य बूमरँग लावल्यासारखं परत येते , त्यापेक्षा तिथंच राहीले तर हा थकवा टाळता येतो. अध्यात्म म्हणजे काय दुसरे स्व-स्वरूपाच्या जवळ , अधि-आत्म !
अ: प्लीजच , 'गु' म्हणजे 'अंधार', 'रू' म्हणजे 'दूर करणारा' टाईप चर्चा करून बोअर करू नकोस.
अस्मि : मी तर स्वतःलाही पकवलं...काय stamina आहे माझा..!!
अ: आता हेही लिहिणारेस का , जाऊ दे नं , कोणता मोठा शिलालेख आहे म्हणून !!!
अस्मि: शिलालेख नाही म्हणूनच लिहिणारे, असता तर नसता लिहीला.
अ: समजणारे का हे कुणाला ?
अस्मि: न समजलेल्यांचा किंचित हेवा व समजलंय त्यांची क्षणिक सोबत वाटेल... क्षणिकच !
अ: काही दिवसांच्या डोपामाईनची तजवीज तर नाही ना..
अस्मि : कदाचित...कधीकधी वाटतं काफ्का सारखं लिहून मोकळं व्हावं , प्रकाशित होतंय न होतंय याबाबत कसलीही आस्था न बाळगता, इथे मी लेखनाचे बेबीसिटींग किंवा राखण करत बसते, जसं काही कुणी फूस लावून आशय पळवूनच नेईल !
अ: .. काफ्का नाहीस ठिपका आहेस काळाच्या पाठीवरचा चुुुकार ठिपका...
अस्मि: तो हलकासा तरी उमटवल्याशिवाय काही जाणार नाही कुठे.... ठिपका तर ठिपका....
:
:
:
:
:
:
:
अ: कधीतरी तू अ-थक बोअर करतेस मला... काहीतरी सकारात्मक बोलून संपव हे पुराण.., लोकांना कळलं नाही तरी वाह , वाह करतील. आजकालचा ट्रेंड आहे.
अस्मि : हेल विथ द ट्रेंडी- सकारात्मकता, एव्हरीथिंग ईज अनरिअल.. !! ट्रेंडी ईज फेक, दहा वर्षांनी वाचल्यावर सुद्धा 'काही तरी मिळालयं वाचून' असं वाटणारं लेखन असावं !! नाही तर अजून एक पकाऊ ठिपका तयार होईल. वैतागवाणं होण्यापेक्षा समुद्रात पडणारा पावसाचा एक थेंब होऊन लाटांवर स्वार होत अदृष्य होईन , ते बरं.
अ: जे काय ते, गेट लॉस्ट , गेट अदृश्य , फेेेक इट टिल यू मेक इट !
अस्मि: लीव्हींग ओके, जस्ट शट अप, आय रिअली मीन ईट !! कधीतरी वाटतं , लोक मी काय करतेय न करतेय याची काळजी करण्यापेक्षा , मी काय करतेय न करतेय, याची त्यांना का काळजी वाटतेय याची काळजी का नाही करत, हा हा हा!!!!
अ : अॅलिस ईन वंडरलँडमधला चेशायर बोका आठवतो का...., ज्याला ती रस्ता विचारायची..
अस्मि: आठवतो की , आधी दात मग शरीर प्रकट व्हायचं , आणि योग्य रस्ता दाखव म्हटले की विचारायचा कुठे जायचंय , अॅलिसने कुठे जायचे ते माहिती नाही म्हटले की तो म्हणायचा, " मगं त्यात काय कोणताही रस्ता घे , तुला तो ध्येयाप्रत पोचवेलच!!"
अः तोच आहे मी आणि तू अॅलिस !!!!!
अस्मि: हम्म अ ! I will make the most of it, no matter who I am , with whatever I have and to wherever I am leading !!!!!!!
अ: व्हॉटेव्हर...
संदर्भ:
...तसे तर आपण सर्वच सततच स्वतःशी बोलत असतो पण तरीही हा संवाद कथेच्या रूपात मांडणे व त्या 'अ' ला अहं मानून वर त्याच अहंला त्याच्या गुणावगुणांची 'अ' पासून सुरू होणारी वेगवेगळी विशेषणं वापरून मी हा प्रयोग केलायं. बहुतेक असे करणे गुंतागुंतीचे आहे. संदर्भही स्वैर आहेत पण मनात असेच uncoherent, unbroken किंवा अखंड , स्वैर व असंबद्ध विचार येतात त्यामुळे ते तसेच ठेवलेयंत. मला ही मनाच्या भूलभुलैय्यातील प्रक्रिया फार पावरफुल / बलवान वाटते म्हणून लेख लिहिण्याचे धारिष्ट्य केले. मला गूढ लिहायला आवडते, चूभूद्याघ्या. पूर्णपणे काल्पनिक/निरर्थक.
माता हारी : प्रसिद्ध गुप्तहेर
डोपामाईन : मेंदूतील संप्रेरक
चेशायर बोका
काफ्का : जर्मन लेखक
रेने/रने डकार्ट : फ्रेंच तत्ववेत्ता
#चित्र मीच तयार केलेले. शटरस्टॉकवरील मला जे सांगायचेय ते पोचवणाऱ्या मोफत चित्रावर माझे विकीवरील आवडते क्वोट इमेज फ्लिपच्या मदतीने मर्ज करून....
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7883595537263568"
crossorigin="anonymous"></script>
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा