पालकाची पातळ भाजी
पालकाची पातळ भाजी
पूर्वतयारीचा वेळ: २० मिनिटे
साहित्य:
पालक बारीक चिरून तीन ओंजळ , २ वाटी शिजवलेली तूर डाळ, चणा डाळ १ चमचा , भरपूर लसूण तुकडे करून, मुठभर शेंगदाणे, दोन तीन चमचे बेसन/डाळीचे पीठ, चिंचेचा कोळ १ चमचा (मी तयार घातला, तो जास्त आंबट असतो. तुम्ही भिजवून केला तर थोडा जास्त लागेल आणि गरम पाण्यात भिजवले तर लवकर होतो ) एक चमचा गूळ, एक चमचा काळा मसाला, तिखट , मीठ, जिरे, मोहरी ,दोन तीन सुक्या लाल मिरच्यांचे मोठे तुकडे.
तेलाची फोडणी(मोहरी जिरे) करून थोडा लसूण, लाल मिरच्या , व चणा डाळ घालून परतून घ्यावे. मग पालक परतून घ्यावा, एक वाफ येऊन थोडा होतो , हळद घालावी , डाळ पाणी घालून पातळ करून घालावी, एक उकळी आली की बेसन अर्धी वाटी पाण्यात नीट मिसळून ते ह्यात घालावे , व थोडे पाणी घालून चिंच, गूळ , काळा मसाला, व मीठ घालून झाकण लावून भरपूर शिजवावे, gas बंद करावा.
मगं पुन्हा भरपूर तेलाची वेगळी फोडणी करावी त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, शेंगदाणे, कढीपत्ता, घालून खुटखुटीत झाले की तिखट घालून थोडे परतून gas बंद करावा. तिखट पटकन जळते. ही फोडणी भाजीवर घालावी. चुर्र् आवाज आला पाहिजे. ही भाजी चिंचेच्या कोळामुळे काळसर दिसते. लसणाचे तुकडे चांगले लागतात, शक्यतो पेस्ट नको.
माझ्या साबा पालक कुकरमध्ये शिजवतात तेव्हाच मुठभर चणाडाळही त्यावरच घालतात, मी काही तसे करत नाही, मी बेबी स्पिनॅच वापरते . ही भाजी लोखंडी कढईत केली तर बरे, लोह तयार होते , मी केली नाही मी 'दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान' मोड मधे आहे.
ह्या भाजीत डाळही आहे त्यामुळे भाजी+वरण आहे. मी बहुतेक वेळा ही भाजी केली की कढी करते ते कॉम्बो मस्त लागते.
*अगदी अशीच मेथीची भाजीही करता येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा