रॉकी और राणीकी 'कायकी' प्रेमकहाणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो. पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं आजोबांच्या. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडते. एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं ना...