फराळाचा PTSD कसा द्यायचा?

एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात.

----------------



आपण केलेल्या गोष्टी/चांगलेचुंगले / मेहनतीने केलेल्या पाककृती विसरून जाणारा किंवा 'रिप्लेस मेमरी' असणाऱ्या नवरा असलेल्या मैत्रिणींना समर्पित.... Wink

एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी. 

फराळाचा PTSD कसा द्यायचा?  Biggrin

1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणिवा काढून किरकिर करायची.
उदा. रवा/पोहे जाड/ पातळ/ बारीक, खोबरं- शेंगदाणे खवट.

2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं. सारखं 'कुठपर्यंत झालं' विचारत रहायचं . किराणा खरेदीत झालेल्या चुकांवर खूप हताश होऊन सुस्कारे सोडत रहायचं.

3. आठ दिवस आधीपासूनच शॉर्टकट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढंच म्हणायचं. फराळाच्या रुखवतापैकी काहीनंकाही डायनिंग टेबलवर मांडून ठेवायचं व वातावरणनिर्मिती करायची.
उदा. भाजलेले पोहे-शेंगदाणे , परात, झाऱ्या, चकलीपात्र-सोऱ्या, धुतलेले डबे.

4. तो घरात असताना फोनवर इतरांना 'बाई गं ,फराळ बनवायला घेणारे, ठेवते आता ', व 'आमच्याकडे विकतचं चालतं पण मलाच पटत नाही ' इ ठेवणीतली आणि इतरांना निगुतीने संसार करतेय असं भासवणारी वाक्यं म्हणत रहायची.

5. फराळ सुट्टीच्या दिवशीच करायचा.लक्षात ठेवा - सप्राईज वगैरे द्यायला आपलं काही नवीन लग्न झालेलं नाही. गेले ते दिवस. वास्तवात या.

6. जास्तीत जास्त गर्दा करायचा, अमेरिकेत असाल तर लॉन मो करताना खिडकीतून/भारतात असाल तर माळा आवरायला लावताना सांगत रहायचं की 'आता तू गराज/पसारा आवर/ दिव्यांच्या माळांचा गुंता काढ/आकाशकंदिलासाठी एक्स्टेंशन केबल शोधून काढ/ वॅक्यूम कर /झाडून काढ/ मुलांना आण/सोड. मला तर फराळ बनवायला घ्यायचा.

7. त्या दिवशी पसारा करून, घरच्यांना डिस्पोजेबलमधे उभ्याने खायला द्यायचं. घरच्यांकडून भांडी घासून घ्यायची.

8. दुसऱ्या दिवशी 'तळणाच्या वासानं डोकं उठलं , आज तुम्ही सबवे खा' म्हणायचं.

9. थोडं निवांत बसलं की उठवायचं. Repeat as needed.

10. या खोलीतून त्या खोलीत पाय वाजवत येरझाऱ्या घालून लगबग दाखवायची.

11. एवढं करूनही काही गोष्टी घरच्या तर काही बाहेरच्या आणायच्या.

12. मी गृहकृत्यदक्ष म्हणून एवढं तरी केले, आजकाल तर कुणी एवढंही करत नाही म्हणत रहायचं. Repeat as needed.

13. यापैकी कुठलीही वाक्यं फराळाचा आनंद घेऊन मिटक्या मारण्याच्या बेसावध क्षणी इतरांवर सुदर्शनचक्रासारखी 'सहज' फेकायची. किती तडजोड करतोय हे दाखवून द्यायचं.

***फराळाची दहशत निर्माण झाली पाहिजे. Biggrin
दिवाळी आली तर फटाके नकोत का, म्हणून हा PTSD प्रपंच. हे सगळं बेमालूमपणे करायचं आहे, त्यामुळे 'गुपीत' ठेवायचं.

हलकेच घेणे. Wink

Copyright free image from Shutterstock.

अस्मिता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता