चित्रपटांच्या संदर्भ लिंक
धडक २
अतिशय संयत हाताळणी आहे त्यामुळे जास्त आवडला. त्यातला जातीपातीचा भाग गृहित न धरताही कलाकृती म्हणून सुद्धा व्यवस्थित मांडणी असलेला वाटला. कितीही प्रक्षोभक आणि भडक करता आला असता पण मग इतका नेमका पोचला नसता असेही वाटले. संवेदनशील मनाची कथा आहे.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणाऱ्यांची व जग चांगले असू शकते आपण आपलं शिकून मोठे होऊ याविचारांचा थोडा भाबडा व प्रामाणिक नायक आणि नायिका आहेत. तृप्ती दिमरीला अगदी सटल मेकप आहे, कुणीही ग्लॅमरस दाखवलं नाही.
संवादही प्रवचनासारखे न वाटता योग्य अनुषंगाने आलेले वाटतात. आवेश नसूनही डोळ्यात पाणी येणाऱ्या घटना आहेत. माहितीपट पण जरा व्यावसायिक असं म्हटलं तरी चालेल. माझा आता कसल्याही समानतेच्या काल्पनिक नंदनवनावर किंवा "असं कुठं असतं का, मी तर कधी केलं नाही, पाहिलं नाही" - इत्यादी वर विश्वास नाही. People are generally mean and insecure, they can do anything for anything असं हल्ली वाटतं. त्यामुळे ह्या वर माझा सहज विश्वास बसला, अर्थात हाताळणी अतिरंजित नाही हे ही मोठं कारण आहे. अति केले की कथा न पोचता आपण प्रेक्षकांना दूर लोटतो हे दिग्दर्शकाला माहिती असावे. शेवट जरा अकस्मात वाटला पण अजून वेगळे काय घडायला हवे होते ते कळाले नाही.
कुणी कुणासोबत गुपचूप पळून गेले नाही आणि जीव घेणे सहज शक्य आणि फेअर वाटत असताना अगदी शेवटच्या क्षणी हिंसेला आवर घालणारा नायक पाहून प्रगल्भ अप्रोच वाटला. शांतचित्ताने वागण्यात जी ताकद आहे ती हिंसेत नाही. हिंसेने ह्या लूपमधून बाहेर पडता येत नाही. कुठेतरी सर्वांनीच याकडे आधी माणुसकी म्हणून पाहण्याची गरज आहे असे विचार आले. चांगले आणि नवीन विचार देणारा सिनेमा यशस्वीच म्हणायला हवा.
फक्त ठराविक जातीत जन्मल्यामुळे कसलेही कर्तृत्व नसताना आयुष्यभर कळतनकळत मिळालेल्या प्रिव्हिलेजसची जाणीव आल्यापासून प्रो - आरक्षण झाले आहे. यातील अनेक लेयर्स व पिढ्यानुपिढ्या शापित राहणं- तेही कुठल्यातरी भ्रामक अट्टाहासमुळे हे लक्षात यायला मोठं व्हावं लागलं पण आलं लक्षात. कुठल्या घरात, रंगात, देशात, गावात, लिंगात, जातीत, भाषेत, आर्थिक परिस्थितीत जन्म घेणं आपल्या हातातच नाही - ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याचा अभिमान का करावा, श्रेय का घ्यावे- आणि न्यूनगंड तरी का बाळगावा?!
जातीच्या उतरंडी सोबत, स्त्री वेष घालून नृत्य करण्याचा व्यवसाय असणारा नायकाचा बाबा, आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव आहे पण बाबांच्या अशा असण्याची लाजही वाटणारा नायक, हे स्विकारल्यानंतरच त्याला पुढचा लढा लढण्याचा आत्मविश्वास येतो हे एक उठून दिसणारे वेगळेपण. शिकल्याशिवाय आपण या दुष्टचक्रातून बाहेर पडणार नाही असे वाटणारी ठाम आईही आहे. आजन्म गरिबी- अन्याय सोसूनही हित कळणारी- विवेक असणारी धमक असलेली आई बघून जीव थंड झाला. अशा आईचा मुलगा कशाला बिघडेल!
कॅरेक्टर एस्टाब्लिशमेंट एकदम चांगली आहे. थोडा वेळ असलेली पात्रही स्वतःचा असा एक कंगोरा घेऊन येतात. स्त्री पुरुष भेद आणि कुठलीही स्त्री म्हणजे घरचा मान आणि मग तिने भाऊ - वडील यांच्या मानाला धक्का लागू नये असे वागत राहायचे, पूर्णपणे ताब्यात जायचं. भाऊ - वडील - काकांनी मात्र काहीही केले तरी मान अबाधित राहतो अशा पुरुषसत्ताक कल्पनाही अधोरेखित केल्या आहेत. पण जे आहे त्याला भडक न करता फक्त ठळक केलं आहे ते फार आवडलं. नक्की पाहून पाहा. शेवट साधा आणि सकारात्मक आहे, तोही खूप काही सिद्ध करायला जात नाही. सहज वाटतो. विचार बदलेपर्यंतचा लढा विचार बदलल्याने संपला इतका सहज आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा