धुरंधर - परिक्षण
आज थिअटरमधे पाहून आलो. मला खूप आवडला. हिंसाचार, रक्तपाताचे काही वाटत नाही गॉट पाहिल्यापासून. जाट मधे तर 'आपने मेरी इडली गिरायी' म्हणत उगाचच केला आहे तसा येथे वाटला नाही. कथेमुळेच ते येत जातो, चित्रपटाचा प्रकारच ॲक्शनपट/ मारामारीचा आहे.
मला चित्रपट खूप स्ट्रेट फॉरवर्ड, किंवा लिनिअर वाटला. खूपच क्लीन मुव्हमेंट असलेली ॲक्शन आहे. अजिबात "क्लम्जी" नाही, रक्तपात असूनही एकदम स्पष्ट आणि स्वच्छ हालचाली आहेत. वेगवान आहे पण एंगेजिंग आहे. मला सर्वात जास्त रणवीरचेच काम आवडले. अक्षय खन्नाचे चांगले आहेच पण त्याची हाईप जास्त आहे. सोशल मीडिया वर सगळ्या रील्स त्याच्याच आहेत. घाऱ्या डोळ्यांचा रगेड, मधूनच हरवल्यासारखा , कव्हर उघडे पडू नये म्हणून सहन करणारा, योग्य वेळेची वाट पाहणारा, पटत नसतानाही सहभागी होणारा, प्रसंगी आपल्याच देशातील घातपात बघून अश्रू पुसून अतिरेक्यांसोबत जयघोष करणारा - असे अनेक पदर असलेली भूमिका आहे. त्यामानाने इतरांच्या वरवरच्या आहेत. अर्जुन रामपाल त्याला जे येते ते करतो, क्रूर भूमिका आहे. पण फार आव्हानात्मक नाही. त्यामानाने राकेश बेदीची लेयर्ड आहे, कारण तो कुणाचाच नाही आणि डायरेक्ट एक्स्ट्रीमिस्ट नाही. तो धूर्त राजकारणी आहे, तो आपली प्रतिमा स्वच्छ ठेवतो. त्याने कुठे कुठे विनोदही पेरला आहे. अक्षय खन्नाची भूमिका जाणूनबुजून अंडरप्ले करून क्रूर आणि धूर्त दोन्ही असलेला, मुरलेला महत्त्वाकांक्षी ड्रग आणि गन्सचा डीलरची आहे. बलोचचे गाणं आणि त्याची एंट्री ही तो बलोची आहे हे अधोरेखित करायलाच होती. बाकी तो तितका बलोची वाटला नाही. त्यापेक्षा रणवीर जास्त वाटला आणि तो तर नकली बलोची होता. या गरीब देशांत खायला नाही, शिक्षण नाही, आरोग्यसेवा नाही आणि टीनेजर मुलांच्या हातात बंदुका देतात.
१९९९ च्या हायजॅकच्या वेळी मी कॉलेजमध्ये होते. यातील सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या व अशातल्याच आहेत. २६/११ चा मनावर अतिशय वाईट परिणाम झाला होता, तेही कोरलेले आहेच. ह्या घटना यात ओवून कथा घडत जाते तरीही पूर्णपणे खरी नसेल. कारण मधल्या छोट्या गोष्टी तपशीलातल्या गोष्टी क्लासिफाईड असतात. धुरंधर प्रोजेक्टचा आणि मोहित शर्माचा काही संबंध नाही. तो धुरंधर प्रोजेक्ट सुद्धा खरा आहे का पेरलेला आहे कल्पना नाही. कारण एक हेर जे करू शकतो तो कुणीही ध्येयहीन, मरणाच्या रांगेत उभा गुन्हेगार करू शकेल - ते धैर्य तो पेशंस किंवा ती ट्रेनिंग आणून तडीस नेईल यावर माझा विश्वास बसला नाही. पण ते आता पार्ट टू मधे कळेल.
माधवनचे काम चांगले आहे. संवाद फार प्रभावी नाहीत. कमी शब्दांचे व सखोल अर्थ नसलेली वाक्यं आहेत. सारा अर्जुन नसती तरी चाललं असतं इतकं बिनमहत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तसं आवश्यक होतं कथेसाठी, पण सबस्टंस नाही. रणवीर तिला पबमधून पोलिसांपासून वाचवतो, सहा गाड्या ह्या मुलीच्या मागे. तो सगळा सीन अनावश्यक वाटला. तिला असेही आईवडिलांचा कंटाळा आला होता म्हणून ती प्रेमात पडलीच असती. इतके पावरफुल वडील मुलीला वाचवण्यासाठी काहीच करताना दिसत नाहीत. ॲक्शनपटांमधे हिरोईन्सना काहीच काम नसतं, हे पुन्हा आढळते. एकही भारतीय इंटेलिजन्स ऑफिसर स्त्री दाखविली नाही. एक सिक्युरिटी उगाच मरायला दाखविली. बाकी स्त्रियांच्या भूमिका अगदीच नगण्य आहेत. हे काही फार जुने नाही. त्यामानाने उरीमधे दाखवल्या होत्या, ते आवडले होते.
खूपच लांब आहे सिनेमा पण सतत ॲड्रेनेलिन रश देत राहतो. तुम्ही सतत फ्लाईट ऑर फाईट मधे जाता. खऱ्या घटना intertwined करून आठवण करून दिल्या आहेत, त्यामुळे तुम्ही आपोआपच कनेक्ट होता. देश म्हटले की आस्था येऊन आपोआपच तुमचं मन गुंततं ह्याचा फार छान - सायकॉलॉजीकल वापर करून घेता येतो. तो येथे खरं रेकॉर्डिग वापरून, खरे बोलणे ऐकवून केला आहे. Revenge is the strongest emotion ! तुम्हाला आपोआपच खिळवून ठेवते ती प्रोसेस. त्यामुळे त्रुटी असल्या तरी इमोशन तुम्हाला दूर जाऊ देत नाही. कन्व्हिक्शन आणि इमोशन दोन्ही असले की सत्याशी थोडीफार फारकत घेतली तरी चित्रपट एक निर्मिती म्हणून चांगला विकला जातो. ते आदित्य धरला एकदम चांगले जमले आहे. चित्रपट प्रोपोगंडा वाटला नाही कारण तुम्ही मनात काही प्रतिमा कलुषित करून येत नाही, निदान मला तरी तसं वाटलं नाही. ज्यांच्या कलुषित व्हायच्या होत्या, त्यांच्या अगोदरच आहेत. दहशतवाद्यांचे संवाद तसे असतीलही/ नसतीलही पण आपण आक्रमक होण्याची गरज नाही. ते तर अतिरेकीच आहेत, त्यांची मतं कशीही असू शकणार. विकृत मनोवृत्तीचे लोक कुणाबद्दल काय मतं व्यक्त करतात ह्याला आपण महत्त्व देऊ नये असं आपलं मला वाटलं. आपण आपल्या देशासोबत राहावे, धर्मासोबत नाही. धर्म नंतर! अतिरेक्यांची आणि आपली मूल्ये समांतर नकोतच की कुणी डिवचले की लगेच निघाले.
संजय दत्त तो नेहमी जसा असतो तसाच आहे. ती भूमिका त्याच्या दांडगेपणाला शोभून दिसते. अर्जुन रामपाल व हा मला फक्त लूक्स मुळे पर्फेक्ट वाटले. बाकी सगळं इतर सिनेमाची camaraderie सांभाळून घेते त्यामुळे त्यात खूप आव्हानात्मक काही नाही. त्यामानाने राकेश बेदी, रणवीरचे आव्हानात्मक होते. अक्षय खन्नाचे पण तितके नव्हते. त्या कॅरेक्टर्सना तितक्या छटाच नाहीत जितके त्याचे कौतुक होत आहे. अर्जुन रामपाल "ओम शांती ओम" सारखाच पण अस्वच्छ वाटला. कामं अर्थात चांगली आहेत.
क्लीन आणि रिफाईन्ड सिनेमा आहे. पॅकेज चकाचक आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी खटकत नाहीत कारण तुम्हाला तो अनुभव मिळतो ज्यासाठी तुम्ही थिएटर मधे जाता. मी एन्जॉय केला. गाणी विशेष नाहीत, मला फक्त 'शरारत' आवडलं. कारण ते थोडे ऑथेंटिक पाकिस्तानी वाटते, त्यामुळे पहायला छान वाटले. तमन्नाच्या आणि नोराच्या गाण्यांपासून फार वेगळे आणि ब्रेथ ऑफ फ्रेश एअर वाटले. माझ्या रिपीटावर आहे, पाठ झाले आहे. बाकी गाणी आपल्याला जागी ओरिजनल नसली तरी चपखलपणे येतात व नॉस्टॅल्जिया खेळवून जातात. पण ती कथेसोबतच येतात, कथेत ब्रेक येत नाही.
सध्या खूप क्रेझ आहे या चित्रपटाची, त्यामुळेच थिएटर मधे जाऊन पाहिला. थिएटर मधेच पहावा असा नक्कीच आहे. तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा भौगोलिक, सांस्कृतिक प्रदेश पहायला मिळतो हा माझ्यासाठी महत्त्वाचा पॉईंट होता. त्यामुळे चित्रपटात कुठेही तोचतोचपणा नाही. ती सगळी ट्रिटमेंट रिफ्रेशिंग आहे. मारामारीत काटेरी झाडांवर आपटणे, वेगळ्या वाळवंटी भागातील व्हेजिटेशन वगैरे पहायला आवडले. मला कायम माझ्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीतील लोक किंवा काहीतरी वेगळं पाहायला आवडतं, अगदी घरं, कपडे, भाषा, अन्नं, जमीन, झाडं, पद्धती काहीही - तो अनुभव यातही थोडाफार मिळाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा