मराठी चित्रपट - फ्रेम
प्रचंड प्रेडिक्टेबल वाटला. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ दोघेच आहेत खरेतर. त्यातही मंजुळेच आहे स्क्रीन वर. सतत सिगारेट फुंकतो, स त त . एकही नॉर्मल श्वास नसेल घेतला मी मधेमधे मोजत होते. लग्न अपयशी, घटस्फोट. व बाप म्हणून मुलीशी दुरावलेला. स्वतःच्याच अलूफ गुहेत रमलेला, प्रसंगी चिडका, मधेच हळवा. नको तेथे अवास्तव रिॲक्ट करणारा, जेथे आवश्यक आहे तेथे मात्र उगाच स्थितप्रज्ञ असा वाटला. Language Resources
कामं दोघांची चांगलीच आहेत. फोटो जर्नलिझम आणि त्याचे एथिक्स किंवा संवेदनशीलता. हळूहळू सरावत गेलो की नीतिमूल्ये बाजूला जाऊन फोटोग्राफर म्हणून पुढे येण्यात चढाओढ कशी सुरु होते. चांगला माणूस चांगला जर्नलिस्ट होऊच शकत नाही किंवा त्याच्या उलट. सगळीकडे संधीसाधू व्यावसायिकता व व्यवहार. आत्महत्या असली तरी आधी फोटो, अपघात असला तरी आधी फोटो. आमचं काम फोटो काढणं! तोही बऱ्याचदा "स्टेज" केलेला त्यामुळे तथ्य किती आणि मसाला किती कळणं अशक्य आहे. जास्तीत जास्त उद्विग्नता येऊन खप वाढावा, प्रसिद्धी मिळावी असे फोटो काढणारे करिअर मधे पुढे जाणार.
या दृष्टीने सिनेमात भूकंपाचा धक्का बसून बेचिराख झालेले गाव व तेथे या सर्वांनी जाणं व फोटो घेणे. इथे सिनेमा संपतो. मृत्यूच्या आसपास फिरकणारी कथा आहे, तो मृत्यू सुद्धा "फ्रेम"मधे अडकवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
या फोटोज ना पुरस्कार सुद्धा असतात. ह्यूस्टन म्युझियम मधे अशा नॅशनल जिओग्राफिकच्या पुरस्कार विजेत्या फोटोंचे दालन पाहिले आहे पण त्यात वेदनादायी फोटो नव्हते समहाऊ.
मला ह्या पिक्चर वरून दोन वादग्रस्त फोटो आठवले. एक तो अफगाण गर्ल आणि तिची हिरवट दाहक नजर. आणि दुसरा आफ्रिकेत लहान कुपोषित बाळापाशी घिरट्या घालणारी गिधाडे. पहिल्यात बरेच स्टेज केले आहे आणि दुसऱ्यात बाळाला वाचवण्याचे कसलेही प्रयत्न न करता फोटो काढले आहेत, गिधाडांसहित! नक्की गिधाडे कोण आहेत. सगळे नीतिमूल्ये आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या पल्याड.
माझ्या अपेक्षेइतका चांगला निघाला नाही चित्रपट पण वाईटही नाही. ट्रेलर जास्त आवडलं होतं. अमेय वाघ एकदम प्रमाण आणि स्पष्ट उच्चारातले मराठी बोलतो, तेच नागराज निमशहरी पद्धतीने शब्द "रोल" करत जलद बोलतो. त्यामुळे ते स्पष्ट वाटत नाही. सैराटची आठवण येते. Muffled वाटतात संवाद. फारच distinct फरक वाटला. आम्ही खरंच तसंच जलद बोलतो, एकदम रिलेटेबल!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा