ऑडिसी

 नोलनचा बहुचर्चित ऑडिसी थिएटर मधे पाहिला. मॅट डेमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, झेंडेया, लुपिटा आहेत.


ऑडिसी येथे शाळेत वाचून झालेलं असतं बरेचदा. बऱ्याचशा ग्रीक कथा माहिती असणारे सुद्धा भरपूर आहेत. माझ्या सारखे कोरी पाटी असणारे प्रेक्षक ज्यांना ट्रोजन हॉर्स शिवाय फार काही माहिती नाही असे फार कमी असतील. पण मी पूर्वाभ्यासाशिवाय विहिरीत उडी घेऊ शकते, पिक्चरचे काय एवढं! असा विचार करून तसेच तोंड वर करून गेले. काहीही अडलं नाही, चित्रपट अगदी सहज समजण्यासारखा आहे. तुम्हाला कुतूहल वाटून वाचून जावं वाटत असेल तर जा पण चित्रपट समजणार नाही असे नाही इतका सरळ मांडला आहे.


होमर नावाचा ग्रीक व्यास मुनी ( माझा भाऊ म्हंटला कालिदास म्हण , व्यास जास्त झाले) यांनी जी दोन महाकाव्ये लिहिली, त्यापैकी ओडिसीयस राजाची गोष्ट ही ओडिसी. हे मूळचे ग्रीक महाभारत समजून मधेच अर्जुनाच्या बारा वर्षे वनवास फक्त वेगळा काढून त्याचीच एक स्वतंत्र गोष्ट केली आणि अर्जुनाला समुद्रात ढकलून त्याचा नेहमी एक फळी मिळून वाचणारा सिंदबाद केला तर जे तयार होईल तसेच वाटले. मूळ ग्रीक देवता व त्यांची संतती, शाप- वरदान वगैरे फार खोलवर न जाता केलेला आहे ओडिसी.


तरीही झूस, अथेना, पसायडन व इतर देवता जसे गॉड ऑफ रेन म्हणजे त्यांचे वरूण, अग्नी, इंद्र वगैरे वारंवार येतात गोष्टीत. अतिशय सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. ट्रॉयचा ट्रोजन हॉर्स हा ओडिसीयसच्या प्रतिभेचे, बुद्धीचे फलित असतो. हेलनची मुक्तता करण्यासाठी दहा वर्षे त्यांनी ट्रॉयचा सर्वनाश केलेला असतो, प्रसंगी विश्वासघातही. हेलन काही ठिकाणी पॅरीस नावाच्या राजपुत्रासोबत स्वतःच्या मर्जीने ट्रॉयला पळून गेलेली असते असं म्हंटले आहे. तिचं पहिलं लग्न म्हणजे राजकारणातला डाव असतो व मेनेलॉस सोबत तिचं लग्न लावून दिलेलं असतं. ती झूस देवाची व लेडा नावाच्या अप्सरेची(?) मुलगी. त्यांना दोन जुळी असतात. त्यापैकी हेलेनची जुळी बहीण Clytemnestra. ह्या दोघी अंड्यातून झालेल्या असतात असेही लिहिले आहे. Clytemnestra चे लग्न मेनेलॉसच्या भावाशीच Agamemnon शी झालेलं असतं. त्याने समुद्रातील सफर यशस्वी व्हावी यासाठी आपल्या लेकीचेच बलिदान दिलेले असते. त्यामुळे Clytemnestra ने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन नवऱ्याला मारून मुलीच्या खुनाचा बदला घेतलेला असतो. त्यामुळे सुद्धा मेनेलॉसला हेलन बद्दल राग असतो. ही ट्रॉयच्या युद्धाची पार्श्वभूमी!


यात नवीन म्हणजे हेलनच्या चेहऱ्यावर एक व्रण करून तिला थोडं विद्रूप केलेलं दाखवलं आहे. आता काही "हजार बोटी नसून पाचशे समजा"( The face that launched a thousand ships, maybe five hundred now! ) असं म्हंटले आहे. हे नोलनचे स्वतःचे आहे. होमरने कुठेही तसं लिहिलं नाही. हेलनला कुरूप करण्याची शिक्षा देण्याची हिंमत मेनेलॉसमधे नव्हतीच. त्या साठीच तर सगळा अट्टाहास होता!


ही ठिणगी किंवा एकुणच आत्यंतिक द्वेष हा अगदी वरवरच्या स्वरूपात दाखवला आहे. खरा भाग ओडिसियसने केलेल्या ट्रॉयच्या युद्धानंतर त्याला आपल्या राज्यात इथिका मधे आपली राणी पेनलपी आणि मुलगा टेलिमॅकस यांना भेटण्याची अनिवार ओढ आणि एखाद्या शापासारखा त्याला सहन करावा लागलेला वीस वर्षांचा विरह यावर आहे. हे सगळे होते त्या ट्रॉयच्या युद्धामुळे.


काहीही होतं ह्या Voyage मधे. अगदी ती बोट, ह्याची माणसं, आणि ओडिसियस कुठेकुठे भटकत अतिशय विचित्र गोष्टींना तोंड देतात. खरेतर पुराण हा नोलनचा हातखंडा नाही, मानवी भावभावना हा आहे. त्या सगळ्यातच असतात त्यामुळे त्या वर भर आहेच. तरीही नोलनचे उत्कृष्ट चित्रपट ऑपनहायमर आणि इंटरस्टेलरच आहेत. हा नाही!! Nolan, you could do anything, why limit yourself to Greek mythology! असं मनात आलंच पाहताना पण then why not mythology as well ? सगळेच तर येतं त्याला. मुख्य म्हणजे गोष्ट सांगता येते. शेवटी हे सगळं स्टोरी टेलिंग असतं. Movies


चित्रपट मला आवडला पण आहे पौराणिक कथा. ओडिसियसच्या पराक्रमाची गाथा, राणी पेनलपीच्या एकनिष्ठतेची गाथा. अक्षरशः पतिव्रता निघाली ती. टेलिमॅकसच्या पित्याच्या शोधाची गाथा. असं सगळं आहे. वीस वर्षं सगळे एकमेकांसाठी विरहाच्या अग्नीत होरपळले. ह्याची सुरवात त्या ट्रॉयच्या युद्धामुळे झाली, तेथून अप्रत्यक्षपणे ओडिसियसमुळे किती जणांचा बळी गेला, त्यांची भुतं ह्याला अपराधबोधाच्या रूपात प्रश्न विचारायची, अथेना देवी याला विवेकाच्या रूपात पश्चात्तापदग्ध अवस्थेत भेटायची. सगळे त्याच्या मनाचे खेळ म्हणता येतील. ह्या सगळ्या तीव्र भावना अनावर होऊन स्मृतीभ्रंश झाला हेही गोष्टी स्वरूपात दाखवलं आहे. वेगवेगळे मांडले तर पुराण काढून ओडिसियचा प्रवास, वैचारिक भूमिका पाहायला मिळते.


चार पाच रंगांच्या छटांमधे सगळा चित्रपट बांधला आहे, समुद्र आणि हेलकावे आपल्याला जाणवतात. प्रत्येक गोष्ट खरी वाटावी, दिसावी अशी आहे. मॅट डेमनचा अभिनय उत्कृष्ट वाटला. हेलन म्हणून लुपिटा मला आवडली. कृष्णवर्णीय हेलन वोक नसून सगळ्या पौराणिक कथा आहेत, त्यामुळे तिचा रंग महत्त्वाचा नव्हताच त्यामुळे नोलनने आपल्या मनासारखे केलं. मला ती ब्लॅक पँथर पासून आवडते, सुंदरच आहे. येथे रोल अगदी छोटा आहे तसा. ॲन हॅथवे सुद्धा नेहमीच आवडते पण तिला नेहमी आधुनिक भूमिकेत बघितले आहे, इथे ती पौराणिक भूमिकेत वेगळीच वाटली. तिच्यासाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या देशोदेशीचे सरदार, राजे पुनर्विवाहाचा घाट घालत असतात. एथिका मिळवून राजा होऊ, ओडिसियस तर मेलाच असेल अशी वदंता असते. तरीही ही एकनिष्ठ राहते. बघणार असाल तर थिएटर मधेच बघा. आयमॅक्सच्या ७० mm कॅमेराने शूट केले आहे म्हणे.


**एक गमतीशीर निरीक्षण या चित्रपटातले - हेलनची जुळी बहीण तिची आयडेंटिकल जुळी आहे. म्हणजे जर तीही तितकीच सुंदर होती तर हेलनच्या हजार बोटी आणि हिच्या हजार बोटी मिळून एकूण दोन हजार व्हायला हव्यात. पण फक्त हेलनसाठीच एवढं महाभारत झालं. ती Clytemnestra बाजूलाच राहिली.


https://www.maayboli.com/node/88097?page=19

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

धुरंधर - परिक्षण

चित्रपटांच्या संदर्भ लिंक