अपरिग्रह मनाचा !
अपरिग्रह मनाचा ! मला लहानपणापासून आयुष्याविषयी फार प्रश्न पडतात , त्यात नैराश्य नाही (मी एक आनंदी मुलगी आहे) तर केवळ निखळ जिज्ञासा असते. आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. मी सातासमुद्रापार , काही अर्थ नाही कशाला. काही तरी आयुष्याशी नातं होतं त्यातून स्वतंत्र वाटायला लागला, म्हटलं तर निर्मूळ म्हटलं तर मुक्तं. नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाचं अदृष्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ??! म्हणजे जी आधी होते ती मी होते की ही उर्वरीत मीच खरी मी आहे. माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. मृण्मयं आहे , मगं या मृण्मयातलं चिन्मयं कुठे आहे?! सारखं काही नं काही गोळा करायचं आणि त्यामुळे होणाऱ्या परिग्रहाच्या व्याप्तीवरून आयुष्याचं सामृद्ध्यं जोखायचं. दृश्य-अदृश्य ओझं जपायला जीवाचं रान करायचं , जणू हीच आपली ओळख आहे. ठराविक आकाराची माती, ठराविक आवडीनावडी, ठराविक सुखदुःख, भावना , आनंद, राग, लोभ हा ...