एक 'हकनाक' विवाह
---------------- विवाह नेटफ्लिक्स वर आलेला आहे, बघायचा असल्यास ....का पण?! तरीही मी बघतेय. कारण घरी कोणी नाही. रामायणातल्यासारखे संगीत सुरू झाले आहे, इंग्रजी वर्णनात Set up for an arranged marriage, a young couple enjoys an old-fashioned courtship, until an accident days before their wedding tests their nascent love. ह्या nascent चा अर्थ मी गुगलणार नाही , सरळ 'नाशवंत' असा घेणार आहे. रेटिंग १४ व जॉन्रा 'फिअर' आहे. यावरुन तुम्हाला खात्री पटेल की मी निर्भय असून कधीतरी पौगंडावस्थेत असते. बाबूजी (आलोकनाथ) जे 'बाऊजी' म्हणून संबोधल्या जातात, हे नावाला जागून स्वगतात नेहेमी बाऊ झाल्यासारखे बोलत असतात. तरूणपणी यांना खऱ्याखऱ्या केसांचा टोप होता, (पाच मिनिटांत येणाऱ्या वर्तमानात) वय झाल्याने तो काढून ठेवला. हे सतत आपलं मुलगी म्हणजे पराया धन ,त्यांचं विश्वच वेगळं, पराया घराच्या मालकीणी , इथे छोट्या कळ्या- सासरी जगत्जननी असं 'रावणचहाकर' बाईंचं भाषणटाईप दुकानातली हिशेबाची लाल चोपडी वाटावी अशा वहीत लिहीत बसलेयतं. (ह्यात चंडी, काली, दूर्गा, महिषासुरमर्दिनी या अवस्थां...